बाबांवर मी बोलतो काही (लष्करी जीवन – भाग ४)
सैन्यात शिस्त पराकोटीची. सिनियर्सचे आदेश पाळणं आवश्यक. पण
हे सगळं असलं तरी आणखी एक निगेटिव्ह गोष्ट मात्र सैन्यातही होती, अजूनही असेलच.
जिचा काहींना फटका बसायचाच.. विशेषत: काही गुणी ट्रेनी
सैनिकांना. ही गोष्ट मुळातच आपल्या देशात पूर्वापार चालत आली आहे, अगदी प्रत्येक
क्षेत्रात आणि काही केल्या जाता जात नाही. कळले असेलच म्हणा या वाक्यावरून.
बरोबर.. जाता जात नाही तीच म्हणजे जात.
बाबा जॉईन झाले तेव्हा दिवसा परेड, वेपन ट्रेनिंग वगैरे भाग
तर रात्री काही टेक्निकल वर्क.. सर्व्हेयिंग, मार्किंग, कंट्रोल रूमचे काम कसे
चालते वगैरे काही गोष्टी शिकून घेणं. आधीच ५६ ऐवजी ३२ आठवड्यात पूर्ण करण्यात आलं
होतं. तरी २८ आठवड्यानंतर १० दिवसांची एक सुट्टी मिळाली होती. मग पुन्हा काही
फिजिकल टेस्टस आणि फायरिंग वगैरे टेस्टस झाल्या.. आणि मग बाबांना साधारण एप्रिल-मे
१९६६ च्या सुमारास पहिलं पोस्टिंग मिळालं ते डेहराडूनचं.
डेहराडूनला गेल्यावर जाणवलं की तिथेएकूणच संख्येने मराठे
कमी होते, आणि शीख नि केरळी वगैरे जास्त होते. मग त्यांच्या त्या त्या प्रांतीय
अधिकाऱ्यांचा त्यांच्या कंपूतल्या सैनिकांना सॉफ्ट कॉर्नर असायचा. जातपात आणि
प्रांतवाद, भाषावाद हा नाही म्हटलं तरी तिथेही प्रत्ययाला आलाच. कुठेही कॅम्प गेला
की सैनिकांना तिथे तंबू उभारून राहावे लागायचे. मग दिवसभर ग्राउंडवर्क आणि
रात्रीचा वेळ टेक्निकल गोष्टींच्या सरावासाठी दिल्यावर तुम्हाला कुणी वाली नसेल तर
अशावेळी बाहेर गस्त घालायला उभं राहावं लागायचं हातात दंडुका धरून. मग झोप किती
मिळेल, किंबहुना मिळेल की नाही हे सांगता यायचं नाही. त्यात ती सैन्याची शिस्त,
त्यामुळं वर तोंड करून विचारायची सोय नाही. कारण ऑर्डर डिसओबे झाली की शिक्षाही
तितक्याच कडक असायच्या. म्हणजे आता पुढची वाक्यं वाचून आपण फक्त कल्पना करायची हं.
उदाहरणार्थ पाठीवर एक फार नाही, पण चाळीस किलो वजन असलेलं
ओझं.. तेही काट्यावर वजन करून. ती बॅग/ सॅक जास्तीत जास्त जड कशी होईल आणि सैनिक मध्येच
थकून बसला तर पुन्हा उठणं जास्तीत जास्त कठीण कसं होईल याची काळजी घेतली जाऊन भरली
जाणारी बॅग.. म्हणजे त्या बॅगेत रेती, वाळू, दगड, जड रायफल्स आणि इतर काही जड
गोष्टी वगैरे असायचेच. आणि मग सुटायच्या ऑर्डरी – ‘याला वन पॅक ड्रिल द्या’. हे
ओझे पाठीवर घेऊन सांगितलेले अमुक अंतर धावत जाणे, राउंड मारणे किंवा रांगत जाणे- क्रॉलिंग
करणे म्हणजे मिलिटरीच्या भाषेत पॅक ड्रिल.. वन, टू जितके सांगितले असतील तितके पॅक
ड्रिल्स करणे म्हणजे तितक्यावेळा तसे तेवढे अंतर धावणे, राउंड मारणे किंवा
क्रॉलिंग करणे. बरं हे क्रॉलिंग तरी साधं सरळ जरा माणसातलं ठेवावं, तर तेही नाही..
म्हणजे सक्तीने मुद्दाम शर्टच्या बाह्या वर घेऊनच जायचं, जेणेकरून ढोपरं फुटलीच
पाहिजेत, रक्ताळलीच पाहिजेत, मग भले दुसऱ्या दिवशी आर्मी डॉक्टरकडे ड्रेसिंग करून
घ्यायला जा, पण तेव्हा ते पॅक ड्रिल विदाउट फेल परफॉर्म झालं पाहिजे म्हणजे
पाहिजेच. (या ‘च’चं महत्त्व सैनिकांना कधीच वेगळ्याने शिकवावं लागत नाही.) कधीकधी
त्यासाठीही टाईम लिमिट.. एवढ्या वेळात हे करून पुन्हा पुढच्या सेशनला जायचं वगैरे
छान शारीरिक लाड.
या शिक्षाही शक्यतो भर उन्हात.. तितकंसं ऊन त्यावेळी नसेल तर जेव्हा ऊन पडेल तेव्हा ‘स्टार्ट’ म्हणायचं. हे जरा क्रूर किंवा कठोर
वाटेल, पण सैन्यात सगळ्यांच्याच हातात रायफल असते, काहीही करू शकतील ना.. मग
म्हणूनच अशा काही गोष्टींतून शिकाऊ सैनिकांच्या अंगी शिस्त बाणवण्याचा प्रयत्न
केला जातो आणि हाच हेतूही असतो. हां आता इथेही तो जात मुद्दा असू शकतोच, कसा ते
आता पुन्हा सांगत बसण्याची गरज नाही. पण जरब हवीच हे सगळं कंट्रोल करायला म्हणून
मग हे असं. अंगठे धरून उभं केलं म्हणून पालकांना फोन करता येत नाही तिथं. ‘च्यायला
पाठवा सरळ बॉर्डरवर.. गोळ्या घालून आणि खाऊन युद्धात तरी मरतो एकदाचा, पण हे असं
रोज मरण नको’ असं सैनिकांना या काळात वाटतंच. आणि यातूनच ते कायच्या काय सॉलिड टफ
होत जातात. कधी शत्रूच्या तावडीत सापडल्यावर युद्धकैदी त्यांचे कितीही हाल झाले
तरी तोंड उघडत नाहीत नि काही माहिती फोडत नाहीत ती सहनशक्ती येते कुठून तर इथून.
देते कोण देते कोण देते कोण देते ही सहनशक्ती? तर आर्मी आणि तिथलं खडतर ट्रेनिंगच!
सैन्यात एखाद्या ज्युनियरने सिनियरला किंवा सहकाऱ्याला गोळी घातली अशी कधीतरी बातमी, अगदी क्वचित का होईना, पण आपण वाचतो. हे शक्यतो टाळण्यासाठीही ही शिस्त, आदरयुक्त भीती उपयोगी पडते. मुळात सिनियर्सविषयी मनात आदर असला की असं काही घडायची शक्यता कमीच. पण जर शारीरिक क्षमता आणि मनोबल कमी पडत असेल तर मात्र मग ते शिकाऊ सैनिक सरळ पळून येतात तिथून. (तिथून पळून येणंही सोपं नसतं. उगाच शाळा/कॉलेजात आपली प्रेझेंटी देऊन मागच्या दाराने वर्गाबाहेर पळून जाण्याचे वैयक्तिक अनुभव आठवू नये. पण मला तरी हे वाक्य नेमकं इथंच का सुचावं.. छे, भूतकाळ काही पिच्छा सोडत नाही)
एखाद्या मोहिमेवेळी असं करताना अशा खड्ड्यात कितीवेळ बसावं
लागू शकतं याचा अंदाज नसतो, भूक लागली आणि अन्नाची पॅकेट्सही नसतील तर लगेच खा ती
हिरवी पाने तरी असंही करता येत नाही, कारण आपण तिथे बसलोय हे शत्रूला दिसता कामा
नये, पोषाखही त्याच रंगाशी मिळताजुळता असतो. सरडा जसं भक्ष्य टिपण्यासाठी कितीही
वेळ बसून राहतो, आणि भक्ष्य टप्प्यात आलं की कायच्या काय लांब जीभ बाहेर काढून
त्याला टिपतो, तसंच सैनिकांना करावं लागतं. शत्रू टप्प्यात आला की हा गोळीबाराचा
समन्वयही साधावा लागतो. वायरलेस प्रत्येकवेळी असतीलच असं नाही, डिपेंड्स मोहीम
कितपत मेजर आहे (अशा प्रत्येक मिशनलाही खास नावं दिलेली असतात.. मिशन अमुक किंवा
ऑपरेशन तमुक), मग कधी खड्डे जवळजवळ असतील तर खाणाखुणा किंवा आधीच ठरलेले संकेत –
पक्ष्याचा आवाज, विशिष्ट शिट्टी, किंवा रायफलनेझाडीत किंचीतशी हालचाल वगैरे. आणि
मग दे दणादण... ठ्या ठ्या ठ्या धूड धूड धूड धूड.. (गोळीचा ढिश्क्यांव असा आवाज
फक्त हिंदी सिनेमातच येतो)
खड्डा खोदणं ही डोकेदुखी असते खरी, पण ते गरजेचंही असतं.
शिवाय जंगलात किंवा दुर्गम डोंगराळ भागात
तंबू लागले की अजून एक काम वाढतं. म्हणजे अजून एक खड्डा खणावा लागतो, पण तो
आपल्यासाठी नाही तर सापासाठी. त्याला ‘स्नेक स्ट्रेच’ म्हणतात. विशिष्ट आर्क करत तीन
फूट खोल आणि दीड फूट रूंद आणि लांबी अख्ख्या तंबूला कव्हर करेल एवढी.अशा काही
भागातले साप म्हणे त्यांच्या शरीररचनेमुळे त्या खड्ड्यात पडले तर तिथून चढून वर
येऊ शकत नाहीत, पर्यायाने तंबूपर्यंत पोहचू शकत नाहीत. हां प्रत्येकवेळी हे वर्क
होईलच असं नाही, कारण मग तो सापांच्या बुद्धिमत्तेचा अपमान ठरेल. पण अशा मेथड्स
वापरून कधी दुसऱ्या दिवशी खड्ड्यात पडलेले वळवळणारे साप दिसायचेही.
हे बंकर्स आणि स्नेक स्ट्रेचिंगसाठीचे खड्डे खोदणं, तंबू
लावणं वगैरे कामही असायचीच.. फक्त तेथील संबंधित हायर रँकचे क्लास वन ऑफिसर्स आणि
ज्युनिअर कमिशन्ड ऑफिसर्स (जेसीओ) यांना या कामातून सूट असायची. अर्थात इतरांकडून
कामं नीट करून घेणं ही त्यांची जबाबदारी असायचीच, म्हणजे काम सांगून हा स्वत: आत
तंबूत जाऊन झोपला असं नसतं, त्या अधिकाऱ्यालाही लक्ष ठेवण्यासाठी जागावंच लागतं.
तो लष्करी तंबू असतो, सरकारी ऑफिस नव्हे.
पण या कामातून प्रसंगी कधी कधी मोकळीकही मिळायची, तेही
अधिकाऱ्यांकडूनच.. एखादी जादा येत असलेली भाषा मदतीला धावून यायची, काय.. आता हे कसं?
सांगतो पुढच्या भागात..
(क्रमशः)



No comments:
Post a Comment