आपली परंपराच आहे ज्या खेळाडूंकडून मेडलची अपेक्षा असते, त्यांच्यापेक्षा दुसरेच कुणी ऑलिम्पिकला आपल्याला मेडल्स जिंकून देत आलेत. ९६ च्या अटलांटा ऑलिम्पिकला पेस नवखा होता, तो ब्रॉन्झ जिंकून आला, आणि तेही एकेरीत. २००० सिडनी - मल्लेश्वरी वेटलिफ्टिंगमध्ये ब्रॉन्झ मेडलच वजन पेलून आली (आणि दुर्दैवाने पुढच्या काळात आपला कुणी आदर्श ठेवू नये याचीही तजवीज तिने उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी सापडून करून ठेवली) २००४ अथेन्समध्ये मिलिटरीमन आणि आत्ताचा खासदार राज्यवर्धनसिंग राठोडने सिल्व्हर जिंकलं. तो डबल ट्रॅप हा नेमबाजीचा प्रकारच बघताना जाम आवडला होता. २००८ बीजिंगला अभिनव बिंद्राने तर डायरेकट गोल्ड मेडलच जिंकलं. २०१२ लंडनला विजयकुमार, गगन नारंग हे पुन्हा शूटिंगमध्ये चमकले तर सुशीलकुमार, योगेश्वर दत्त कुस्तीत जिंकले. सायना आणि मेरी कोमनेही मेडल जिंकून भारताला एकूण सहा मेडल्स मिळवून देत षटकार मारला. यावेळीही हीच परंपरा राखत ज्या फारशा लाईमलाईट मध्ये नव्हत्या, त्या सिंधू सिल्व्हर मेडल आणि साक्षी मलिक ब्रॉन्झ मेडल जिंकून आल्या.
यावेळीही नेहवाल, अभिनव बिंद्रा, सानिया मिर्झा - बोपन्ना यांच्याकडे डोळे लागून राहिले होते. पण स्पर्धा सुरु होण्यापूर्वी टेस्ट इव्हेन्टमध्ये दीपा कर्माकरने कमला करून दाखवली. ती करमरकर नसून कर्माकर आहे हे आपल्या प्रिंट मीडियाला समजायच्या आत तिची फायनल फेरीही झाली नि त्यातही शानदार प्रदर्शन करत ती चौथी आली. खरंतर तिचा परफॉर्मन्स झाला तोपर्यंत ती सिल्व्हर मेडलची दावेदार झाली होती, पण तिच्यानंतर जिम्नॅस्टिक्स खेळातील स्वित्झर्लंडची वर्ल्ड नम्बर २ आणि मग अमेरिकेची नम्बर १, सध्याची वर्ल्ड चॅम्पियन यांनी अतिकमाल करून दाखवल्याने दीपाचे पदक हुकले. चौथा नम्बर या ऑलिम्पिकला सुटत नाही असं काहीसं तोपर्यंत वाटू लागलेलं होत, कारण दीपाच्या आधी बीजिंग ऑलिम्पिकचा गोल्ड मेडलिस्ट अभिनव बिंद्राही त्याच्या आवडत्या हातखंडा १० मीटर एअर रायफलमध्ये उत्तेजनार्थ आला. लास्ट शॉटच्या आधी त्याची रायफल तुटल्यानेही अर्थात त्याच्या कामगिरीवर परिणाम झाला असणारच. पण मेडल तर हुकले ते हुकलेच ना! भर म्हणून गगन नारंगही बाहेर पडला. गेल्या सलग तीन ऑलिम्पिकमध्ये हक्काने मेडल मिळवून देणाऱ्या शूटिंग मध्येच भारताची ही वाताहत आणि बाकी काही खेळात तर क्वालीफाय होण्यापासून सुरुवात.
आपले टेनिस आउट झाले. मिश्र दुहेरीत अँडी मरेसारख्याच्या जोडीला हरवल्यावर पुढे ब्रॉंझ मेडलसाठी झालेल्या सामन्यात मिर्झा- बोपन्ना जोडीने दोन सरळ सेट्समध्येच रॅकेट टेकली. हॉकीत ३६ वर्षांनी आपण क्वार्टर फायनलला गेलो, आणि १-० ने लीड घेऊनही बेल्जीयमला नंतर ३ गोल करू दिले. स्पर्धेत तोवर २७ पैकी फक्त ७ पेनल्टी कॉर्नर्स गोलमध्ये कन्व्हर्ट करण्यात आलेले यश (!) त्या सामन्यातही सुरूच राहिले आणि हॉकी टीम बाहेर पडली. दीपिका कुमारीच्या आर्चरी टीमने 'इकडून वाऱ्याचा वेग होता' वगैरे कारणे देत गाशा गुंडाळला, आणि त्यांना हरवणारे महिला मंडळ म्हणाले की 'आमच्या गेमची वेळ पाहता वारा असणार हे गृहीत धरूनच आम्ही सराव केला, म्हणून जिंकलो'.
बॅडमिंटनमध्ये श्रीकांत बाहेर पडला असला तरी त्याने क्वार्टरमध्ये या खेळातला सध्याचा बापमाणूस लिन डॅनला जबरी फाईट दिली होती. पूर्वी ऑलिम्पिक मेडल जिंकलेल्या योगेश्वर दत्तची कुस्ती यावेळी अगदी शेवटच्या टप्प्यात होती, पण तोही हरला.
खरी कमाल केली ती साक्षी मलिकने. रोहतक से रिओ तक हा तिचा प्रवास खरंच अचंबित करणारा आहे. ती नुसती ब्रॉन्झ मेडलच्या लढतीत टिकलीच नाही तर तिने पिछाडीवरून पुढे येत गेम जिंकला. कुस्ती संपायला केवळ तीन मिनिटं बाकी असतानाही ती ०-५ अशी मागे होती. आणि गेम संपला तेव्हा तिने स्कोरबोर्ड ८-५ असा करत मेडल जिंकलं होतं, हे खरंच कौतुकास्पद. सायना नेहवाल आणि आपली पुरुष हॉकी टीम आघाडी घेऊनही शेवटी मॅच हरत असताना साक्षीने दाखवलेली जिगर इतर खेळाडूंना प्रेरणा देणारीच.
खरी कमाल केली ती साक्षी मलिकने. रोहतक से रिओ तक हा तिचा प्रवास खरंच अचंबित करणारा आहे. ती नुसती ब्रॉन्झ मेडलच्या लढतीत टिकलीच नाही तर तिने पिछाडीवरून पुढे येत गेम जिंकला. कुस्ती संपायला केवळ तीन मिनिटं बाकी असतानाही ती ०-५ अशी मागे होती. आणि गेम संपला तेव्हा तिने स्कोरबोर्ड ८-५ असा करत मेडल जिंकलं होतं, हे खरंच कौतुकास्पद. सायना नेहवाल आणि आपली पुरुष हॉकी टीम आघाडी घेऊनही शेवटी मॅच हरत असताना साक्षीने दाखवलेली जिगर इतर खेळाडूंना प्रेरणा देणारीच.
अशी प्रेरणा मिळाली की काय होतं, तर एक ब्रॉन्झ खिशात येऊन २४ तासही उलटत नाहीत, तेवढ्यात अजून एका मेडलची आपल्यासाठी निश्चिती होते.. कारण पी व्ही सिंधूने सेमीफायनलमध्ये अपोनंटला अक्षरश: लोळवलेलं असतं. रँक १० ची सिंधू क्वार्टर आणि सेमीजमध्ये अनुक्रमे रँक २ आणि रँक ६ ला हरवते हे खूपच भारी. पण तिची फायनल आणखी खडतर होती.. कारण टक्कर होती वर्ल्ड नंबर १ कॅरोलिना मरीनशी. ही स्पेनची खेळाडू स्पेनमध्ये 'लेडी नदाल' म्हणून ओळखली जाते. कारण दोघेही डावखुरे, दोघांचाही खेळ प्रचंड फास्ट आणि प्रतिस्पर्ध्याला कायच्या काय दमवणारा- त्यांची एनर्जी शोषून मग त्यांना नमवणारा, दोघांनीही नंबर वनपद भूषवलंय. बाकी खेळताना मरीन खेळते जास्त की किंचाळते जास्त हा पीएचडीचा विषय! अर्थात हिलाच हरवून आपल्या सायनाने २०१४ ला ऑस्ट्रेलियन ओपन जिंकली होती, पण मग बदला घेत या मरीनने मागच्या वर्षीची ऑल इंग्लड ओपन सायनालाच फायनलला हरवून मारली होती. यावेळी सायनाकडून फार अपेक्षा असताना नेमके दुखापतीनी तिला बेजार केले आणि तिचा खेळ अपेक्षेप्रमाणे झाला नाही, त्यात मतभेद होऊन गोपीचंदसारख्या द्रोणाचार्य कोचपासून फारकत घेण्याचाही परिणाम अलीकडे तिच्या खेळावर दिसून येतोय. तेच श्रीकांत आणि सिंधू मात्र अजूनही गोपीचंदचे शिष्य असल्याने ऑलिम्पिक गाजवत राहिले.
सायना आणि मेरी कोमसारखे आपले काही खेळाडू आपापल्या खेळात वर्ल्ड नम्बर वन होतात, पण नेमके ऑलिम्पिकसारख्या बिगेस्ट प्लॅटफॉर्मवर मात्र सिल्व्हर किंवा ब्रॉन्झमध्ये समाधान मानतात. यावेळी सिंधूचा फॉर्म पाहता तिला गोल्ड जिंकायचा भारीच चान्स आहे. गेल्या लंडन ऑलिम्पिकमध्ये आपण आजवरची सर्वात जास्त म्हणजे सहा मेडल्स जिंकली होती, यावेळी तर १२० जणांचा संघ पाठवल्यावर अपेक्षा जास्त होत्या. पण स्पर्धा संपत आली तरी खाते उघडलेच जात नव्हते.. ९२ च्या बार्सिलोना ऑलिम्पिकलाही असेच शेवटचे आपण हात हलवत शून्य कमाईने परत आलो होतो, पण नंतर प्रत्येकवेळी मेडल्स जिंकत आलोय. आणि यंदा तर हुकमी एक्के एकेक करून बाहेर पडताना पाहून यावेळीही तेच होतंय की काय असं वाटू लागलं होतं. मेडल्सची पाटी कोरी बघून शोभा डेसारख्यांना उगाच आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या (सिंधू फायनलला जाताच या बाईने सिंधू - सिल्व्हर प्रिन्सेस असं ट्विट टाकून आणखी शोभा करून घेतलीच आहे, म्हणजे गोल्ड जिंकणारच नाही हा किती विश्वास!). पण जाऊदे, एक स्त्रीच जसे दुसऱ्या स्त्रीचे दुःख समजून घेऊ शकते म्हणतात, तसेच एक स्त्रीच दुसरीला तोंडावरही पाडू शकते हे सिंधू आणि साक्षीने मेडल आणून सिद्ध केलंच.
टीप: सुलतान सिनेमात हिरो ऑलिम्पिक मेडल जिंकून ३०० कोटी कमावतो, तर अशी मोठी रक्कम अशा काही कष्टाळू टँलेन्टेड खेळाडूंना शोधून घडवण्यात, पैलू पाडण्यात, त्यांना सुविधा देण्यातही खर्च व्हावी ही आता काळाची गरज आहे. तरच अशा मोठ्या स्पर्धा आल्या की सोशल मीडियावर फिरणारे जोक्स आणि शोभा डेसारख्यांची वटवट थांबेल.
-- पराग



No comments:
Post a Comment