बाबांवर मी बोलतो काही (लष्करी जीवन – भाग ७)
जमिनीवरून जमिनीवर होणाऱ्या हल्ल्यांमध्ये दोन्ही बाजूंनी
इन्फंट्री (पायदळ) आणि आर्टिलरी (तोफखाना) याच मुख्य घटकांत युद्ध होत असतं. पण मग
एअर अटॅक झाला तर काय करायचं?आणि युद्धातले धोके, घ्यायची काळजी कोणती?
बाबा म्हणतात की १९७१ च्या भारत – पाकिस्तान युद्धात मजा
आली. ३ ते १६ डिसेंबर या कालावधीत लढलं गेलेलं आणि जिंकलं गेलेलं हे जगातलं
आजपर्यंतचं सर्वात जलद निकाली लागलेलं मोठं युध्द आहे. शत्रूची फायटर प्लेन्स हवेत
बागडतात तेव्हा खाली लोक दिसले की ती प्लेन्स सहज खाली येऊन नुसता एक फर्राटा मारून
जातात, हे तर घडलंच. अगदी एक एक इंचावरूनही गोळ्यांचा वर्षाव व्हायचा, अशी प्लेन्स
सगळी बंकर्स झटक्यात उद्ध्वस्त करू शकतात. मग सिनियर्स काही अतिउत्साही सैनिकांना
वेळीच मागेही खेचायचे, ‘सालों तुमभी मरोगे हमे भी मारोगे.. याद रहे दस दस को मारे
बिना हमे मरना नही है’ वगैरे सूचना मिळायच्याच मग. (बॉर्डरमध्ये सुनील शेट्टी
हातात ग्रेनेड घेऊन डायरेक्ट त्यांच्या हद्दीत घुसून गोळा टाकतो, तो सीन पाहून
बाबा हसत सुटले होते. आणि चेहऱ्यावर ‘अरे कोण आहे हा, काय करतोय’ टाइप भाव.)
पण एक आहे, एअरफोर्सला आर्टिलरीची भीती असतेच. या
दोघांमध्ये फार खुन्नस असते. कारण आपल्यावर गोळा कसा कुठून येईल हे
एअरफोर्सवाल्यांना एकदम ओळखता येत नाही. आणि इकडे रडार सिस्टीम परफेक्ट सिग्नल्स
देत असेल तर एअरफोर्सचे होत असलेले आणि संभाव्य हल्लेही आर्टिलरी नामोहरम करू
शकते. थेट विमानांवरच निशाणा साधून विमानंच उडवून टाकणं. ना रहेगा बांस ना बजेगी
बांसुरी. एकेका विमानात बराचसा दारुगोळा असतो, त्यामुळं एक फायटर प्लेन नेम धरून
बंबार्डमेंट करत हवेतच उद्धवस्त केलं की पुढचा आपल्याकडचाही बराचसा संहार टळतो.
थोडक्यात वेळीच घातलेला एक टाका पुढचे नऊ टाके वाचवतो,Prevention is better than cure वगैरे..
अर्थात युद्धात मात्र आर्टिलरीचं मुख्य काम हे इन्फंट्रीला
(पायदळ) सपोर्ट करणं हेच असतं. मग इन्फंट्रीचं त्याना मिळणाऱ्या ऑर्डर्सनुसार advancement करणं सुरु असेल किंवा withdrawal करणं, दोन्हीवेळी तोफखाना
त्याना प्रोटेक्शन देत पुढे नेतो किंवा धोक्यातून बाहेर काढत मागे आणतो. कारण कधी
कधी आठ पावलांची झेप घ्यायला चार पावलं मागे यावं लागतं. शिवाय शत्रूला खोटा कॉन्फीडन्स
देऊन आपलं मनोबल खचलंय असं दाखवत त्यांना बेसावध करून अचानक डबल ताकदीनिशी हल्ला करणं
वगैरे असतंच. असो, वॉर टेक्निक्स हा पूर्ण वेगळा आणि मोठा भाग.


युद्धातला एक मोठा धोका म्हणजे फुटबॉलमध्ये सेल्फगोल. म्हणजे
आपल्याच चुकीनं आपलेच सैनिक मारले जाण्याची शक्यता असते, ते मरू नयेत म्हणून काळजी
घ्यावी लागते. ट्रूप प्लेसमेंट नीट आखावं लागतं, अगदी मायनर पोझिशन्सही.. म्हणजे
जे स्वत: प्रत्यक्ष लढत नसतात असेहीसैनिक. उदाहरणार्थ, एका तुकडीकडची रसद संपत
आलीय असा संदेश मिळाला की अमुक ठिकाणी इतके इतके गोळे आणि गोळ्या नेऊन देणारे
सैनिकही कुठून कसे जातील हे ठरलेलं असतं. कारण तिथे सगळा मामला अक्षांश रेखांशावर
चालत असतो. ‘पुढे दोन खडक जाऊन उजव्या अंगाला खाली वळा’ अशी भाषा नसते. वॉकीटॉकीवरून
एक्झॅक्ट कोऑर्डीनेट्सच कम्युनिकेट केले जातात आणि त्याप्रमाणे पोझिशन्स घेतल्या
जातात, बदलल्या जातात.
हे कोओर्डीनेट्स फार अभ्यासपूर्वक ठरवावे लागतात की कोण
कुठे बसेल, उभा राहील, कोणती तुकडी किती एरिया कुठल्या दिशेने प्रोग्रेस होत कव्हर
करेल, तिथे गरज पडल्यास उरलेल्यांपैकी कोणत्या तुकडीतले सैनिक धाडायचे, प्रत्येक
गटात लीडर कोण असेल वगैरे सगळंच आधी ठरवावं लागतं. थोडक्यात जोश में होश खो दिया आणि
जिथे जाणं अपेक्षित नाहीये तिथे घुसून तिथल्या टीमचा बॅलन्स बिघडवला, त्यांचं लक्ष
विचलित होऊन ते शत्रूच्या गोळ्यांना बळी पडलेअसं चालत नाही. किंवा अमुक ठिकाणी
खडकांत, झाडीत आपलीच एक दुसरी तुकडी बसलीय आणि त्यांच्या पलीकडे शत्रू असला तरी
सावधानतेने फायरिंग करावं लागतं. अशा वेळी विशिष्ट ठिकाणी फायरिंगची ऑर्डर असेल तर
अमुक अँगलनेच गोळीबार करावा लागतो, कारण तिथे बसलेल्या आपल्याच सैनिकांना आपलीच
गोळी लागू नये. आपलेच दात आपलेच ओठ टाइप..
![]() |
| भारतीय लष्कराच्या ताफ्यातील एक रणगाडा तोफ |
![]() |
| इंडियन फायटर प्लेन - मिग २९ |
प्रतिस्पर्धी एअरफोर्स आणि आर्टिलरी म्हणजे साप आणि मुंगुस.
कितीही तयारी करून आलेल्या फायटर प्लेन्सना जसा तोफखाना भारी पडतो तसाच एअर अटॅक
झाला तर आर्टिलरीलाही विशेष काळजी घ्यावी लागते. म्हणजे एकाच वेळी सगळ्या तोफा
त्यांच्या हल्ल्याने डॅमेज होऊ नयेत म्हणून अर्ध्या तोफा या रूटला तर अर्ध्या तोफा
त्या रूटला जातात.शिवाय इमर्जन्सीमध्ये अगदी ऐनवेळी कितपत तोफगोळे, सैनिक, ऑपरेटर
इत्यादी कुमक आपल्या मदतीला येऊ शकते याचाही अंदाज घ्यावा लागतो.
यासाठी फेमस टेक्निक म्हणजे सँड मॉडेल्स किंवा क्लोथ
मॉडेल्स बनवून त्यानुसार आधीच सूचना देऊन ठेवणं. त्यासाठी आवश्यक ते आर्टवर्क आधी
तयार करणं. वॉर प्लॅनिंग खरं यातच होत असतं. अर्थात या सर्वच टॉप सिक्रेट गोष्टी,
ज्या फक्त रेजिमेंट कमांडर, ऑन ड्युटी ऑफिसर आणि सर्व्हे ऑफिसर यांनाच माहिती
असतात. मग इतर लहानमोठे ऑफिसर किंवा ट्रूप लीडर्स मौका बघून यापैकी कुणाशी सलगी
असेल तर मागे लागतात की ‘सांग ना, आमची पोझिशन कुठे आहे’, ‘अगदीच जबड्यात जायचंय
आधीच की टप्प्याटप्प्यानं’,‘उद्या आम्ही जात्यात आहोत की सुपात’ ही अशी विचारणा
होतच असते. पण अशा ‘अवांतर’ वेळी कोणतीही माहिती या ऑफिसर्सकडून काही केल्या
पुरवली जात नाही. सर्व अलॉटेड पोझिशन्स आणि वॉर प्लेसमेंट्स सर्व एक्टीव्ह
रेजिमेंट्स आणि डिपार्टमेंट्सना (हेल्पिंग, वॉर मटेरियल सप्लायिंग, रिप्लेसमेंट
फॉर इंज्युर्ड सोल्जर्स, रेस्क्यू, मेडिकल हेल्प वगैरे विभाग) एकाच वेळी
सांगण्यासाठी एक स्पेशल नॅरेटीव्ह सेशन असतो, तेव्हाच या गोष्टी सांगितल्या जातात.
अशी मॉडेल्स बनवणं, आर्टवर्क करणं, सांग सांग म्हणून मागे
लागलेल्यांना मार्किंग्ज, पोझिशन्स न सांगणं, आणि फायनली ती जबाबदारीची सेशन्स नीट
नॅरेट करणं ही सगळीच कामं सर्व्हे ऑफिसर झाल्यावर बाबांनाही करायला मिळाली. मुळातच
उत्तम असलेलं ड्रॉइंग आणि जॉईन झाल्यावर घेतलेलं टेक्निकल नॉलेज, नाशिकला केलेला Counter Bombardment(CB 52)कोर्स या सगळ्याच गोष्टींचा
त्याना हा एक महत्त्वाचा पण तितकाच जोखमीचा अनुभव मिळवण्यासाठी चांगलाच फायदा
झाला.
हे इतकं सगळं शिकायला मिळत असताना सैनिकांकडे कोणत्या
बाबतीत दुर्लक्ष होत असतं? त्यांना मिळणारं वेतन, एकूणच सोयीसुविधा (?), आणि महत्त्वाचं म्हणजे आहार त्यांच्या जबर शारीरिक कामाला,
रोजच्या कष्टांना आणि त्यागाला साजेसा असतो काय? त्यांना कोणत्या एका गोष्टीची
सर्वात जास्त खंत असते? हा भाग पुढच्या लेखात..
(क्रमश:)



No comments:
Post a Comment