Monday, 20 May 2019

कोटा फॅक्टरी

* कोटा फॅक्टरी *
'कोटा फॅक्टरी' ही टीव्हीएफची नवीन सिरीज पाहिली. खूप आवडली. (असं पहिल्याच वाक्यात डायरेक्ट मुद्द्याला हात घालणं खूप कमी जणांना जमतं स्प्राईट न पिताही.) 'थ्री इडियट्स'नंतर पहिल्यांदा शैक्षणिक थीमवर मनोरंजक असं काही पाहिल्याचं समाधान मिळालं. टीव्हीएफच्याच ट्रिपलिंग २ ने अलीकडेच निराशा केली होती. त्यात वाट पाहायला लावूनही शेवटी 'गेम ऑफ थ्रोन्स'च्या आठव्या सिझनने बऱ्यापैकी गंडवलेले असताना आणि तगडी स्टारकास्ट पाहून उत्सुकतेने पाहिलेली झी ५ ची 'हुतात्मा' ही संयुक्त महाराष्ट्र चळवळीवरची सिरीजही तितकीशी भावलेली नसताना फारशी हवा नसल्याने अजिबातच आगामी आकर्षण कॅटेगरीत नसूनही ही कोटा फॅक्टरी पाहणे म्हणजे सुखद धक्का होता. पाचच एपिसोड्स. बघून टाका. (तुला इतका वेळ कसा मिळतो, अंबानींना नेटपॅकचे प्लॅन्स तू सजेस्ट करतोस का, मुंबईत जॉब करतो असं सांगितलायस ना सांगलीत आईबाबांना असे प्रश्न कमेंट्समध्ये किंवा इनबॉक्समध्ये येऊन ब्लॉक प्राप्त करायचा असेल तरच विचारावेत.)

कोटा शहर हे आयआयटी प्रिपरेशनसाठी कोचिंगचं हब म्हणून ओळखलं जातं. आपल्याकडे कसं अमुक कोचिंग क्लासेसमध्ये एडमिशन घेतल्यास (आणि पुढे अभ्यासही केल्यास) बोर्डात याल वगैरे प्रमोशन फंडे वापरले जायचे, तसेच कोटामध्येही अमुक एका महेश्वरी क्लासेसमध्ये एडमिशन मिळवण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांची धडपड सुरु असते. आपल्या नायकाला वैभव पांडेला मात्र तिथे (कथेची गरज म्हणून) एडमिशन मिळत नाही, मग तो प्रोडीजी क्लासेसमध्ये जातो. तिथे त्याला मिळणारे मीनाकुमार, उदय, शिवांगी, वर्तिका, मीनल वगैरे मित्रमैत्रिणी, त्यांची मैत्री, काही किस्से, कोचिंगदरम्यान होणाऱ्या गमतीजमती, पेइंग गेस्ट होऊन राहणाऱ्यांची अवस्था, मेसचे जेवण कसे खावे याचे अनमोल धडे, अमुक सरांना हटवण्यासाठी विद्यार्थ्यांकडून होणारे प्रयत्न आणि मग आगीतून फुफाट्यात पडल्याची जाणीव, काही पॅरलल जाणाऱ्या प्रेमकथा, आणि चेरी ऑन द केक म्हणजे एक भन्नाट शिक्षक अर्थात जितूभय्या म्हणजे कोटा फॅक्टरी.
जितूभय्या जितेंद्र कुमारनेच साकारलाय, हा माणूस कमाल आहे. परत फॅन झालो आहे. खऱ्या आयुष्यात आयआयटी पासआउट, कोटामधले त्याचे अनुभव अशा पार्श्वभूमीमुळे हा शिक्षकाच्या रोलमध्ये नेहमीप्रमाणे भाव खाऊन जातो. त्याचा हा रोल पाहून वाटलं की पिचर्समध्ये नवीन कस्तुरीया आणि याच्या रोल्सची अदलाबदल केली असती तरी बघायला तेवढीच मजा आली असती. पहिल्याच एपिसोडमध्ये जितूभय्या ज्या पद्धतीने वैभवला नीट समजावत ट्रॅकवर आणतो तो सीन खास. वैभव पांडे केलाय मयूर मोरेने. तिसऱ्या एपिसोडमध्ये हा मुलगा ऑरगॅनिक केमिस्ट्री विषयावरच्या सात्विक संतापातून एक नॉनस्टॉप डायलॉग बोलून प्यार का पंचनामाच्या कार्तिक आर्यनची आठवण करून देतो. आणि तो संताप केमिस्ट्रीवरचा असल्याने मला फारच जवळचा वाटला, तो सीन मी खूपदा पाहून एन्जॉय केला. नेटफ्लिक्सला जशी राधिका आपटे तशी सध्या टीव्हीएफ, फिल्टरकॉफी, गर्लियापासारख्या वेब चॅनल्ससाठी घरचीच असणारी एहसास चन्ना इथेही घरचं कार्य समजून शिवांगी साकारते आणि तुलनेने भूमिका कमी असली तरी छाप पाडून जाते. टीव्हीएफचीच 'ये मेरी फॅमिली' मला खूप आवडली होती, त्यातली विद्याच इथे वर्तिका आहे, हे उशिरा कळले.

पहिल्या तीन झकास एपिसोड्सनंतर चौथ्या एपिसोडमध्ये एकत्र अभ्यास करण्याच्या निमित्ताने, ब्रेक म्हणून पिकनिक करून येण्याच्या निमित्ताने जरा अनावश्यक लव्हस्टोरी दाखवली आहे, पण ती आपल्याला कोटा शहर फिरवून आणण्यासाठी योजली असावी असा मी माझा समज करून घेतला आहे. वैभव आणि वर्तिका महेश्वरीची एन्ट्रन्स एक्झाम देतात, म्हणजे वैभव आधी देणार नसतो पण वर्तिका देणार आहे कळल्यावर आणि आपण तिचा अभ्यास चांगला घेऊ शकतो ही जाणीव झाल्यावर आपल्या वयाला अनुसरून वागत आणि हार्मोन्सचा आदर राखत तोही ती एक्झाम देण्याचा यथायोग्य निर्णय घेतो. एकूणच इम्पॅक्ट पाहता मयूर उत्तम काम करतोच, पण तो कुठे कुठे ओव्हरएक्टिंग करतो हेही लगेच समजून येते. त्याने जितेंद्र कुमारला या सिरीजप्रमाणेच रियल लाईफमध्येही अभिनयातील गुरु मानून काही धडे घ्यावेत. संदीप जैन, सौरभ खन्ना अशा लेखकांचे विशेष कौतुक आणि तो नॉनस्टॉप डायलॉग ज्याने लिहिला असेल त्याला माझ्याकडून आमरस.
मी ही सिरीज पाहण्यासाठी अनेकांना सजेस्ट केली. सध्या वेगळ्या क्षेत्रात असलो तरी इंजिनियरिंगच्या दिवसांची सफर घडवून आणत ही सिरीज जरा नॉस्टॅल्जीक करतेच. आणि मला अजूनही सायन्स, फिजिक्स रिलेटेड बिग बँग थियरीसारखे शोज, अशा सिरीज, सिनेमे पाहायला आवडतातच. तरी एक इंजिनीयरिंगचाच मित्र म्हणाला की बीएस्सी, बीकॉम, बीए लोकांना ही सिरीज आवडणार नाही. आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करू. असं काही नसतं. कोणत्याही कॉलेजात गेलेल्या कुणालाही ही सिरीज आवडेल. हां संवादात येणारे सायन्स, फिजिक्सचे संदर्भ जरा कळणार नाहीत, पण ते ठीक आहे, ते इंजिनियरिंगलाही विद्यार्थ्यांना कळलेले नसतात, पण त्यांनी त्या त्या वेळी अभिनय चांगला केलेला असतो. टीव्हीएफला चांगले इंजिनियर अभिनेते मिळतात ते यामुळेच.
आयएमडीबीवर सध्या ९.७ रेटिंग मिरवणाऱ्या या सिझनचा शेवटही मस्त एकसायटिंग नोटवर केला आहे. दुसरा सिझन नक्की यावा अशी इच्छा.
- पराग पुजारी

No comments:

Post a Comment