Tuesday, 11 September 2018

मॅच क्रिकेटर्स आणि फिल्मस्टार्सची


कधी कधी आपल्या नेहमीच्या क्रिकेटपेक्षाही हा जो काय प्रकार व्हायचा ना पूर्वी अधून मधून, तो बघायला जास्त मजा यायची. अशा सामन्यांची जुनी फुटेजेस मिळाली की बघायला अजूनही भारी नॉस्टॅल्जीक वाटतं. क्रिकेटपटू आणि बॉलिवूड स्टार्स यांची भेळ करून केलेले दोन संघ आणि एखाद्या सोशल कॉजसाठी आयोजित केलेली बेनेफिट मॅच. सगळेच हसत खेळतायत. सचिन तेंडुलकर, अजित आगरकर, साबा करीम, निखिल चोप्रा, महेश मांजरेकर, अर्शद वारसी, अनुपम खेर, गोविंदा, अनिल कपूर हे एका संघात, कॅप्टन बहुतेक सचिन... आणि अजय जडेजा, जतीन परांजपे, हृतिक रोशन, अक्षय कुमार, प्रभुदेवा, संजय दत्त, शेखर सुमन, आशुतोष राणा आणि बहुतेक कपिल देव दुसऱ्या संघात. यांचा कप्तान आहे नुकताच सुपरहिट 'कहो ना प्यार है' देणारा हृतिक. इथे जरा जास्तच हँडसम दिसतोय तो. त्याचे बाबाही आलेत पोराची कॅप्टन्सी बघायला. त्यांच्या बाजूला बसलेत राज बब्बर. बाकीही काही प्रसिद्ध चेहरे दिसतातच प्रेक्षकांत. ड्रेसिंग रूममध्ये आशुतोष गोवारीकर आहे. कपिलपाजी आणि आशुतोष राणा मस्तपैकी गप्पा मारत बसलेत, बहुतेक 'तू संघर्षमध्ये असा रोल करताना तुला स्वत:ची भीती वाटली नाही का' असं कपिल त्याला विचारतायत, आणि १९८३ वर्ल्डकपच्या आठवणी आशुतोष त्यांना विचारतोय. 

या मॅचची यूट्यूब लिंक 
https://www.youtube.com/watch?v=8PRBzZdbyos&t=927s 


बॉलिंग करताना आधी आणि नंतर चित्रविचित्र एक्शन आणि अपील करणारा अर्शद वारसी. तो जेव्हा अक्षयला बॉलिंग करतो.. म्हणजे पहिला जॉली एलएलबी दुसऱ्या एलएलबीला बॉलिंग करतो तेव्हा जवळपास प्रत्येक बॉल डोक्याच्याही वर फुलटॉस टाकतोय. महेश मांजरेकरची बॉलिंग अक्षयला खेळता येत नाहीये. सचिन गंमत म्हणून हसत हसत बॉलिंग करतोय. जडेजा कुणालाही निवांत खेळतोय. एक आगरकर आणि किपर साबा करीम सोडल्यास कुणीच सिरीयसली खेळतंय असं वाटत नाही. भरीस भर म्हणून अतिसंथ आउटफिल्ड. म्हणजे एक मस्त ड्राइव्ह मारून जडेजा पळतच नाही, अर्थात त्याची चूक नाही, सवय एकेकाची. कारण तसं तो भारताकडून खेळतानाही अनेकदा करायचाच, कित्येकदा चालतही रन पूर्ण करायचा. तो क्रिकेट शिकतानाच तसं शिकला असावा. त्या काळी तसंही एकाच्या दोन, दोनच्या तीन रन्स कन्व्हर्ट करणे म्हणजे अंधश्रद्धा होती आपल्या खेळाडूंसाठी. पण इथे स्लो आउटफिल्डमुळे त्याचा बॉल सीमारेषेच्या अलीकडे जाऊन शांतपणे स्वत:हून थांबतो, मग जडेजाला एक रन नाईलाजाने घ्यावी लागते. त्यापूर्वी अक्षयचा एक झेल अनिल कपूर सोडतो आणि जतीनचा एक झेल सचिन सोडतो. 

पण मैदानात जितकी मजा सुरु असते तितकीच किंबहुना जरा जास्तच मजा आणतो तो म्हणजे कॉमेंटेटर. कारण कॉमेंटरीला कोण असावं - तर चक्क जॉनी लिव्हर. जेव्हा जेव्हा अनुपम खेरकडे बॉल जातो तेव्हा जॉनी मध्येच म्हणतो - 'अरे ये अनुपम खेर को कोई हटाओ यार'. पण सर्वात चांगली फिल्डिंगही अनुपम खेरचीच होतेय. जॉनीच्या सगळ्याच खेळाडूंबद्दलच्या कमेंट्स हे खेळाडू खेळीमेळीने घेतायत. कुणीतरी चांगली फिल्डिंग केल्यावर जॉनी म्हणतो - 'बहोतही अच्छी फिल्डिंग, बाद में आके मिलना भाई'. कहर म्हणजे  नंतर गोविंदा फिल्डिंगसाठी आल्यावर तो हिरो नं. १, कुली नं. १ वगैरे म्हणत शेवटी खिलाडी नं १ ही गोविंदालाच म्हणून टाकतो, तेही अक्षय तिथेच बॅटिंग करत असताना. मग मध्येच गाणे काय सुरु करतो, जॉनी म्हणजे फुल ऑन एंटरटेनमेंट. नंतर विनोद कांबळीही येतो कॉमेंटरी करायला. 

अशी मॅच पुन्हा एकदा खेळवा यार, संघात कुणीही घ्या, कॅप्टन्स कुणीही करा, पण प्लीज कॉमेंटरीला मात्र जॉनी लिव्हरलाच बोलवा. 

No comments:

Post a Comment