"मिस्टर माने, मी तुम्हाला थोडा त्रास देणार आहे"
"अं.. त्रास.. हां मला दम ऐकू आलं, काय घाबरलो मी" (शक्य आहे, अगदीच यमक आहेत दोन्ही शब्द)
"माझ्याबरोबर साड्यांच्या दुकानात चला,. माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न ठरलंय, तिच्यासाठी दोन साड्या घ्यायच्यात.. तुमचा रंगाचा चॉइस बरा दिसतोय. मला जरा मदत करा.""अं.. त्रास.. हां मला दम ऐकू आलं, काय घाबरलो मी" (शक्य आहे, अगदीच यमक आहेत दोन्ही शब्द)

हे सगळे आठवण्याचे कारण म्हणजे आज याच मॅडमचा वाढदिवस.
परवाच २३ सप्टेंबरला 'अशी ही बनवाबनवी' चित्रपटाला ३१ वर्ष पूर्ण झाली आणि चित्रपटाचे कलाकार पुन्हा एकदा नव्यानं चर्चेत आले. अर्थात त्यात माधुरी हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्री अश्विनी भावे हेही एक महत्त्वाचं नाव. मराठी इंडस्ट्रीतल्या एव्हरग्रीन सुंदर अभिनेत्रींच्या यादीत आणि अगदी आरस्पानी सौंदर्य वगैरे म्हणतानाही अर्चना जोगळेकर आणि अश्विनी भावे ही नावं खूप वर येतात यात शक्यतो दुमत नसावे.
'अशी ही बनवाबनवी’ हा त्यांचा 'शाब्बास सूनबाई' नंतर दुसराच मराठी चित्रपट होता. त्यानंतर 'धडाकेबाज’ 'कळत नकळत', 'आहुती', 'सरकारनामा, 'वजीर, 'हळद रुसली कुंकू हसलं' पासून अलीकडच्या 'आजचा दिवस माझा', 'मांजा' यांसारख्या मराठी चित्रपटात आणि १९९१ मध्ये 'हिना' चित्रपटातून हिंदीत प्रवेश करून मग'मोहब्बत की 'आरझू', 'अशांत, 'सैनिक, 'जुर्माना', 'जखमी दिल’ अशा काही हिंदी सिनेमांमध्येही त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली.
अश्विनी भावे एखाद्या साडीचे दुकान असणाऱ्या आणि लिंबाचा साइड बिझनेस करणाऱ्या बिझनेसमनशी लग्न करतील असे वाटले होते, गेलाबाजार कॉस्मेटिक्सचे दुकान असणाऱ्याशी तरी, पण सर्वाना आश्चर्याचा धक्का देत त्यांनी २००७ मध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर असणाऱ्या किशोर बोपर्डीकर यांच्याशी विवाह केला आणि अमेरिकेत स्थायिक झाल्या. इकडे अनेक हृदये जाळणाऱ्या सुंदर मराठी अभिनेत्रीनी सासर निवडताना तसंही अमेरिका निवडायचे असते, नाहीतर तो फाऊल धरला जातो.. म्हणून मग माधुरी दीक्षित, अर्चना जोगळेकर यांच्याप्रमाणेच अश्विनीही लग्न करून अमेरिकेत गेल्या. तेव्हा उड्डाण करताना त्या लिंबू कलरच्या विमानातून गेल्या आणि त्यांच्या मोबाईलचे बॅककव्हरही लिंबू कलरचे आहे असे म्हणतात.
असो, एरवी रंगांच्या बाबतीत माठ पुरुष जातीला फक्त लाल, निळा, पिवळा, हिरवा असे बेसिक कलरच कळत असताना (पुण्याच्या वाहतुकीत या रंगांनाही किंमत मिळत नाही म्हणे) आणि रंगांच्या इतर शेड्स म्हणजे थोतांड, अंधश्रद्धा वाटत असताना लिंबू कलरसारख्या दुर्लक्षित कलरला जनमानसात मानाचे स्थान मिळवून देणाऱ्या आणि दुल्हेराजामध्ये लिफ्टमधील प्रसंगात रविना झुरळाला घाबरून गोविंदाच्या गळ्यात पडते तेव्हा तो सीन पाहताना आम्हाला ज्यांच्यामुळे दे जा व्हू झाल्यासारखे वाटले अशा सदाबहार आणि अर्थात लिंबू कलरच्या साडीने अनेक तरुणांच्या हृदयात वसंत फुलवणाऱ्या अश्विनी भावे यांना वाढदिवसाच्या हार्दिक मेनी मेनी रिटर्न्स शुभकामनायें बर्थडेच्या हॅपी शुभेच्छा...