एखाद्या टीव्ही मालिकेत मनोरंजन क्षेत्रातल्या इतर कलाकारांनी पाहुणे कलाकार म्हणून काम करणे नवीन नाही. पण 'द बिग बँग थियरी' ही सिरीज याबाबतीत जरा वेगळी आहे. यामध्ये इतर क्षेत्रातील दिग्गजांनाही गेस्ट एक्टर्स म्हणून पाचारण केले जाते. नुकतेच निधन झालेले प्रसिद्ध सायंटिस्ट स्टीफन हॉकिंग हेही या सिरीजच्या सात एपिसोड्समध्ये होते. त्यांना संवादही मस्तपैकी सिरीजमधील इतर कलाकारांची खेचणारे दिले होते - स्पेशली शेल्डन कूपरची. मुळात सिरीजची मुख्य पात्रेच सायंटिस्ट्स असल्याने सतत सायन्स, फिजिक्स, मॅथ्स, बायोलॉजी वगैरे निगडित संदर्भ मालिकेत येत असतात आणि त्यातूनच लेखक, कलाकार दर्जेदार बौद्धिक विनोदनिर्मिती करतात. प्लस सतत होत राहणारी सिच्युएशनल कॉमेडी वेगळीच. सायन्स बॅकग्राउंड असणारे आपल्याकडचे बरेच जण ही सिरीज वेड्यासारखे बघताना मी पाहिलेत. इंजिनियरिंगचे विद्यार्थी लेक्चर्स बंक करून तर जॉबवाले वीकेंडला लवकर उठून सीझनच्या सीझन उडवतानाही पाहिलेत. अलीकडे काहीसा तोचतोचपणा आल्यासारखा वाटणारी ही सिरीज या अकराव्या सीझनमधून मात्र दमदारपणे जुन्या धमाल ट्रॅकवर आणि त्या एंटरटेनमेंट क्वालिटीवर परत आलीये. एकूणच हा या सिरीजचा वन ऑफ द बेस्ट सीझन ठरायला हरकत नाही असं वाटतंय.
गेस्ट एक्टर्सबद्दल सांगायचं तर २९ मार्चला आलेल्या एपिसोडमध्ये तर चक्क बिल गेट्स आहेत. पेनीला बिल गेट्स यांना भेटायची संधी मिळणार असते आणि मग लेनर्ड, शेल्डन, राज, हॉवर्डसुद्धा कसे त्यांना भेटण्यासाठी तडफडतात, त्यासाठी पेनीच्या नकळत काय काय करतात अशी थीम आहे. लेखकांनी बिल गेट्सना अगदी छोट्या भूमिकेत आणि कमी संवादातूनही लेनर्डची मस्तपैकी खेचायला दिलीये. लेनर्डचा चेहरा अगदी बघण्यासारखा होतो.
क्रिएटर/ मुख्य लेखक चक लॉरी भारी आहेत राव.. 'टू अँड अ हाफ मेन', 'द बिग बँग थियरी', आणि आता बीबीटीतल्या शेल्डनचा स्पिनऑफ 'यंग शेल्डन' पणभारी चाललीये (मी पाहिलेल्यापैकी सांगतोय, इतरहीबराच खजिना आहेच त्यांचा). विनोदी सिटकॉमसाठी आवश्यक अशा कॅरॅक्टरायझेशनमध्ये त्यांचा चांगला हातखंडा दिसून आलाय मला तरी. आता काहींना पटणार नाही, पण फ्रेंड्स किंवा साइनफेल्डपेक्षाही मला टू अँड अ हाफ मेन मधले कित्येक एपिसोड्स सिच्युएशन्सदृष्ट्या सरस वाटलेत - चार्ली शीन असेपर्यंतचे म्हणजे पहिल्या आठ सीझन्सचे तर नक्कीच. (लिखाण आणि एक्झिक्यूशन दोन्ही दृष्टींनी). बारा सीझन्स चालणारी त्यांची बीबीटी ही दुसरी सिरीज. आपण तर कधीच फॅन झालो आहे त्यांचा.
बाय द वे, या शेल्डनसोबत (जिम पार्सन्स) प्रियांका चोप्राचा 'अ किड लाइक जेक' हा हॉलिवूड मूव्ही येतोय लवकरच.
No comments:
Post a Comment