Tuesday, 10 July 2018

दुसरा गांगुली होणे नाही

* दुसरा गांगुली होणे नाही * (८ जुलै २०१८)

२००३ वर्ल्डकप फायनलपर्यंत आपण जिद्दीने गेलो, तिथे ज्यांनी आपल्याला उपविजेते बनवलं  त्यांच्या घरी त्याच वर्षाच्या शेवटी आपण दौरा केला. एडलेड टेस्टचा विजय, द्रविड सचिनची द्विशतके, लक्ष्मणची दोन शतके, आगरकरच्या सहा विकेट्स इत्यादी गोष्टींसाठी तो दौरा संस्मरणीय ठरला. पण मला नेहमीच असं वाटत आलंय की त्या दौऱ्याचा टोन खऱ्या अर्थाने पहिल्याच टेस्टमध्ये एका खेळाडूने सेट केला होता. या पहिल्याच ब्रिस्बेन टेस्टमध्ये त्याने जलद १४४ ठोकल्या, पावसामुळे टेस्ट अनिर्णीत झाली, पण त्या शतकी खेळीने आपल्या इतर फलंदाजांना मिळालेला आत्मविश्वास पुढच्या संपूर्ण सिरीजमध्ये दिसून आला. आपल्या कप्तानाने ब्रिस्बेनला ‘हे बघा, इतकी साधी आहे यांची बॉलिंग, मी १९६ मध्येच १४४ ठोकू शकतो, तर तुम्हीही पुढे हा दौरा गाजवू शकताच’ असं आपल्या बॅटने सांगत आपण त्यांच्याशी टक्कर घेऊ शकतो हा आत्मविश्वास स्वत: लीड फ्रॉम फ्रंट करत दिला होता. तो कप्तान होता अर्थात सौरव गांगुली - आजचा बर्थडे बॉय. हॅपी बर्थडे सौरव!!!

जून १९९६ पर्यंत खुद्द सौरवलाही वाटलं नसेल की तीन आठवड्यात येणाऱ्या आपल्या बर्थडेपूर्वी आपल्या नावावर दोन शतके असतील आणि आपण पदार्पणातच सामनावीर, मालिकावीर झालेले असू. त्या इंग्लंड दौऱ्यावर सरदारजी सिद्धूचे कप्तान अझरशी कहीतरी वाजले आणि मध्येच दौरा सोडून त्याने भारताचे विमान पकडले. मग सलामीला आपण नयन मोंगिया आणि विक्रम राठोड वगैरे महानुभाव पाठवले. संघात रिकामी झालेली सिद्धूची जागा गांगुलीला मिळाली, आणि त्याच लॉर्डस टेस्टच्या दिवशी सकाळी अनफिट ठरलेल्या संजय मांजरेकरच्या जागी राहुल द्रविडला संधी मिळाली. या लॉर्डसवर गांगुलीने दिमाखदार शतकी पदार्पण केलेच, पण लगेच पुढच्या टेस्टमध्येही शतक मारले. जोडीला काही विकेट्स घेऊन तो चक्क मालिकावीरही झाला. ही अशी सुरुवात कोणत्याही खेळाडूसाठी स्वप्नवतच, मग चार वर्षांपूर्वीच वनडेत संधी मिळूनही बाहेर झालेल्या खेळाडूसाठी तर अगदीच विशेष. पुढे सहारा सिरीजमध्ये तर पाक टीमवर जणू एकहातीच दादागिरी करत पाचपैकी चार सामन्यात तो सामनावीर झाला. १९९९ वर्ल्ड्कपला काय करावं या माणसानं.. गतविजेत्या श्रीलंकेची बॉलिंग वास, मुरलीसकट झोडपून काढत तब्बल १८३ धावा हाणल्या, पुढे तो आपला कप्तानही झाला. (किंबहुना वनडेत जो १८३ करेल तो टीमचा कप्तान हा सिम्पल क्रायटेरिया त्याच्यापासूनच सुरु झाला जो पुढे धोनी, कोहलीने आणखी मजबूत केला.)

२००० साली मॅच फिक्सिंगच्या वादात अडकलेल्या आपल्या टीमचा त्याला कप्तान करण्यात आले आणि त्याची खरी परीक्षा सुरु झाली. खेळाडू म्हणून त्याची सुरु असलेली दादागिरी आता कप्तान म्हणूनही सुरु राहते का याकडे अर्थात अनेकांचे लक्ष. अझरच्या अत्यंत नकारात्मक पॅसिव्ह नेतृत्वाची सवय झालेल्या आपल्या टीमला गांगुलीच्या सकारात्मक आक्रमक नेतृत्वाखाली रुळायला थोडा वेळ लागला जरूर, पण मग टीम जी काय सुटली ती सुटलीच.



गांगुलीचे कप्तान म्हणून खरे यश दोन गोष्टीत आहे. एक म्हणजे परदेशात आपल्याला कसोटी जिंकायला त्याने शिकवलं. हे कुंबळेने गांगुलीच्या फेअरवेल सेरेमनीतही अभिमानाने सांगितले होते. आणि दुसरं म्हणजे गुणी खेळाडूंना पारखून घेत त्यांना घडवणं. यात सेहवाग, युवराज, झहीर, हरभजन आणि धोनीही आला. पण तो फक्त तरुण खेळाडूंना पाठिंबा देत सीनियर खेळाडू त्यांची काळजी स्वत: घेतील असं म्हणत राहिला का? तर तसंही नाही. आणि इथेच तो जास्तच आवडून जातो. २००३-०४ च्या त्याच ऐतिहासिक ऑसी दौऱ्यावर फॉर्मशी झगडत असलेल्या कुंबळेला पाठवायला निवड समिती राजी नव्हती. तेव्हा हाच होता तो वॉरीयर प्रिन्स जो मीटिंगमध्ये म्हणाला होता की 'कुंबळे तिथे परफॉर्म करेल, विश्वास ठेवा. त्याचे नाव टीममध्ये नसेल तर मी इथून उठणारच नाही. आणि तो जर तिथे फेल गेला तर मी कप्तानी सोडेन'. स्वत:ची पोझिशनही पणाला लावत इतका टोकाचा सपोर्ट अनुभवी आणि योग्य खेळाडूला देताच काय झालं, तर कुंबळेने त्या दौऱ्यावर सर्वाधिक २४ विकेट्स घेतल्या. खेळाडू ज्युनियर असो की सीनियर, कप्तानाचा तुमच्यावर विश्वास असेल तर कामगिरी आणखी बहरते ती अशी. तो ऑसी दौरा गाजवून झाला, मग पाक दौरा जिंकून झाला, पहिले शतक ठोकल्यावर जिथे आपल्या सहकाऱ्याना टाळ्या वाजवताना पाहिले त्याच लॉर्डसच्या ऐतिहासिक गॅलरीत नॅटवेस्ट सिरीज जिंकल्यावर शर्टही काढून झाला. 

मग २००४ नागपूर टेस्टच्याच वेळी या लढाऊ दादाला काय झालं? ऑस्ट्रेलियाविरुद्ध टेस्ट सुरु होताना काही वेळ आधी पिचवरचे गवत पाहून माघार घेणारा हा कप्तान टीमला नवीन होताच पण मनोबल खच्ची करत बुचकळ्यातही टाकून गेला. पुढे त्याच्या बॅटनेही संप पुकारायला सुरुवात केली. हे कमी म्हणून की काय ज्याला त्यानेच हट्टाने आपला कोच म्हणून आणले त्याच ग्रेग चॅपेलशी वाद झाल्यावर तर त्याच्यासाठी टीमचे दरवाजेच बंद झाले. २००३ फायनलला नेणारा कप्तान २००७ वर्ल्डकपला असेल तरी की नाही असं वाटू लागलं. हे सगळंच तमाम क्रिकेटप्रेमींसाठी शॉकिंग होतं. पुढे २००६-०७ साउथ आफ्रिका दौऱ्यासाठी त्याची निवड झाली ती त्याची चांगली डोमेस्टिक कामगिरी पाहून नि आफ्रिकेविरुद्धचे त्याचे चांगले रेकॉर्ड लक्षात घेऊन. महाराजाने संधीचे सोने केले आणि तिथे आपल्याकडून सर्वाधिक धावा त्याच्याच बॅटने ठोकल्या. मग वनडेतही चार अर्धशतके मारून वर्ल्डकपसाठी त्याची बॅट जोरजोरात निवड समितीचा दरवाजा ठोठावू लागली आणि निवड होताच तो २००७ वर्ल्डकपमध्येही चांगला खेळला. मग भारतात पाकविरुद्ध टेस्टमध्ये सलग दोन शतके, त्यातील एक २३९ हे तर त्याचे कारकिर्दीतील एकमेव द्विशतक. पण तरीही पुन्हा ऑस्ट्रेलियातल्या सीबी सिरीजसाठी त्याला डावलण्यात आलं. मग खराब श्रीलंका दौरा झाल्यावर आपल्याला सिरीजगणिक जज केलं जातंय हे लक्षात आल्यावर त्याने पुढे फार करियर लांबवलं नाही आणि सन्मानाने निवृत्त झाला. पण पुनरागमन कसं असावं हे त्याने दाखवून दिलं हे नक्की. अद्भुत टेस्ट पदार्पण केल्यावरही तो टेस्टपेक्षा वनडे क्रिकेटर म्हणून जास्त ओळखला गेला, पण पुन्हा संघात येण्यामागची त्याची प्रेरणा २००७ वर्ल्डकप खेळणे ही नव्हती तर शंभर टेस्ट्स खेळणे ही होती हे त्यानेही सांगितलंय, त्याच्या पुस्तकातूनही हे समजतं. 

शेवटी गांगुली गांगुली म्हणजे कोण? तर शैलीदार गगनचुंबी षटकार ठोकणारा हुकमी एक्का म्हणजे गांगुली, समोर स्पिनर असताना तीनचार बॉल डॉट खेळल्यावर ‘आता पुढचा बॉल स्टेडियमबाहेर बघ’ अशा पैजा आम्ही ज्याच्या बॅटिंगवर लावल्या तो गांगुली, ज्याला अप्रोच करण्याची बुकींची जन्मात हिंमत झाली नाही तो कप्तान गांगुली, गाय विठ्ठल, महेंद्रसिंग ढोणी, लुंगी निगडी अशी नावे छापणाऱ्या मराठी वृत्तपत्रांनी ज्याचे नाव सुरुवातीच्या काळात बहुतेकवेळा सौरभ असे छापले तो गांगुली (आणि वर आपण म्हणतो की बंगाली लोक व ला ब म्हणतात), पहिल्या टेस्टपासून संपूर्ण टेस्ट करियरमध्ये एकदाही सरासरी चाळीसपेक्षा कमी न आलेला एकमेव भारतीय क्रिकेटर म्हणजे गांगुली, टेस्ट करियरचा शेवट शून्यावर बाद होऊन याबाबतीत ज्याने डॉन ब्रॅडमनशी साधर्म्य साधले तो गांगुली, फक्त भारतीयच नव्हे तर सर्वोत्तम जागतिक कप्तानांपैकी एक म्हणजे गांगुली, वनडेत एकवेळ सचिनच्या वेगालाही मागे टाकेल असा शतकांचा धडाका ज्याने लावला तो गांगुली, द्रविडसारख्या तंत्रशुद्ध खेळाडूकडून ‘गॉड ऑफ ऑफसाईड’ ही पदवी मिळून पुढे त्याच नावाने जगात फेमस झाला तो गांगुली, ज्याने भारतीय कोच निवडताना स्काईपवरून मुलाखत देणाऱ्या रवी शास्त्रीला आधी इंगा आणि मग ठेंगा दाखवला तो गांगुली, ज्याला भाजपने तू आमच्यात ये - तुला क्रीडामंत्री करतो अशी ऑफर दिली तो गांगुली, जो बंगालमधील आपल्या आवडत्या दुर्गापूजा यात्रेत लोकांनी आपल्याला ओळखून आपल्याभोवती गर्दी करू नये म्हणून दाढी लावून हरभजनची पंजाबी पगडी घालून गेला तो गांगुली, घरातून विरोध असताना डोनासोबत पळून जाऊन ज्याने लग्न केलं तो गांगुली (आणि बिचाऱ्या चॅपेलला कधी कळलंच नाही की हा इतका बंडखोर कसा), निवृत्तीनंतरही बंगाल क्रिकेट असोसिएशन आणि बीसीसीआय टेक्निकल कमिटी ज्याने सांभाळली तो गांगुली, ज्याच्यामुळे ८ जुलै हा भारतीय मीममेकर्ससाठी नॅशनल अग्रेशन डे झाला आहे तो गांगुली. ऑस्ट्रेलियन क्रिकेटप्रेमी जर सिडनी क्रिकेट ग्राउंड SCG म्हणून मिरवत असतील तर आम्हीही ज्याला SCG म्हणून डोक्यावर घेऊन अभिमानाने मिरवतो तो सौरव चंडिदास गांगुली.  

होय, गांगुली असा बराच काही आहे.. पण माझ्यासाठी तो दोन कारणांसाठी जास्तच खास आहे दिल के पास आहे. हे सौरवा, तुला माहीत नसेल तर तुला म्हणून सांगतो, की मी या लिखाणाच्या क्षेत्रात येण्यामागे आणि आल्यावरही तू कसा मला सोबत करत राहिलायस ते. म्हणजे असं बघ, इंजिनियरिंग सेकंड इयरला असताना आम्ही तुझ्या आणि चॅपेलच्या तेव्हाच्या वादावर कॉलेज गॅदरिंगमध्ये कॉकटेल ड्रामा सादर केला आणि प्राईझही जिंकलं. ते लिहिताना, बसवताना मला मजा आली. चॅपेलवर खूप टीका होते आणि तू पुनरागमन करून २००७ वर्ल्डकप भारी खेळतोस हे आम्ही दाखवलं नि पुढे झालंही तसंच. तेव्हा वाटलं की पुढेही लिहित रहावं. दुसरं म्हणजे अलीकडे आम्ही सचिनवर एक सचिन स्तोत्र केलं, त्याला उत्तम प्रतिसादही मिळाला. नंतर मी माझा सबकॉन्शस जरा खणून पाहिला की हे गाणं मला का करावंसं वाटलं, तर तिथेही एका अर्थी तुझीच प्रेरणा होती. कारण सचिनचा मूव्ही येण्यापूर्वी काही दिवसच आधी तुझ्यावरची ‘द वॉरीयर प्रिन्स’ ही झकास डॉक्युमेंटरी मी युट्युबवर पाहिली होती (जी मला खरंतर सचिन मूव्हीपेक्षाही आवडली), त्यामध्ये शेवटी तुझ्यावर ‘ऑटोग्राफ दियो’ हे अप्रतिम बंगाली गाणं येतं, तेही अगदी अमिताभ बच्चन यांच्या आवाजात सुरुवात होऊन. तसं मग आमच्याकडूनही कदाचित सचिनवर एक मराठी गाणं झालं. अर्थात गाणं करताना हे खरंच काही डोक्यात नव्हतं, पण एडिटिंगच्या वेळी मात्र रेफरन्स म्हणून ‘ऑटोग्राफ दियो’च जेव्हा पहिल्यांदा आठवलं तेव्हा सबकॉन्शस खोदकाम सुरु झालंच. अजून एक यात वाढवायचंच तर आत्ता या लेखाच्या निमित्ताने लॅपटॉपवर तब्बल किमान दीड वर्षांनी काहीतरी लिहितोय तेही तुझ्यामुळेच, तुझ्यासाठीच.  

असो, सौरव तुला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. भारतीय क्रिकेटसाठी तू प्रशासक, समालोचक म्हणून योगदान देतो आहेसच.. पण खरी इच्छा आहे ती तुला बीसीसीआय प्रेसिडेंट झालेला पहायची.   तुझ्यावर लिहिलं नाही म्हणून मी आजवर (एक चॅपेल सोडल्यास) अनेकांकडून बोलणी खाल्ली आहेत, अगदी हे लिहित असतानाही व्हॉट्सअपवर एका जिवलग कट्टर गांगुलीप्रेमी मित्राकडून टोमणा पचवला आहे की ‘काल धोनीवर लिहिलास, आज गांगुली तेवढा महत्त्वाचा नाही वाटतं तुझ्यासाठी’.. अरे आम्ही द्रविडप्रेमी आहोत म्हणून किती परीक्षा घ्याल संयमाची. तसंही लिहिणार होतोच की. असो, या निमित्ताने खूप दिवसांची माझीही सल खरंच दूर होतेय. लेख मोठा झाला, पण तू माणूस पण मोठा आहेस ना.. 

कधी भेट झालीच तर नक्की ऑटोग्राफ दियो महाराजा... 

#पराग_पुजारी  

माही माहीss

तुझे मिलके लगा है ये 
तुझे ढूंढ रहा था मैं.....
माही माहीss. . .

हे गाणे भारतीय क्रिकेट 'त्यालाच' उद्देशून म्हणत आलंय असं नाही वाटत?
आज त्याचा हॅपी बर्थडे :) ७ जुलै २०१८

त्याची आकडेवारी, त्याचं बॅटिंगचं विचित्र तंत्र, त्याचा हेलिकॉप्टर शॉट, त्याने जिंकलेल्या स्पर्धा, त्याचा शांत स्वभाव, त्याने क्रिझमध्ये तसेच स्टंपमागे उभे राहून केलेले अफलातून करिष्मे, त्याची कसोटीमधून तडकाफडकी निवृत्ती, त्याने सोडलेली कॅप्टनसी, या सगळ्यावर.. इतकंच काय पण त्याच्यावर आलेल्या झकास सिनेमावरही बरंच बोलून झालंय. आता तो कॅप्टनही नाही. पण..

पण काही अनोख्या गोष्टींसाठी तो कायमचा मनात कोरला गेलाय. कॅप्टन असताना हाच धोनी गांगुलीला त्याच्या शेवटच्या टेस्टमध्ये शेवटी तासभर ऑनफिल्ड कॅप्टन करतो हे कसं विसरता येईल? सचिन, सौरव, राहुलवर पोसलेल्या आमच्या पिढीला तर तेव्हा तो जामच आवडून गेला होता. बॉलआउट ओव्हर आल्यावर बोलर्स न वापरता ज्यांचा थ्रो बसेल अशा सेहवाग, हरभजन, आणि चक्क उथप्पा यांना वापरणारा धोनी आणि फायनलला पाकचे अंदाज चुकवत जोगिंदरला लास्ट ओव्हर देणारा आउट ऑफ द बॉक्स धोनी कोण विसरेल? किमान चार मल्टीटीम्स टूर्नामेंट्स जिंकणारा इम्रान खान आणि रिकी पॉन्टिंगनंतरचा फक्त तिसरा कॅप्टन ही त्याची ओळख कोण पुसेल? प्रेयसी जगच सोडून गेल्यावर त्यातून बाहेर येत पुढची आठ वर्षे सगळी एनर्जी टीमसाठी लावणारा धोनी कुणाला प्रेरणा देणार नाही? फक्त नशीब चांगलं म्हणून मिडास टच धोनी, खेळाडू नव्हे तर फक्त इंडिया सिमेंटचा ब्रँड धोनी, श्रीनिवासनचा लाडका धोनी असली शेलकी विशेषणं, टोमणे झेलूनही मर्यादेत राहणारा धोनी कुणाला कळेल? युवराजचे वडील योगराज वाट्टेल ते आरोप करत युवी-माहीच्या मैत्रीत जोर लावून फूट पाडत असताना अपमान सहन करत हिमतीने शांत राहणारा धोनी कसा असेल? याच युवीची मुरलीधरनसमोर उडत आलेली भंबेरी सतत पाहिल्याने स्वत: चौथ्या नंबरवर खेळायला जाऊन 'लीड फ्रॉम फ्रंट' असं असतं हे दाखवत वर्ल्डकप फायनलला प्रथमच पावणेतीनशे चेस शक्य करून दाखवणारा धोनी विलक्षण नव्हता का? 



सर्वात महत्त्वाचं म्हणजे जगभरात आजवर झालेल्या ४५३ कॅप्टन्सपैकी आयसीसीच्या तिन्ही मानाच्या ट्रॉफीज जिंकणारा (आतापर्यंतचा) एकमेव कॅप्टन म्हणून धोनी कायमचा मनात कोरला जाईलच ना.. मग आमचं गणित १>४५२ असं का असू नये? कोणतीही स्पर्धा जिंकल्यावर (बहुतेकदा त्यानेच फिनिश केल्यावर) ग्रुप फोटोच्या वेळी मात्र तरुण खेळाडूंना कप हातात देऊन मोठ्या मनाने स्वतः सर्वात कोपऱ्यात उभा राहणारा धोनी लक्षात राहतोच ना? आताशा तर तो अशा फोटोंच्याही पलिकडे गेलाय, कारण या वर्षी दोन वर्षे वनवास भोगून आयपीएलमध्ये पुनरागमन करताच चेन्नईला पुन्हा दिमाखात विजेतेपद मिळवून दिल्यावर ग्रुप फोटोच्या वेळी मात्र त्यावेळीच मागून पळत आलेल्या आपल्या लाडक्या झिवाशी खेळणारा प्रेमळ बाप माहीसुद्धा आपण पाहिला, असाही धोनी कुणाला आपलासा वाटणार नाही?

लव्ह यू धोनी.. आम्ही सगळे ‘साक्षी’ आहोत तुझ्या कॅप्टन्सीच्या आणि बॅटिंग - किपींगच्या झळाळत्या कारकिर्दीचे.
लवकरच तूही वनडेत दस हजारी मनसबदार हो.. ऑल द बेस्ट!
हॅपी बर्थडे माही वन्स अगेन :)

#पराग_पुजारी

Monday, 2 July 2018

'आयसीसी हॉल ऑफ फेम'मध्ये राहुल द्रविड, रिकी पॉन्टिंग आणि क्लेअर टेलर

'आयसीसी हॉल ऑफ फेम'मध्ये राहुल द्रविड, रिकी पॉन्टिंग आणि क्लेअर टेलर यांचा समावेश झाल्याची बातमी आज कळली. छान वाटलं. कसोटी आणि वनडेमधील या तिघांची कामगिरी पाहता तिघेही हा सन्मान डिझर्व्ह करतातच. मग सहज उत्सुकता म्हणून हॉल ऑफ फेमचे आजपर्यंतचे मानकरी विकिपीडियावर पाहिले. त्यातील बरीच नवे खरंच हकदार अशी, पण काही नावे खरंच आश्चर्यजनक होती की या अमुकतमुकने असं काय खास केलंय की ह्याला हॉल ऑफ फेम दिलाय, पण मग बाजूला त्यांचा देश पाहिला की फेव्हरिझम नावाची मेख लक्षात येते. हे असं करून आयसीसीने आयसिसपणा केलाय असं वाटतं मग. 




या, असे इकडून लॉजिकच्या वाटेने या, जरा जाऊ खोलात आणि घेऊ घोळात या शिंच्या आयसीसीस. विषय असा आहे की आयसीसीकडून २००९ पासून हॉल ऑफ फेमने क्रिकेटपटूंना सन्मानित करण्याची सुरुवात झाली, आणि आजवर हा सन्मान ८७ खेळाडूंना मिळाला आहे. पूर्ण लिस्ट पाहून वाटलं की इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांनी आपल्यासाठी एक वेगळं हॉल ऑफ फेम का सुरु करू नये? कारण एकूण ८७ पैकी ५३ जण या दोघांचेच आहेत - इंग्लंड २८, ऑस्ट्रेलिया २५. आशियातील खेळाडूंवर, संघांवर अन्याय किंवा दुजाभाव म्हणू फार तर, पण तो होण्याचा प्रकार इथेही दिसून येतो. भारत, श्रीलंका, पाकिस्तान हे बरीच वर्षे क्रिकेटविश्वातले तीन मेजर जायन्ट्स राहिले आहेत. पण तिघांत मिळून हॉल ऑफ फेमची फक्त एक टीम होऊ दिली आहे आयसीसीने.. भारत ५, पाकिस्तान ५ आणि श्रीलंका १ असे हे ११ जण. बाकी वेस्ट इंडिज १८ (पूर्वपुण्याईवर), न्यूझीलंड ३ आणि साऊथ आफ्रिका २ अशी आकडेवारी आहे. खरेतर फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण या तिन्हीतले विश्वविक्रम आशियाई खेळाडूंच्या नावावर आहेत. संघ म्हणूनही यांनी अनेक मोठे चषक वारंवार जिंकले आहेत. जागतिक क्रिकेटचा दर्जा एकूणच आपल्या कामगिरीने यांनी आपल्या अंगभूत गुणवत्तेला मेहनतीची आणि सातत्याची जोड देऊन सुधारला आहे. तरीही असे का? का? का? 

इंग्लंडचे २८ खेळाडू जगात इतके बेस्ट आहेत तर इंग्लंडने किती विश्वचषक किंवा आयसीसी स्पर्धा आजवर जिंकल्या आहेत? आता समर्थन करायचंच झालं तर, असं म्हणता येईल की प्राचीन काळात क्रिकेट जेव्हा २-३ संघांमध्येच खेळले जायचे, तेव्हाच्या बऱ्याच जुन्या खोडांना सन्मान म्हणून या मानाच्या हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट केलंय (हे स्पष्टपणे जाणवतं), आणि अर्थात त्या स्कीममधूनच इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या जास्त खेळाडूंना लॉटरी लागली आहे. पण एक लक्षात घेतले पाहिजे, आधुनिक क्रिकेट जास्त आव्हानात्मक आणि थकवणारे आहे, हे सन्मान एकविसाव्या शतकात सुरु केलेत तर अलीकडे २०-३० वर्षात उत्तम कामगिरी केलेल्या खेळाडूंना यात आता तरी प्राधान्य मिळावे. प्राचीन खेळाडूंना तसेही २००९-२०१० च्या लॉट मध्ये जास्तीत जास्त सामावून घेतलंय. इतर देशांच्या खेळाडूंपैकी माझ्या मते कॅलिस, पोलॉक, संगकारा अशा काही खेळाडूंना हा सन्मान लवकरच मिळायला हवा.  

जाता जाता: भारताचे यात समावेश झालेले पाच खेळाडू म्हणजे बिशनसिंग बेदी, कपिलदेव, सुनील गावस्कर, अनिल कुंबळे, आणि आता राहुल द्रविड. 
काय मग, एक नाव प्रकर्षाने मिसिंग वाटतंय ना? मानकऱ्यांची निवड करणाऱ्यांनो, 'देव' सगळं बघत असतो हे लक्षात ठेवा. (निवृत्तीनंतर पाच वर्षांनी समावेशासाठी पात्र हा निकष आहे हॉल ऑफ फेमसाठी).. बाकी आता सहा दिवसांनी ज्याचा हॅपी बर्थडे आहे तोही यात आला तर भारी वाटेल, पण निकष वनडे आणि कसोटी या दोन्हीतील कामगिरी असल्याने (प्राचीन खेळाडू वगळता) ते जरा कठीण वाटतंय, त्यात तो आशियाई, त्यात बंगाली, त्यात इंग्लंडमध्ये लॉर्ड्सवर टीशर्ट काढलेला आणि वारंवार ऑसीजशीही पंगा घेत दादागिरी केलेला खेळाडू.. मग या दोन देशांची मक्तेदारी असलेल्या यादीत तो येणे जराss .. (चला हे वाक्य इथेच सोडून देऊ)

असो.. ऑस्ट्रेलियन क्रिकेट हॉल ऑफ फेम असं एक सेपरेट आहेच, तसं आपण आपलं भारतापुरतं किंवा मग आशियाई हॉल ऑफ फेम तरी सुरु करायला हरकत नाही. बघू, पुढचं पुढे. द्रविडभाऊ, पॉन्टिंगभाऊ आणि टेलरताईंचे हार्दिक अभिनंदन.

- पराग पुजारी 

संजू आणि इतर गुन्हेगारांवरील सिनेमा - फरक

'संजू' सिनेमा परवा रिलीज झाला आणि संजय दत्तच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे तो बघावा की नाही यावर बऱ्याच चर्चा झडल्या. मला याबद्दल जरा वेगळ्या पद्धतीने मांडायचंय. 

तर आता मूलभूत फरक मांडण्याचा प्रयत्न करतो. दाऊद, मस्तान, शोभराज, गवळी, ओमर शेख अशा अनेक गुन्हेगारांवर मुव्हीज येऊन गेले आहेत.. पण संजय दत्त आणि त्यांच्यात फरक असा की ते लोक गुन्हेगार असा प्रॉपर शिक्का असलेले गुन्हेगार आहेत, संजय तसा नाही. त्याची ओळख अभिनेता म्हणून आहे, नंतर तो देशद्रोही कारवायांत सामील झाला व नंतरही त्याने गुन्हेगारी जगताशी संबंध ठेवले हे सिद्ध झालेय, त्यानेही कबूल केलेय, तो शिक्षाही भोगून आला. तो एक पब्लिक फिगर आहे.. एका सुसंस्कृत घरातील अभिनयक्षेत्रात गाजलेल्या जोडप्याचा आणि सर्वात जुन्या पक्षाच्या मोठ्या नेत्याचा मुलगा आहे. अशा मुलांनी काहीही केले तरी त्याची न्यूज होते हे सध्या आराध्या, तैमूरही अनुभवत आहेत. म्हणूनच यांच्यावर जबाबदारी वाढते. कित्येक सामान्य लोक अशा पब्लिक  फिगर्सना, अभिनेत्यांना रोल मॉडेल मानत असतात, त्यांना प्रचंड फॅन फोलॉइंग असते. हे काहीही दाउद्सारख्याना लागू होत नाही. शिक्का गुन्हेगारांवर जगभरात फिल्म्स, सिरीज येतात गाजतात.. पण मुळातच ते तुम्हाला इतके वर्ष रोज टीव्ही, थिएटर, मैदान (अझरची सिनेमातून प्रतिमा सुधारण्याचा झालेला प्रयत्न) अशा ठिकाणी दिसून सार्वजनिक झालेले नसतात, आपल्याला माहीत होतानाच इमाने इतबारे गुन्हेगार म्हणूनच जगासमोर येतात. त्यांनी स्वतःही त्यांचे गुन्हेगार असणे आणि लोकांनी आपल्याला गुन्हेगार मानले आहे हेही मान्य केलेले असते. त्यांना कुणी सामान्य घरातले लोक फॉलो करत नाहीत, ज्यांना त्या मार्गाला जायचे आहे तेच फॉलो करतात. संजयचे तसे नाही, ९३ पूर्वीपासूनच तो पब्लिक फिगर होता. स्वत:चे मोठे घराणे आणि आपण अडकल्यावरही ठाकरेकृपा झाली म्हणूनच तो पुन्हा इंडस्ट्रीत सक्रिय होऊ शकला. नाहीतर इतके पाठबळ नसताना कारकिर्दीच्या सुरुवातीलाच असे भयानक अडकल्यावर त्याचाही शायनी आहुजा झाला असता. 

थोडक्यात लोकांच्या मनात माणसाची मूळ ओळख अभिनेता / खेळाडू वगैरे म्हणून की गुन्हेगार म्हणून हा मुद्दा. कुणी लादेनवर पिक्चर करतोय किंवा नार्कोस सिरीज करतोय म्हणजे लोक गुन्हेगारांवरची कथा याच नजरेने पाहतात. संजयची मूळ ओळख ती नाही हा इथे प्रॉब्लेम आहे अनेकांचा. बाकी अलीकडे आलेला ओमेर्ता मी (राजकुमार राव प्रेमापोटी) पाहिला (डानियल पर्लला मारणारा व कंदहार विमान अपहरण प्रकरणात आपल्याला सोडावा लागलेला टेररिस्ट ओमर शेख).. पण उद्या मी किंवा कुणीही त्याला पैसे मिळवून देत मोठा तर करणार नाहीये ना.. झालं तर. संजय यानंतर जे सिनेमा करेल ते मात्र प्रेक्षक आपले पैसे घालून बघत त्याला मोठा करणारेत. रादर हाच हिरानीचा प्लान असू शकतो, कारण मुन्नाभाई तिसरा पार्ट (चले अमेरिका) अर्धवट होताच त्याला शिक्षा झाली, त्यामुळे तो पूर्ण होऊन रिलीज करताना संजयची इमेज थोडीफार सुधारलेली असणे हिरानीहिताचे आहे (संजू पाहून 'बिचारा संजय' ही इमेज पद्धतशीर तयार होते आहेच). नाहीतर हिरानी एक प्रोजेक्ट सुरू केल्यावर ते बाजूला ठेवून दुसरा प्रोजेक्ट कधीच करत नाही. पीके करताना ओ माय गॉड तशाच थीमवर येतोय (रादर तयारच झालाय) हे कळल्यावर त्याने पीकेचा नायक हा आधी ठरल्यानुसार आदिवासीएेवजी बदलून एलीयन दाखवला हे त्यानेच सांगितलं होतं.. असो, संजू हा फक्त हिरानी व रणबीर प्रेमापोटी चालतोय हा माझा समज अबाधित रहावा एवढीच इच्छा. या दोघांचा मीही फॅन आहेच.

गुन्हेगारांवर आलेले बरेच काही लोक बघतात, वाचतातच, नव्हे क्राईम वर्ल्डचे सुप्त कुतूहल उलट जास्तच असते.. पण ते क्रिमिनल 'एखादे वेगळे प्रोफेशन टर्नड गुन्हेगार' म्हणून लोकांना माहीत नसतात, तर गुन्हेगार म्हणूनच मास लोकांना माहीत झालेले असतात.. असं आहे सगळं. 🤗

#पॉइंट_ऑफ_व्ह्यू
- पराग पुजारी