Tuesday, 21 June 2016

बाबांवर मी बोलतो काही (लष्करी जीवन – भाग ५)

एखादी जादा येत असलेली भाषा सैन्यात मदतीला धावून कशी येऊ शकते? हा फायदा बाबांनाही झाला होता. आता हे कसं? सैन्यात असताना काय असतो फायदा अशी एक्स्ट्रा भाषा अवगत असेल तर..

सातवीपर्यंत इकडे मराठी माध्यमात शिक्षण झाल्यावर पुढे सातवीनंतर बाबा केरूर भागात राहिले असल्याने तेव्हा कन्नड भाषेतूनही शिक्षण झाले होतेच. त्यावेळी काकांकडे राहताना घरातली काही कामे करत करतच ते सांभाळून शिक्षण, दरम्यान त्या भागातून सतत जाणारी एअरफोर्सची विमाने पाहत मनात उत्पन्न झालेले सैन्याचे आकर्षण, त्यापायी एकदा मित्रांसोबत थेट बेंगलोरला पळून जात येळहांका एअरफोर्स स्टेशनवर मारलेली धडक असा सगळा मामला काहीच वर्षांपूर्वी बाबांच्या बाबतीत घडून गेलेला होता.

६५ साली सैन्यात भरती झाल्यावर सैन्याचे ५६ आठवड्यांचे ट्रेनिंगही ३२ आठवड्यात पूर्ण करण्यात आले होते. ६२ आणि ६५ च्या युद्धात झालेला प्रचंड लॉस, ती जीवितहानी लवकरात लवकर भरून काढण्यासाठी केलेली उपाययोजना म्हणजे इकडे वाढवलेला हा असा रनरेट, नवीन फळी एएसएपी तयार झाली पाहिजे ना.. कारण पुढचं युद्ध कधी होईल सांगता येत नाही.. जे झालंच पुढे सहा वर्षात १९७१ साली.

ट्रेनिंगच्या काळात कुठेही कॅम्प गेला की ट्रेनी सैनिकांना शक्यतो पहिले काम म्हणजे तिथे तंबू उभारणं, स्नेक स्ट्रेचिंगसाठी खड्डा खोदणं वगैरे. कधी शत्रूची चाहूल लागली किंवा काही टीप मिळाली की तिथे जवळपासच्या भागात जाऊन तळ ठोकणं.. टिल फर्दर ऑर्डर.. मग हे कॅम्प लागले की खुदाईकाम आलेच. तिकडून पाकिस्तानची काही चुळबूळ, हेरगिरी वगैरे सुरु असली की वायरलेसहून येणारे मेसेजेस कॅच करणं हे टेक्निकल टीमचं पहिलं काम.. आणि त्याबरहुकूम इकडची आपली लाइन ऑफ एक्शन ठरवणं. त्यांची भाषा अर्थात उर्दू, हिंदी.. ते मेसेजेस इकडे डिकोड करता यायचे, तेव्हा पंजाबी, यूपीमधल्या उत्तर भारतीय वगैरे सैनिकांना फायदा कारण त्यांचे हिंदी चांगले, मग त्यांना खुदाईकामातून मोकळीक मिळून या कामात गुंतवून ठेवले जायचे. येणारे मेसेजेस किंवा जितके कॅच करता येतील ते डिकोड करून सांगणे, मग इकडे पुढची हालचाल करता यायची.

...आणि इथे फायदा होतो भारतीय सैन्याला भारत बहुभाषिक असण्याचा. कारण पुढच्या आपल्या हालचाली, त्यासाठी होणारे संभाषण किंवा जनरल गोष्टीही जेव्हा पाकडे कॅच करायचे तेव्हा त्यांना ते समजू नये, डिकोड करता येऊ नये याची पूर्ण काळजी घेतली जायची/जाते. म्हणजे आपल्याकडे असतात तसे त्यांच्याकडेही ट्रान्सलेटर्स असतातच, पण गंमत म्हणजे पाकिस्तानी गोटात हिंदी, मराठी, बंगाली, पंजाबी, गुजराती अशा भाषा डिकोड करून अर्थ सांगणारे होते, कारण या भाषा त्यांच्या हिंदीलाही तशा जवळच्याचं आहेत आणि लिपीतही फारसा फरक नाही.. पण कन्नड, तमिळ, तेलुगु, मल्ल्याळमसारख्या दाक्षिणात्य भाषांचे काय? त्या या पाकड्यांना घंटा कळत नाहीत. आणि इथेच भारताचा फायदा व्हायचा.

इकडे आपल्याआपल्यात काय बोलणं चाललंय ते शत्रूला कळू नये म्हणून ही सगळी दक्षता. एकमेकांत इकडे वायरलेसहून येणारे मेसेजेस, त्यांच्या गोटातले कॅच केलेले सांकेतिक किंवा साधे संदेश आणि रिसिव्हिंग एन्डला इकडे बसून ते डिकोड करणे आणि इन चार्ज ऑफिसरला माहिती देणे, रिपोर्ट करणे हे अशा अतिरिक्त भाषा येणाऱ्यांचे काम. त्यामुळे मग अशी स्कीम करायची असली की दाक्षिणात्य भाषा येणाऱ्यांना खुदाईकामातून सूट आणि तंबूत टेक्निकल टीमची मदत करणे हे काम..

‘वो पुजारी को इधर भेजो, कन्नडा में बोलना है, समझना है.. जाओ ये खुदाई तुम करो’ वगैरे आदेश सुटायचे. या सगळ्याचा फायदा डायरेक्ट फ्रंटवर... मग ती एखादी छोटीशी चकमक असो की प्रत्यक्ष मोठे युद्धच.. कारण ठरल्याप्रमाणे आपले सैनिक कन्नड, तमिळ वगैरे भाषेची चेन करून बोलायचे.

कधी कधी शत्रूची दिशाभूल होण्यासाठी मध्येच काही हिंदी किंवा उर्दू शब्द टाकायचे, जेणेकरून तो तेवढाच शब्द पकडून शत्रू काहीतरी हमखास चुकीचा अंदाज लावून त्याप्रमाणे त्याचा प्लान ठरवणार आणि मग इकडे चकमकीत आपल्यालाहवी ती बाजू शत्रूकडून ढिली व्हायची किंवा कधी आपणच एखाद्या दिशेकडून आधीच सैनिक पेरून ठेवायचे आणि मेसेजमध्ये बोलताना मुद्दाम ‘अंडू गुंडू अंडू गुंडू पहाडी की पीछेसे अपना ट्रूप क्लियर करो, सबको वापस बुलाओ अंडू गुंडू’ (इथे अंडू गुंडू म्हणजे कोणतीही दाक्षिणात्य भाषा, मला येत नाही म्हणून सोय) वगैरे पावशेर टाकायचं.झालं.. शत्रू गंडला खुश होऊन तिथे जाऊन.




अर्थात कधी कधी संपूर्ण संभाषणंच दाक्षिणात्य भाषेत व्हायची. बहुतेकदा गन पोझिशनवरून (GP) ऑब्झर्व्हेशन पोस्टला (OP) जाणारे अतिशय महत्त्वाचे मेसेजेस शत्रूने कॅच करू नयेत म्हणून या अशा दाक्षिणात्य भाषांचा तिथे उपयोग केला जायचा. GP आणि OP दोन्हीकडे अर्थात तसे सक्षम भाषाप्रभुत्व असलेले, गरज पडल्यास सांकेतिक भाषेतून बोलू शकणारे सैनिक असायचे जे ट्रान्समीटर्स आणि रिसिव्हर्स म्हणून त्यांची कामगिरी चोख पार पडायचे. बाकी मेसेज डिकोड करणारी, ट्रान्सलेट करणारी टीम मदत म्हणून असायचीच. ‘हे हे अमुक बोलायचंय.. बोल कन्नडमधून’ असं सांगणारे ऑफिसर्स तिथे असायचे. हे असं दोन्ही एन्ड्सना चालायचं. जे पोचवायचंय ते सहकाऱ्याला हिंदी वा इंग्रजीत सांगणे, मग त्याने ते कन्नड, तमिळमध्ये वगैरे तिकडे पोचवणं आणि तिकडे हीच क्रिया उलट, म्हणजे कन्नड समजून घेऊन ते हिंदीतून सांगणे, त्यावरील उत्तर हिंदीत ऐकून कन्नडमध्ये पोचवणं.. आणि असं कितीही वेळ.

कधी कधी तास दोन तासातून एखादा मेसेज.. पण दोन्ही बाजूंचे सैनिक कानात प्राण आणून ते ऐकत बसलेले असतात. तशी प्रक्रिया फार वेळखाऊ, नि किचकट, पण शत्रूला थांगपत्ता लागू नये म्हणून तितकीच गरजेचीही. या सगळ्याचा आढावा घेऊन त्यानुसार योजना आखत फ्रंटवर काय व्हावे, तोफा अमुक अंतर मागे घ्या, पुढे घ्या, या दिशेने आणखी सैन्य पाठवा, इकडे इतकी रसद पुरवा, किंवा कधी तिकडून त्यांची स्वत:हून काही हालचाल होईपर्यंत ढिम्म रहा वगैरे ऑर्डर्स देणारा अधिकारी पुढे असायचा.

पण नेमके आर्टिलरीचे काम कसे चालते? तोफखान्यात काम करताना तिथल्या जबाबदाऱ्या काय असतात, त्याना तोफांबद्द्ल खास असे काय शिकवले जाते? पाहू पुढच्या भागात..
(क्रमश:)

No comments:

Post a Comment