Wednesday, 7 February 2018

नम्रतेचा महामेरू बहुत जनांसी आधारु राहुल द्रविड __/\__

एखाद्या माणसाबद्दलच्या आपल्या मनातल्या आदराला पण एक लिमिट असते. त्या लिमिटच्या बाहेर तो अगदी बियॉन्ड म्हणतात तसा जाऊ लागला की त्याला संत म्हणावं का असं वाटू लागतं. अंडर १९ वर्ल्डकप जिंकल्यावर बीसीसीआयने कोच राहुल द्रविडला ५० लाख, खेळाडूंना ३० लाख आणि सपोर्ट स्टाफला २० लाख पारितोषिक जाहीर केले. फुकट ते पौष्टिक असा अलिखित नियम असणाऱ्या देशात तर चौदा महिन्यांची मेहनत फळाला आल्यानंतर सर्व युनिटला असे भरघोस बक्षीस मिळाल्यावर द्रविडने खरंतर त्याला मिळालं ते बक्षीस घेऊन खुश व्हायला हवे होते. पण आता तो म्हणतोय की 'सर्व अटेन्शन मला मिळतंय हे मला जरा खटकतंय, आम्ही सर्वानीच एकसारखी मेहनत केलीये आणि मला ५० लाख व इतरांना माझ्यापेक्षा कमी असा भेदभाव का? सर्वाना समान का नाही?'

हेच ते, इतरांना आपल्यापेक्षा कमी मिळतेय म्हटलं की हा माणूस अस्वस्थ होतो, प्रश्न विचारतो. हर्षा भोगलेने एकदा राहुलच्या ग्रेट इनिंग्जविषयी त्याला बोलतं केलं तेव्हा राहुल त्या त्या सामन्यात दुसऱ्याही काही खेळाडूंचा कसा मोलाचा वाटा होता हे सांगत राहिला. त्यावर हर्षा जे म्हणाला होता त्याची प्रचिती आत्ताही येते - 'धिस इज राहुल द्रविड फॉर यू गाइज.. यू  टेल हिम ही प्लेड वेल अँड ही विल टेल यू समवन एल्स ऑल्सो प्लेड इकवली वेल'. 

आत्ताही त्याने हेच केलंय. दुसरेही तितकीच मेहनत घेतात हे माहित असलेल्या राहुलचा हा स्वभाव आपल्याला नवा नाही. मध्यंतरी बेंगलोर विद्यापीठाने आणि त्यापूर्वी गुलबर्गा विद्यापीठाने दिलेली डॉक्टरेट नम्रपणे नाकारणाऱ्या द्रविडला जेव्हा विचारलं गेलं की असं का केलंस? तेव्हा तो म्हणाला होता, 'डॉक्टरेट मिळवण्यासाठी लोक बराच काळ खूप कष्ट घेतात हे मला माहितेय. माझ्या पत्नीनेही डॉक्टर होण्यासाठी मोठा कालावधी मेहनत घेतलीये, सगळेच डॉक्टर घेतात, तेच पीएचडीचं. अशावेळी मी यासाठी स्वत:ला हकदार मानत नाही जरी ती मानद पदवी असली तरी.. वाटल्यास पुढे स्वत: क्रीडा क्षेत्रात रिसर्च करून ही पदवी मिळवेन'.. त्या त्या क्षेत्रात मेहनत करूनच मिळवता येतील अशा काही गोष्टी असतात, त्या इतर क्षेत्रांतील लोकांना मानद म्हणून दिल्या की त्या खऱ्या मूळ क्षेत्रातील लोकांना काय वाटत असेल हा विचार फारसा कुणी करत बसत नाही. तेव्हा असं वाटतं की नियम हा अपवादाने सिद्ध होतो हेच मुळात सिद्ध होण्यासाठी नियतीने द्रविडची योजना करून ठेवलेली असावी.


या पीएचडीवरून अजून एक किस्सा आठवला. ज्यातून आपल्याला धोनी, रैना, इरफान, पियुष, आरपीसिंग, श्रीशांत वगैरे खेळाडू मिळाले, त्या टॅलेंट रिसोर्स डेव्हलपमेंट विंगची (TRDW) कल्पना बीसीसीआयला सुचवणाऱ्या ज्येष्ठ क्रीडा पत्रकार डॉ. मकरंद वायंगणकरानी वयाच्या ६६ व्या वर्षी मुंबई क्रिकेटवर पीएचडी करून मुंबई क्रिकेटवर आधारित 'अ मिलियन ब्रोकन विन्डोज' हे पुस्तक लिहिलेय, त्याच्या प्रकाशनाला मागच्या वर्षी गेलो होतो. कार्यक्रमाची रंगत वाढवण्यासाठी द्वारकानाथ संझगिरी, किरण मोरे, पारस म्हाम्ब्रे, अमोल मुजुमदार हेही मान्यवर होते. पण हे पीएचडीचे सांगताना त्यांनी आणखी एक उदाहरण दिले ते थक्क करणारे होते - राहुल द्रविडच्या आईने वयाच्या ५८ व्या वर्षी फाईन आर्ट्समध्ये पीएचडी केलीये. हे ऐकून वाटलं, काय बिशाद मग त्या नियतीची की अशा मातेचा मुलगा मेहनती, जिद्दी, चिकाटी असणार नाही आणि इतरांनी केलेल्या मेहनतीचा आदर करणार नाही. असे संस्कार घरातून असताना तो का काही फुकट घेईल? आणि डिझर्व्हिंग अशा इतरांना कमी मिळत असेल तर का गप्प बसेल? या अशा नम्रतेमागे, आपण कुणी स्पेशल नाही या वाटण्यामागे हा एक अंडरकरंटही असावा - राहुलसारख्यांची जडणघडण, त्यांच्यावर झालेले संस्कार, त्यांनी जवळून पाहिलेले जग, त्यांच्या भोवतालची माणसे या सगळ्याच गोष्टी त्यात येतात.

मुलाच्या सायन्स एक्झिबिशनसाठी शाळेत गेला की तो सहज रांगेत उभा राहतो. बिनधास्त रिक्षा, मेट्रोतून फिरतो. मग कुणीतरी त्याला ओळखून फोटो काढतो आणि ते फोटो व्हायरल होतात.


एम टीव्ही वाले त्याच्या रूममध्ये एका तरुण मुलीला पाठवून त्याचा बकरा करायला गेले, ती त्याच्याशी लगट करू लागली. तर या पठ्ठ्याने तिलाच उलट सुनावले की 'तुझं शिक्षण पूर्ण होण्याचं वय आहे तर अभ्यासावर लक्ष दे, नीघ इथून'. बकरा करणाऱ्यांचाच बकरा झाला. (हा व्हिडिओही अनेकांनी यूट्यूबवर पाहिला असेलच.)

असेच एकदा त्याच्या घरी कुणी एक मुलगी घरातून पळून येऊन हटूनच बसली होती की 'मला त्याच्याशी लग्नच करायचंय, त्याशिवाय मी जाणार नाही, आमचं लग्न लावून द्या.' राहुलचे आईबाबा ताबडतोब धन्य झाले होते. पोलिसांना बोलवावं लागलं होतं. राहुलने नीट समजावून तिला परत पाठवलं. मुलींना तो आवडतोच. उगाच नाही 'अगंबाई अरेच्चा'मध्ये संजय नार्वेकर पुस्तकात द्रविडचा फोटो ठेवून बसलेल्या त्याच्या बहिणीला म्हणत की ' गप अभ्यास कर.. म्हणे काय छान दिसतोय राहुल द्रविड!'

बोन मॅरो ट्रान्सप्लान्ट आणि किमोथेरपी सुरु असणाऱ्या अक्षय ढोके या द्रविडच्या एका तरुण फॅनला त्याच्या अखेरच्या दिवसात त्याच्या मित्रांनी एक सुखद भेट दिली होती. तो हॉस्पिटलमध्ये असताना द्रविडला व्हिडीओ कॉल करून त्याच्याशी त्याला बोलायला दिलं. राहुलने त्याची आत्मीयतेने चौकशी केली. अक्षयचे वडील त्याच्याशी मराठीत बोलू लागल्यावर राहुलही त्यांच्याशी मराठीत बोलू लागला. मध्येच मुलाला मांडीवर बसवून त्याच्याकडूनही अक्षयला गेट वेल सून म्हणवून घेतलं. मग तो लॅपटॉप त्या वॉर्डमध्ये फिरवला गेला तेव्हा राहुलने सर्वच पेशन्ट्सना हाय केलं आणि मग डॉक्टरांशीही बोलला. (हे मला Quora वरून समजलं होतं, त्यावर व्हिडीओ पाहिला होता जो यूट्यूबवरही आहे. -  https://www.youtube.com/watch?v=7VAUUlgvPdI )

तुम्ही ज्यांना फॉलो करता, ज्यांचे फॅन असता त्यांनी वागणुकीतून दिलेले धडेही आपसूक गिरवत राहण्याचा प्रयत्न करता, यातून तुम्हाला कधी फायदा होतो, कधी नुकसानही होते. तरीही आपण त्या मूल्यांपासून हटत नाही, तशी इच्छाच होत नाही. हे सगळं आपण शाळेच्या चार भिंतींबाहेरच शिकू शकतो. 

द्रविडचा असा स्वभाव, तो असा का घडला हा स्वतंत्र पीएचडीचा विषय आहे.

- पराग पुजारी
# ७/१ - सात ऑस्ट्रेलियन < एक वेस्ट इंडियन #

भारत - दक्षिण आफ्रिका टेस्ट सिरीजमधली तिसरी टेस्ट आपण परवा जिंकली ती चौथ्या डावात आपल्या बॉलर्सनी केलेल्या भन्नाट कामगिरीच्या जोरावर. आफ्रिका १२४/ १ वरून १७७ ऑल आऊट झाले. टेस्ट जिंकण्याची चांगली संधी असताना फक्त ५३ धावात ९ विकेट्स गमावून आफ्रिकेने त्यांना मिळालेला कुप्रसिद्ध टॅग पुन्हा सिद्ध केला. हे यावेळचं जोहान्सबर्गचं पीच तसंही जरा ट्रिकी असलं तरी इथे तर त्यांना वेळही भरपूर होता, कारण चौथा दिवसच तर सुरु होता. पण आपल्या बॉलर्सनी त्यांना या टेस्टचा पाचव्या दिवसाचा सूर्योदय सोडा, पण चौथ्या दिवसाचा सूर्यास्तही पाहू दिला नाही. खरंतर यापूर्वी कसोटीच्या शेवटच्या पाचव्या दिवशी शेवटच्या सेशनमध्ये आपल्या नऊ विकेट्स घालवून मॅच, पर्यायाने सिरीज घालवण्याचे अपश्रेय अलीकडेच ऑस्ट्रेलिया (वि. श्रीलंका, कोलंबो टेस्ट २०१६) आणि पाकिस्तान (वि. न्यूझीलंड, हॅमिल्टन टेस्ट २०१६) यांनीही मिळवले आहे. पाक तर या बेभरवशाच्या बॅटिंगमध्ये इतके माहीर आहेत की शतकी सलामी मिळाल्यावर पहिली विकेट पडताच तिथून पुढे १०० धावांच्या आत ऑलआउट होण्याचा पराक्रमही त्यांनी तीनदा केलाय. 

समोरच्या संघाला मोक्याच्या वेळी गुंडाळण्याची अशी कामगिरी तीन-चार बॉलर्स जीव तोडून बॉलिंग टाकत करतात तेव्हा भारीच वाटतं, हा सांघिक खेळ आहे हे लक्षात ठेवून ते विकेट्स आपापसात वाटून घेतात, त्यातून एकमेकांत माणुसकी जपतात, तरीही एका संघाचा असा धुव्वा उडताना, त्यांची बॅटिंग पत्त्यांच्या  बंगल्यासारखी कोसळताना बघायला विलक्षण वाटतं. मग विचार करा, हे असं काही अशक्य काम एकच बॉलर करून जात असेल तर? तेही बलाढ्य ऑस्ट्रेलियाची बॅटिंग समोर असताना! मग ती मॅचची पहिली इनिंग असली म्हणून काय झालं, एकाच बॉलरने त्याच्या एकाच स्पेलमध्ये फक्त एक रन देऊन सात विकेट्स घेणं हे जरा अमानवी वाटत नाही का? खोटं वाटत असेल तर विचारा १९९३ च्या अॅलन बॉर्डरला, त्याच्या टीममधल्या डेव्हिड बून, वॉ बंधू, डॅमियन मार्टिन, किंवा इयान हिली कुणालाही. आणखी नामुष्की म्हणजे कांगारू त्यांच्याच देशात खेळत होते - जगातल्या सर्वात वेगवान खेळपट्ट्यांपैकी एक म्हणून लौकिक असलेल्या पर्थवर. काय वाटलं असेल त्यांना - या अनपेक्षित कोलॅप्समुळे आपल्याच घरात शेवटची महत्त्वाची निर्णायक टेस्ट अशी सव्वा दोन दिवसात हरताना? आधी चार सामन्यात झालेली १-१ अशी बरोबरी, आणि पाचव्या टेस्टमध्ये पहिली बॅटिंग करताना पहिल्याच दिवशी दोन सेशन्समध्ये ऑलआउट झाल्यावर पुढे वेस्ट इंडिजला सिरीज २-१ अशी जिंकताना बघून काय वाटलं असेल अॅलन बॉर्डरला? पण काय करणार, आले कर्टली अँब्रोसच्या मना तिथे कुणाचे काही चालेना.  हे आजच्याच दिवशी म्हणजे ३० जानेवारी १९९३ रोजी झालं.



ही टेस्ट जिंकून सिरीज जिंकायची म्हणून पर्थसारख्या पिचवर विंडीजला टारगेट द्यावं असा विचार करून टॉस जिंकून ऑसीज पहिली बॅटिंग करतायत. स्कोर २७ असताना लँगर जातो, ५८ असताना स्टीव्ह वॉ जातो.. दोघे इयान बिशपला शरण गेलेले. मग येतो स्टीव्हचा जुळा भाऊ मार्क आणि तो ओपनर  डेव्हिड बूनबरोबर जपून खेळतो, दोघेही डोळ्यात तेल घालून एकेक बॉल नेटाने खेळतायत, धीराने पार्टनरशिप करतायत आणि आस्ते आस्ते स्कोर ८५ पर्यंत नेऊन ठेवतात. वॉल्श आणि बिशपची बॉलिंग हे दोघे आरामात खेळून काढतायत असं दिसल्यावर विंडीज कर्णधार रिची रिचर्डसन मैदानात नजर फिरवतो, आणि बाउंडरीवर उभ्या असणाऱ्या एका ६ फूट ७ इंची माणसाला त्याचा पुढचा स्पेल टाकायला आमंत्रित करतो. मग हा आधुनिक आग्यावेताळ कर्टली अँब्रोस त्याचा पुढचा स्पेल सुरु करतो आणि लगेचच एक बॉल मार्क वॉच्या बॅटची कड घेऊन किपर मरेच्या हातात विसावतो. ही अँब्रोसची पहिली विकेट. स्कोर ९० वर पोहोचतो तोच बूनही अँब्रोसपुढे मागे स्लिपमध्ये रिचर्डसनकडे कॅच देऊन जातो, मग येतो कॅप्टन अॅलन बॉर्डर, एक भरवशाचा बॅट्समन. ४ बाद ९० वरून आता बॉर्डर आणि मार्टिन डाव सावरतील अशी पर्थ स्टेडियममधल्या ऑस्ट्रेलियन फॅन्सना आशा असते. आणि लगेच अँब्रोसचा पुढचा बॉल झाल्यावर ही आशाही लगेच संपते. त्यांनी तरी असे कितीवेळा पाहिले असेल म्हणा महान बॅट्समन बॉर्डरला एकच बॉल खेळून पुन्हा माघारी येत बाउंडरीची बॉर्डर पार करताना. तो भन्नाट बॉल खरंतर बॉर्डरला झेपलाच नाही, खेळावा की सोडावा की डक करावा अशा त्रिधा मनस्थितीत बॉर्डर असताना त्याच्या बॅटने त्याला दगा दिला, आणि मरेने मागे तो बॉल आनंदाने झेलला. अँब्रोस बघता बघता हॅट्ट्रिकवर येताच ऑसी किपर इयान हिली आला, हिली तसा बरेचदा टिच्चून खेळायचा. आत्ताही त्याने अँब्रोसची हॅट्ट्रिक चुकवत तिसरा बॉल खेळून काढला. अर्थात त्याचा अँब्रोसवरचा हा विजय जेमतेम पुढच्या दहा धावाच टिकला, कारण स्कोर १०० झाला आणि अँब्रोसने त्याला स्लिपमध्ये लाराकडे झेल द्यायला लावला. मग सुरु झाले ऑसी शेपूट. बहुतेक टेलएन्डर्सनी दांडपट्टा आडवापट्टा आंधळीगुट्टा असे बॅटिंगचे विलक्षण तंत्र आत्मसात केलेले असते, पण कधीकधी ते खरेच उपयुक्त योगदान देऊन जातातही आणि त्यांच्या आडव्यातिडव्या फटक्यांमुळे पटपट स्कोरही वाढतो. मर्व्ह ह्यूज असाच एक ह्यूज शॉट मारायला गेला, पण बॉल नुसताच उंच गेला आणि आथरटनने आरामात कॅच घेतला, ही अँब्रोसची पाचवी विकेट. 

एकीकडे डॅमियन मार्टिन अजूनही टिकून खेळतोय आणि आता त्याला साथ द्यायला येतो फिरकीचा जादूगार शेन वॉर्न. पण आजचा दिवस अँब्रोसला समोर कुणाचीच साथ बघवत नसते, तो सरळ मार्टिनलाच टार्गेट करतो आणि स्लिपमध्ये सिमन्स एक सोपा कॅच घेत अँब्रोसला त्याची सहावी विकेट मिळवून देतो. मार्टिन पॅव्हेलियनकडे परतत असताना पदार्पण करणारा एंजेल बॅटिंगला येतो, बॉलिंगला अजून अँब्रोसच आहे हे एकदा बघून घेतो आणि बहुतेक त्याला म्हणतो, 'अरे माझ्या मित्राचा फोन आला होता डेब्यूसाठी ऑल द बेस्ट म्हणून, जरा बोलत होतो तितक्यात तू आउट झालास म्हणून इथे यावं लागलं बघ, चल असूदे आता जे झालं ते झालं आणि जे होणार आहे तेही या अँब्रोसमुळे मला दिसतंय, तू जाऊन त्याला सांग होल्ड करायला.' चौथ्या बॉलवर एंजेल मागे मरेकडे कॅच देऊन लगेच परत जातो. अँब्रोसने बघता बघता एकाच स्पेलमध्ये सात विकेट्स घेतलेल्या असतात, पण त्याहून विशेष थक्क करणारी गोष्ट म्हणजे या सात विकेट्स घेताना त्याने या अख्ख्या स्पेलमध्ये फक्त एकच रन दिलेली आहे, चौघांना तर शून्यावर परत पाठवलंय. तो त्याची आठवी विकेट घेणार असं वाटत असतं, पण वॉर्न तो बेत हाणून पाडतो आणि स्वत: रनआउट होऊन दाखवतो. ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण डाव ४७ ओव्हर्समध्ये फक्त ११९ वर आटोपतो.

वेस्ट इंडिजची इनिंग अगदी खुशीत सुरु झाल्यावर मग कॅप्टन रिचर्डसनचा कॉन्फिडन्स इतका वाढला की त्याने सात फोर्स दोन सिक्स मारत ४० मध्येच ४७ चोपल्या. विंडीजने ३२२ केल्या. ऑस्ट्रेलियाची पुढची इनिंगही १७८ मध्ये संपली, यावेळी बिशपने सहा विकेट्स काढल्या. पण सुरुवात पुन्हा अँब्रोसनेच केली होती लँगरला घेऊन, पुढे वॉर्नला काही दोन्ही डावात रनआउट होऊन दाखवायचं चेतेश्वरपुजारापण जमलं नाही, यावेळी त्याने इमाने इतबारे अँब्रोसला विकेट दिली. मॅचमध्ये ९ आणि सिरीजमध्ये तब्बल ३३ विकेट्स घेणारा अँब्रोस सामनावीर, मालिकावीर दोन्हीही झाला. विंडीजने टेस्ट तिसऱ्याच दिवशी लंचपर्यंत संपवली, डावाने तर जिंकलीच, सोबत २-१ ने सिरीजही जिंकली - ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात हरवलं आणि फ्रॅंक वॉरेल ट्रॉफी आपल्या नावावर केली. 

या मॅचच्या अजून दोन आठवणी आहेत - अॅलन बॉर्डर दुसऱ्याही डावात शून्यावर बाद झाल्याने त्याला करियरमधला एकमेव चष्मा मिळाला. (दोन्ही डावात शून्यावर बाद झाल्यास त्याला 'पेअर' किंवा 'चष्मा' म्हणतात, जो कोणत्याच बॅट्समनला नको असतो. आणि दुसरं म्हणजे ऑस्ट्रेलियन खिलाडूवृत्ती समजायला जरा अवघड असते, कारण मायभूमीत प्रतिस्पर्ध्याला अनुकूल अशी ही पर्थची ही वॅका खेळपट्टी तयार करणाऱ्या क्युरेटरला या मॅचनंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून डिसमिस करण्यात आलं.  

एक स्पेल - बत्तीस बॉल्स - एक रन - सात विकेट्स हे त्याआधी आणि त्यांनतर कधीही टेस्ट क्रिकेटमध्ये झालं नाही. यापुढेही असं काही व्हायची शक्यता कमीच. कारण यापुढे असा कर्टली अँब्रोस व्हायचीच शक्यता कमी. काय म्हणता? 

- पराग पुजारी

Friday, 1 December 2017

बोस: डेड ऑर अलाइव्ह

'बोस: डेड ऑर अलाइव्ह'  (वेब सिरीज)                                                                                         

'बोस: डेड ऑर अलाइव्ह' ही सिरीज काही दिवसांपूर्वी अल्टबालाजीवर पाहिली. या विषयावर सिरीज येणार म्हटल्यावर उत्सुकता खूप ताणली गेली होती, त्यात राजकुमार रावसारखा मजबूत अभिनेता बोस साकारणार म्हटल्यावर तर ट्रेलरपासूनच वाट पाहत होतो. सिरीजच्या नावातूनच बोस यांच्या स्वातंत्र्यसंग्रामातील योगदानापेक्षा त्यांच्या मृत्यूबाबतचे गूढ उकलण्यास ही मालिका मदत करणारी असेल, त्यावर काहीसा प्रकाश टाकणारी असेल हे स्पष्ट संकेत मिळाले होते. या निमित्ताने काही माहीत नसलेल्या गोष्टी समोर येतील असे वाटले होते. प्रयत्न खरंच चांगला, कौतुकास्पद, पण कथा आणि मांडणीच्या दृष्टीने टू बी फ्रॅंक तितकीशी इम्प्रेसिव्ह वाटली नाही. अनुज धर लिखित 'इंडियाज बिगेस्ट कव्हरअप' या पुस्तकावर आधारित ही मालिका एकता कपूरच्या बालाजी प्रॉडक्शन्सने बनवली आहे. सांस बहू, करवा चौथ छाप मालिका करून मिळवलेला पैसा तिने उशिरा का होईना पण अशा वेगळ्या विषयावरच्या उत्तम सिरीजमध्ये घातला आणि थोडे पुण्य कमवून घेतलेय असं म्हणायला हरकत नाही. एखाद्याच्या मृत्यूबाबतचे भारतातले आजपर्यंतचे हे सर्वात मोठे गूढ.. तसा खूप व्हास्ट विषय पण २२ मिनिटांच्या नऊ भागांत दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

ही सिरीज वेबवर येणार असल्याने (जिथे अजूनतरी सेन्सॉरशिप नाहीये) नेताजींच्या मृत्यूबाबत ज्या काही जरा खळबळजनक गोष्टी अलीकडे त्यांच्या फाईल्स रिओपन केल्याने उजेडात आल्या असतील त्यांना स्पर्श होईल असे वाटले होते. पण त्या आघाडीवर काहीसा अपेक्षाभंग होतो. वाद होऊ नये म्हणून घाबरत काही गोष्टींना tangent मारून त्या मुख्य वर्तुळाबाहेरच सोडल्यासारख्या वाटतात. नेताजींना वॉर क्रिमिनल ठरवण्यात नेहरूंनी बजावलेली भूमिका, नेताजींच्या कथित अपघाती मृत्यूनंतर त्यांची जर्मनीतील पत्नी एमिली यांना धमकावण्याचे काँग्रेसचे प्रकार, 'बोस इज नो मोर' या कागदावर सही करण्यासाठी त्यांच्यावर आणलेले प्रेशर वगैरे गोष्टी यात विस्ताराने येत नाहीत, ज्या याच पुस्तकाच्या अनुषंगाने मध्यंतरी विवेक मासिकातल्या एका लेखात वाचल्या होत्या. पण काही सीन्स खरंच उत्तम वठले आहेत. हिटलरशी भेट घेतल्यावर नेताजींनी तोतया हिटलर कसा ओळखला यावर 'A fake Hitler has an image to maintain, Real one does not care' असं नेताजींचं परफेक्ट कमी शब्दात हिटलरचा स्वभाव त्याच्यासमोरच त्याला सांगणारं धाडसी उत्तर, आणि तेथील भारतीय सैनिकांची फौज उभी केल्यावर नेताजींनी झेंडा फडकावून ओरिजिनल बंगाली जन गण मन म्हणणेहे प्रसंग खास

इंग्रज अधिकाऱ्यांचा चमचा असलेला भारतीय शिपाई दरबारीलाल (नवीन कस्तुरीया) याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने, त्याच्या आवाजातील निवेदनातून कथा उलगडत जाते. नेताजी या वादळाशी आपली पहिली भेट कशी एका जेलमध्ये झाली हे तो सांगतो. मग काँग्रेसी विचारधारा असताना नेताजींचा इंग्रजानाच 'खादी बेचो' हा प्रकार ब्रिटिशांना कसा चक्रावून जातो हे दिसते. आणि पुढे गांधीजींशी मतभेद झाल्यावर नेताजींचा प्रवास कसा 'खादी ते खाकी' होतो हेही समजते. सुरुवातीच्या काळात जेलमध्ये असताना बोस यांना एक दुसरा कैदीयहां कैसे आये? - कोकेन, ड्रग्ज, नही? तो फिर गांधी?' असं विचारतो, त्यावर तरुण सुभाष म्हणतो - 'गांधीजी'.. यातून त्यांचा गांधींविषयी असलेला आदर दिसतो. विदेशातून आल्यावर काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून बोस निवडून आल्यावरही बोसांच्या परवानगीशिवाय नेहरूंनी बोलावलेली काँग्रेसची बैठक पाहून संयमित संतापलेले, नेहरूंशी एकेरीत बोलणारे बोस दिसतात. कितीही टॉर्चर केलं तरी कॉन्फिडेन्शियल माहिती फोडणारे आझाद हिंद सेनेचे भक्कम मनोबलाचे सैनिक दिसतात. भारताला स्वतंत्र करण्यासाठी परदेशी सैन्याची मदत घेत चालून येण्याचा विचार करणारे बोस हे देशद्रोही आहेत आणि गरज पडली तर त्यांच्यावर तलवार घेऊन जाणारा पहिला माणूस मी असेन असे शेकडो लोकांसमोर भाषणात बोलणारे 'अहिंसावादी' नेहरू दिसतात. 'आय ऑल्वेज गेट अवे' हा डायलॉग राजकुमार रावच्या तोंडी - वेळा दिलाय. पण बोस त्यांच्याच घरी ते नजरकैदेत असताना वेषांतर करून सुटका कशी करून घेतात हा प्रसंग जरा बालिशच घेतलाय.  'बोस' हे एपिसोड्सच्या शेवटी क्रेडिट्सना लागणारे वेगवान गाणे ऐकायला मस्त.  



त्या कथित विमान अपघातानंतरही बोस संपले यावर अजिबात विश्वास ठेवणारा आणि आणखी इन्व्हेस्टीगेट करत वेळ वाया घालवत बसू नको असे आदेश मिळूनही पर्सनली खरे काय ते खणून काढायचेच म्हणून आपले प्रयत्न सुरु ठेवणारा ऑफिसर स्टॅनली हा एडवर्ड सोनेनब्लिकने मस्त साकारलाय. आपल्या लोकांनी ह्याला फिरंगी म्हणून चांगलाच वापरून घ्यायचं ठरवलेलं दिसतंय. 'इनसाइड एज' या आयपीएलसारख्या स्पर्धेतले फिक्सिंग वगैरे दाखवणाऱ्या अमेझॉन सिरीजमध्येही हा हमिश मॅककॉल या विदेशी क्रिकेटरच्या रूपात दिसतो. कपिल शर्माच्या आगामी 'फिरंगी'मध्येही हा फिरंगीच आहे. 'नीरजा'मध्येही फिरंगीच होता. 'बोस'मध्ये छाप पडून जातो हे नक्की. पण एमिली शेंकेल साकारणारी एना अडोर मात्र अगदीच माठ, किंवा साधारण म्हणू हवं तर, पण उसे कुछ बऱ्यापैकी पण जम्या नही है. शेवटच्या भागात विवाहित म्हणून कपाळावर टिकली लावल्यावर अड़ोरेबल दिसते एवढंच.

आता ही सिरीज आपल्या खांद्यावर ओढून नेलेल्या दोन अवलियांबद्दल थोडंसं... आधी प्रचंड शंका होती, की ह्याsss.. हा बारीक राजकुमार राव बोस कसा वाटेल.. आवराच.. पण दुसऱ्यांना आवरण्याचं कामच हा माणूस आपल्या अभिनयातून कायम करत आलाय. येस, बोस यांच्या भूमिकेतला राजकुमार राव हा हिरा आहेच राव. या रोलसाठी त्याने कष्टाने खास वजन वाढवलं. मेकअपमधून त्याचा चेहरा नेताजींच्या जास्तीत जास्त जवळ जाणारा केलाय. मालिकेच्या  मेकअप आणि आर्ट डिरेक्शन डिपार्टमेंटचे खास कौतुक. राजकुमार हीच काय त्याची प्रत्येक भूमिका त्या त्या वेळी अक्षरश: जगतो. कालच त्याचा 'न्यूटन' पाहिला, जो भारताकडून यावेळी ऑस्करसाठी पाठवला जातोय. काय पो चे आणि क्वीनमधला राजकुमार पाहून हा इतका भारी असेल असं वाटलं नव्हतं किंवा हा पुढे कितपत मजल मारेल याबद्दल शंकाच होती, बरेचदा तोंडातल्या तोंडात जलद बोलल्याने त्याचे काही संवाद नीट पोचत नाहीत. पण 'उडान'चा दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवाने इतका हुशार की त्याने राजकुमारला फार बोलावेच लागणार नाही असा 'ट्रॅप्ड' हा एक वेगळाच प्रयोग केला, तो जरी मर्यादित प्रमाणात यशस्वी झाला तरी हे नाणं खणखणीत वाजलं. एक माणूस संपर्काची साधने नसणाऱ्या एका ठिकाणी एकटा अडकतो हा प्रकार हॉलिवूडमध्ये खूप हिट होतो (कास्ट अवे, मार्शियन) अशा सिनेमात डायलॉग्ज फार नसतात, तो माणूस जगण्यासाठी काय काय करतो ते 'बघायचं' असतं, पण बडबड्या नाटकावर पोसलेल्या आपल्या प्रेक्षकांना संवादप्रधान सिनेमेच लागतात, अर्थात हळूहळू ही मानसिकता बदलतेय हे चांगलंय. 'अलिगढ'मध्ये मनोज वाजपेयीभोवती फिरणारी स्टोरी असूनही राजकुमारने केलेला सबॅस्टियन पत्रकार तितकाच भाव खाऊन जातो. 'शाहिद' बघायचा बाकी आहे, पण तोही भारीच आहे असं ऐकून आहे. रा रा हे राजमान्य राजेश्रीसाठी लावतात, तसा हा अभिनयात असल्यानेच त्याचे नावाचे इनिशियल रा रा असावे.

दुसरा नवीन कस्तुरीया. याचा दरबारी लाल कसा आहेइंग्रजांसाठी काम करावं लागतंय तर नाईलाजाने करू, आणि त्यातूनच जास्तीत जास्त आपल्या माणसांना जपू अशी होती. त्यांच्याविरोधात उभे ठाकण्याची आपल्यात ताकद नाही ही जाणीव असलेली व्यक्तिरेखा, पण तरीही आपल्या लोकांना किमान आपल्यामुळे फार त्रास होऊ नये असा पवित्रा. ब्रिटिशांचा चमचा, त्याच वेळी बोसांबद्दल वाटणारी काळजी, ते आणखी गोत्यात येऊ नयेत म्हणून त्यांना त्यांच्या हेतूंपासून कधीकधी परावृत्त करायचा प्रयत्न, त्यांचा पाठलाग करतानाचा भोळेपणा वगैरे अभिनयातले सर्व पदर त्याने अलगद उलगडलेत. नवीन हा ताकदीचा कलाकार आहे, त्याला आणखी नवीन नवीन रोल्स मिळाले पाहिजेत. कस्तुरीयाला टीव्हीएफच्या पिचर्समुळे अमाप प्रसिद्धी मिळाली, जितू आणि त्याने एकामागोमाग एक जबरदस्त रोल्स करत टीव्हीएफला कुठल्या कुठे नेऊन ठेवलं. IMDb च्या जागतिक टॉप १०० नव्हे तर टॉप २५० मालिकांमध्येही भारताच्या दोनच आहेत, एक पिचर्स (४०) आणि दुसरी साराभाई (५३).

सिरीजची ट्रीटमेंट आणि लूक जरा स्टायलिश आहे. 'नेताजी को पकडना मुश्किलही नही, नामुमकिन है' हे सांगणाऱ्या पुढील ओळी सिरीजमध्ये बॅकग्राऊंडला ऐकू येत राहतात
Bose…  His actions were faster than thought
Bose…  They’d look for him where he was not
Bose…  Incapable of being caught
Bose…  His lines were sharp and theirs would blot

‘बोस’ म्हणजे फक्त एक स्पीकर कंपनी नाही हे माहीत असणाऱ्या सर्वानी जरूर बघा - 'बोस: डेड ऑर अलाइव्ह' - अल्टबालाजी अँप किंवा वेबसाईटवर.