Tuesday, 22 January 2019

भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात केले उरी सिनेमाचे जोरदार प्रमोशन


ये नया इंडिया है.. ये घर में घुसेगा भी और मारेगा भी 

ऑस्ट्रेलियात येऊन भारतीय संघाने आपल्या कामगिरीतून इतके जोरदार प्रमोशन केलेला हा सिनेमा नेमका आहे तरी कोणता आणि कसा हे बघण्यासाठी ऑस्ट्रेलियन वनडे आणि कसोटी संघांचे कर्णधार अरोन फिंच, टीम पेन आणि अन्य सर्व सहकाऱ्यांनी केली सिडनी, एडलेड, मेलबर्न, पर्थ येथे 'उरी' सिनेमाचे शोज लावण्याची मागणी.. 
सदर मागणीचे निवेदन त्यांनी देताच धोनीने लावली उरी - वनडे मालिका विजयाची ट्रॉफी, आणि विराटने अनुष्का..

ऑसी संघाचे प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी पाठवली उरीचे लेखक दिग्दर्शक आदित्य धर यांना फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट.. आदित्य यांनी केला हृदयद्रावक रिप्लाय - 'जरा धीर धर'..

ग्लेन मॅक्सवेल आणि शॉन मार्श करू लागले विकी कौशलला इंस्टाग्रामवर फॉलो.. टीम पेनचे समस्त कुटुंब, त्याचे सासू सासरे आणि मेव्हणी, मेव्हणीचा बॉयफ्रेंड, त्या बॉयफ्रेंडच्या पाचवीतील क्लासमेटचे सात सख्खे शेजारी, तसेच टीम पेनच्या मुलांच्या सोळा मित्रमैत्रिणींचे पालक (त्यातील एक पालक 'ऑस्ट्रेलियन क्रिकेट मोसमात घरोघरी होणारे बेबीसीटिंग: काल आज उद्या, गरज व उपाय, आणि त्याचे ऑस्ट्रेलियन जनमानसावरील संभाव्य दूरगामी परिणाम' या विषयावर करत आहेत पीएचडी) ऋषभ पंतला फॉलो करू लागल्यानंतरची भारत - ऑस्ट्रेलिया आंतरराष्ट्रीय संबंध सुधारण्याच्या दृष्टीने झालेली दुसरी सर्वात मोठी सोशल मीडियांतर्गत घडामोड म्हणून आघाडीच्या जागतिक वृत्तपत्रांनी घेतली दखल..

'हाऊज द जोश?' असे विराट कोहली भारतीय खेळाडू मैदानात उतरताच सर्वांचा गोल करून त्यांना विचारत असताना चोरून ऐकले होते मार्कस स्टोईनिसने. या घोषणेनंतर भारतीय गोटात चैतन्य संचारते याचे त्याने पीटर हँड्सकॉंबच्या साथीने केले होते निरीक्षण.. नेमके रहस्य जाणून घेण्यासाठी पीटरने इनिंग्ज ब्रेकमध्ये तोच प्रश्न भारतीय ड्रेसिंग रूमबाहेर दरवाजापाशी जाऊन जोरात विचारताच सर रवींद्र जडेजा यांनी आतून आणून दिली होती जोश सिनेमाची डीव्हीडी.. व्हरांड्यातून बियरचा कॅन तोंडाला लावत आलेल्या रवीजी शास्त्रीजी यांनी ते पाहताच दिली जडेजाला शास्त्रात लिहिल्यानुसार टाळी.. या घटनेची सत्यता पडताळण्यासाठी हर्षा भोगले आणि सुनंदन लेले यांना संपर्क साधला असता त्यांनीही केली याची पुष्टी..

'आपापल्या क्रिकेट करियरला इतकीच जर अश्वलागवड करून घ्यायची होती तर आमच्याकडून सँडपेपर का मागून घेतला नाही' असा ऑसी खेळाडूंना केला संतप्त सवाल डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ यांनी ट्विटरवर एका ट्विटद्वारे.. पण भारतीय मनोरंजन विश्वाची बित्तंबातमी ठेवणाऱ्या ब्रेट लीने सँडपेपरचाही खर्च टाळण्यासाठी त्या ट्विटला रिप्लाय करताना सुचवली नामी युक्ती - सांगितले की "तुम्ही फक्त 'कॉफी विथ करण' या शोमध्ये सहभागी व्हा, काम होऊन जाईल." करण जोहरने सेपरेट ट्विट करत ब्रेट लीला दिली आपल्या पुढील सिनेमातील एखादे गाणे गाण्याची ऑफर. 'भगवान तेरी लीला अगाध है' असा त्या ट्विटवर ब्रेट लीच्या एका भारतीय चाहत्याचा रिप्लाय येताच सर्व सचिनप्रेमींनी केला तो लाइक. 

विराट आणि कंपनी हाऊज द जोश म्हणतच होत आहे न्यूझीलंडलाही रवाना...

- पराग पुजारी

#क्रिकेट #भारत_ऑस्ट्रेलिया #व्हॉट_द_फेक_न्यूज