ते माझेच यार होते ज्यांनी, मजवर केला प्रहार होता ,
अन हतबल झाले तेही जेव्हा, चुकविला मी तो वार होता !!
मश्गुल मीही होतो त्यांच्यात, टाकून गहाण विश्वास सारा,
माघारी माझ्या मात्र घुमला, दग्याचाच झंकार होता !!
श्वासात मैत्री - मैत्रीत श्वास, असाही एक काळ सरला
अंती पोटी माझ्या फक्त, रक्ताचाच गोळा गार होता !!
हेच आपुले दोस्त खरे, साथ कधी ना सोडीन यांची,
मनातच नष्ट आपसूक, झाला हा विचार होता !!
मित्रांप्रती अविश्वासाचा ठराव, बहुमताने झाला संमत,
प्रत्येकाच्याच नजरेत भासत, प्रत्येकजण गद्दार होता !!
जिवंत समूहात एका अलगद, आटला प्रेमाचा झरा अख्खा,
उगाच का तो शोभला, मैत्रीच्या शवावर हार होता !!
No comments:
Post a Comment