Friday, 21 October 2016

हॅप्पी बर्थडे वीरू

२००३, इंग्लिश कौंटी क्रिकेट, लिसेस्टरशायरचे दोघे बॅटिंग करतायत आणि मिडलसेक्सकडून खेळणारा पाकचा अब्दुल रझाक मस्त रिव्हर्स स्विंग करून दोघांना छळतोय. नॉन स्ट्रायकरच्या जेरेमी स्नेपला हा बॅट्समन म्हणतो की, 'बॉल जुना झालाय, रिव्हर्स स्विंग होतोय'...'होय रे, खेळताच येत नाहीये'..'Hmm, I have a plan, See' आणि मग पुढच्याच ओव्हरला एक अवाढव्य सिक्स, थेट स्टेडियमबाहेर, स्नेप आ वासून बघतोय.. अम्पायर्स झक मारत बॉक्स मागवून "घ्या, आता या नवीन बॉलने खेळा" म्हणतात. रिव्हर्स स्विंग होणार नाही म्हणून लिसेस्टरशायर खुश, आणि मग 'मानलं भावा' असे भाव चेहऱ्यावर घेऊन पुढे आलेल्या स्नेपला हा म्हणतो. "आता किमान एक तासभर तरी काय टेन्शन नाही"

तंत्रशुद्ध फलंदाजी, ठराविक टेक्निक वगैरे गोष्टींवर त्याचा कधीच विश्वास नव्हता. लहानपणी सायकल चालवताना त्याने शेवटचे लयीत पाय हलवले होते असं वाटावं इतकं अप्रतिम त्याचं फूटवर्क होतं. अमुक परिस्थितीत तमुकरीत्या खेळल्यास बॅटिंग सोपी जाते एवढंच त्याला कळायचं आणि असं करून मग समोरचे बोलर्स लवकर फ्रस्ट्रेट होतात हेही पाहायला याला आवडायचं. सचिन-सौरव ही जगातली बेस्ट ओपनिंग जोडी धुमाकूळ घालत असताना ओपनर म्हणून स्वत:चं  स्थान निर्माण करणं सोपं नव्हतं. टेस्ट असो किंवा वन डे.. सचिन, सौरव, राहुल या तिघांपैकी एक तरी खेळतोच अशी आपल्या टॉप थ्रीची ख्याती सर्वदूर पसरली होती, त्यात हा अजून एक आला आणि आपली बॅटिंग अजूनच भक्कम झाली.

वीरेंद्र सेहवाग.. खरंच वाघासारखाच खेळायचा हा.. वाघ आपली शिकार कमजोर आहे की ताकदवान आहे हे बघत नाहीच, तो फक्त हल्ला करून फडशा पाडतो. सेहवागही हा असा वेगळाच होता.. समोर बॉलर कुणीही असो, पीच कोणतही असो, आपली बॅटिंग पहिली असो की दुसरी.. असं तसं जिंकायचं तर समोरच्या टीमवर दबाव टाकायचाच आहे त्यासाठी धुलाई तर करायची आहेच ना, मग पहिल्याच बॉलपासून का करू नये, असे महान विचार असल्याशिवाय माणूस २०११ च्या वर्ल्ड कपला जवळपास प्रत्येक मॅचला (सलग पाच मॅचेस) पहिल्याच ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर चौकार मारत नाही किंवा न्यूझीलंड दौऱ्याची सुरुवात टीम साउदीला सलग तीन सिक्स मारून करत नाही. २००७ वर्ल्ड कपला बांगलादेशने आपल्याला हरवून रडवलं होतं, आणि २०११ ला पुन्हा हीच टीम पहिल्याच मॅचला समोर. टीम मीटिंग सिरियसली सुरु असताना हा माणूस कानात गाणी ऐकत बसतो, आणि गॅरी कर्स्टनकाका ओरडल्यावर म्हणतो 'बांगलादेशला काय घाबरायचंय, आपण स्ट्रॅटेजी वगैरे आखावी एवढ्या लायकीची टीम तरी आहे का ती, नुसतं जायचं आणि तुडवून यायचं, झालं..' साधारण असंच तो प्रेसमध्येही बोलला की 'बांगलादेश ही एक अतिसामान्य टीम आहे'.. अर्थात हे त्यालाच शोभतं, कारण मॅचमध्ये आपल्या ३७०, त्यात याच्या १७५.. मॅन ऑफ द मॅच.

सेहवाग असाच बेदरकार, फुल केअरलेस एटीट्यूड पांघरून मैदानावर उतरणारा, पण बहुतेकदा आपला हा एटीट्यूड खराही करून दाखवणारा.. की 'या फालतू टीमला काय घाबरायचं, त्या बॉलरला काय एवढं महत्त्व द्यायचं.. म्हणत होतो ना'.. आणि मग कोच, कॅप्टन, इतर खेळाडू कुणीच काही बोलू शकायचे नाहीत.  कोच जॉन राईटनीही सांगितलं होत की सेहवागला त्याच्या पद्धतीने खेळू द्यावं, त्याला शिकवत बसण्यात काही अर्थ नाही.

हॅन्ड-आय को ऑर्डिनेशनचा वीरू हा आधुनिक बादशाह होता, सचिनबद्दलही वाचलं होतं की त्याची डाव्या डोळ्याची नजर तेज आहे, त्यामुळे  बोलरच्या दिशेने पाहत असताना त्याला चेंडूचा अंदाज लवकर घेता यायचा. हेच काहीशा फरकाने ब्रायन लाराच्या बाबतीत, त्याची बॅटिंग बघताना असं वाटायचं की कोणत्याही बॉलवर याच्याकडे तीन शॉट्स तयार आहेत आणि अति लेट खेळायच्या सवयीमुळे (पुढे ही शैली जयवर्धनेनेही शिकून घेतली) तो ऐनवेळी त्यातला हवा तो शॉट निवडून खेळू शकायचा, सतत शफल केल्याने बोलर आणि फिल्डर्सनाही कळायचं नाही. पण 'क्रिकेट हा माईंड गेम आहे' असं जे सचिन नेहमी म्हणत आला तेही सेहवागने जपलं.. कसोटीत जिथे गावसकर, तेंडुलकर, द्रविड याना त्रिशतक ठोकणं जमलं नव्हतं, तिथे हा पट्ठ्या दोन त्रिशतके नावावर करून बसलाय जे मानसिक कणखरता, एकाग्रता असल्याशिवाय शक्य नाही. तेही बांगलादेश, झिम्बाब्वेसारख्या आंडूपांडू टीमपुढे नव्हे, तर पाकिस्तान आणि साऊथ आफ्रिकेच्या बोलर्सना झोडपून त्यानं हे साध्य केलंय, याचं विशेष कौतुक. टेस्टमध्ये फास्टेस्ट अडीचशे आणि तीनशेचा विक्रम अजूनही नावावर मिरवतोय. वनडेत दोनशे आणि कसोटीत तीनशे करणारा हा एकटाच होता, आता ख्रिस गेलही जाऊन बसलाय त्याच्या बाकावर.  मॅक्ग्रा, वॉर्न, अक्रम, वकार, अख्तर, मेंडिस, मुरली, वास, पोलॉक, डोनाल्ड सगळेच कधी ना कधी डोकं धरून बसलेत याच्यामुळे. (तसे ते द्रविडमुळेही बसलेत... पण कारण अगदी उलट. 'अरे कधी हा बॉलला बॅट लावणार.. का इतक्या लांबून पळत येत सारखा पोपट करून घेतोय मी स्वत:चा')

मेंडिसवरून आठवलं, मिस्ट्री बोलर म्हणून याने लौकिक मिळवला होता, स्पिन चांगला खेळणाऱ्यानाही नाचवलं होतं, तेव्हा गॉल टेस्टमध्ये सेहवागने याला धू  धू धुतला, द्विशतक मारलं. पण त्यावेळी 'मेंडिसच्या सो कॉल्ड अद्भुत स्पिनला खेळताना काही स्ट्रॅटेजी केली होतीस का' यावर तो पत्रकाराला म्हणाला होता, 'भाईसाब, स्पिनर को स्पिनर बॅट्समन बनाता है, फिर उसका कॉन्फिडन्स बढता है और वो विकेट ले सकता है.. मैने उसे स्पिनर बननेही नही दिया, उससे क्या डरना?" मग पुढे जग मेंडिसला मारू लागलं.



सेहवाग बॅटिंग करताना बरेचदा किशोर कुमारची गाणी म्हणत खेळायचा हे सचिननेही सांगितलंय. (तेव्हा तो मनात असं काही ठरवत असेल का की 'पुढचं कडवं म्हणून होऊपर्यंत अजून दोन फोर्स मारेन, नाहीतर गाणंच बदलेन'.. शक्यतो त्याला गाणं बदलायला लागलं नसावं.) या गुरु सचिनला कुणी काही बोललं की याला अजिबात सहन व्हायचं नाही. याचेही काही किस्से फेमस आहेतच. नवख्या मायकेल क्लार्कने कांगारू बाण्याला जागून जेव्हा सचिनला  स्लेजिंग केलं तेव्हा वीरूने त्याला जाऊन विचारलं बाळा तुझं वय किती..  तो म्हणाला.. २५, होय ना, मग लक्षात ठेव, कारण तुझ्या वयापेक्षा जास्त तर सचिनची शतके आहेत. शोएब सतत बाउन्सर टाकून हुक मार की असं उकसावत असताना शांतपणे त्याला हा म्हणणार, 'बॉलिंग टाकतोयस की भीक मागतोयस.. नॉन स्ट्रायकर एन्डला तुझा बाप आहे, त्याला सांग'.. मग लगेच सचिन अख्तरला बाउन्सरवर सिक्स मारणार.. अशावेळी द्रविड, लक्ष्मण असते तर 'कशी जिरली' असं मनात म्हणत  फारतर गालात हसले असते, पण वीरूच्या अंगात इनबिल्ट किडे.. तो शोएबला जाऊन म्हणतो, 'बेटा बेटा होता है, बाप बाप होता है'.. हा किस्सा तर फेमसच. असे किस्से किंवा दंतकथा खऱ्या खोट्या असतीलही, पण त्या वीरूच्या नावाला जोडल्या तरच पटू शकतात हेही तितकंच खरं.

फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये तीन त्रिशतके मारणाऱ्या ब्रॅडमन, ग्रेस (कवी नव्हे), हॅमंड, लारा, हसी वगैरेंच्या पंगतीत जसा सर रवींद्र जडेजा हा एकच भारतीय आहे, तसे टेस्टमध्ये दोन त्रिशतके ठोकणारेही दोघेच - ब्रॅडमन आणि सेहवाग. दोघेही एकदा २५४ वर आउट  झाले, शिवाय ब्रॅडमन एकदा २९९ वर नॉटआउट तर वीरू एकदा २९३ वर आउट. (दुसऱ्या दिवसअखेर सेहवाग २८४ वर नाबाद म्हणून आमचे टीसीएसवाले दोन मित्र शुक्रवारी ऑफिसला दांडी मारून ब्रेबॉर्नवर वीरुचं ३०० बघायला गेले आणि मुरलीधरनच्या बॉलिंगवर त्यालाच कॅच देत वीरूने २९३ वर आउट होऊन दाखवून दिलं की त्याला बेभरवशाचा का म्हणतात.) मेलबोर्नला १९५ वर असताना सिक्स मारायला जाऊन आउट झालेला, आणि 'दोनशे दिसत असताना असं का?' या प्रश्नावर 'उसमे क्या है, मूड हुआ तो किया स्टेपआउट, दोसौ फिर बनाऊंगा' असं उत्तर मुलतानला पहिलं त्रिशतकही सिक्स मारून ठोकणारा हा वाघच देऊ शकतो.

सध्या निवृत्त झाला असला तरी ट्विटरवर वीरू तुफान बॅटिंग करतोय.. मग ब्रिटिश पत्रकार पिअर्स मॉर्गन असो की आपले देशी राष्ट्रपुरुष अरविंद केजरीवाल.. कुणी सुटत नाही. परवा अगदी गुरु सचिनसोबतही त्याची झालेली खेळकर ट्विटाट्विटी फेमस झाली. आमच्यासाठी आधी आवडता खेळ, मग त्यातला आपला आवडता खेळाडू..  म्हणूनच २००३ फायनलला ३६० सारखा स्कोर चेस करताना तू आणि द्रविड एकत्र खेळत होतात, विकेट्स तर पडतच होत्या, तेव्हा त्याच्यापेक्षा तूच शेवटपर्यंत टिकायला हवास असं द्रविडभक्त असूनही वाटत होतं यातच सगळं आलं. आमच्यासाठी क्रिकेट हा नेहमीच फार सिरीयस होऊन त्यात इन्व्हॉल्व्ह व्हायचा खेळ, झालेली मॅच जर तर मध्ये बोलत ती परत जगायचा खेळ.. त्यात तू खरा एंटरटेनर म्हणून आलास आणि तेंडुलकर, द्रविडइतका फार अभ्यास न करताही पेपर गाजवता येतात हे दाखवून दिलंस. सचिन, राहुल, सौरवने तेव्हा आमची पिढी व्यापून टाकली असतानाही आमच्या मनात शिरकाव करणं सोपं नव्हतं, ते फक्त तुला आणि युवराजलाच जमलं. तुझं करियर अजून थोडंसं (या पोस्टइतकं) लांबलं असतं किंवा सलग झालं असतं तर तूही टेस्ट आणि वनडे दोन्हीत १०००० करू शकला असतास यात शंका नाही.

असो, २० ऑकटोबर  तुझा वाढदिवस.. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.. असाच आम्हाला एन्टरटेन करत राहा.. मिस यू...

(प)रागदारी 5

बॉस

राग: यथेच्छ माज यथेच्छ खाज

सलाम बॉस.. काय मग, कसे आहात बॉस.. सर्व काही कुशल मंगल ना बॉस? तुम्हाला वाटेल आज अचानक हे बॉस बॉस काय लावलंय, पण असं नाहीये ते. बास का बॉस,. आमचीपण काही क्रिएटीव्हिटी नको काय अधूनमधून? आणि हे उगाच नाही, तर अतिदर्जेेदार हिंदी गीतांच्या रसग्रहणात आजचे गाणेच असे बॉसपुराण गाणारे, बॉसची कायच्या काय महती विशद करणारे आहे. होय, अक्षयकुमार उर्फ अक्की यांचे बॉस हे गाणे. हे गीत अक्की महाराजांच्या बॉस नामक चित्रपटाचे शीर्षक गीत होय. 'यथेच्छ माज यथेच्छ खाज' या रागातील या गीतासाठी पेन वापरलंय कुमार यांनी, गळा साफ केलाय मीत ब्रदर्स, अंजान आणि द यो यो हनी सिंग यांनी तर बाजा वाजवलाय मीत ब्रदर्स अन अंजान यांनी. 

चला तर जरा वाट करून द्या.. ओह, तुम्हाला नाही म्हणत हे मी. सॉरी,. चुकून थेट रसग्रहणच सुरु केले. आधी प्रथेप्रमाणे या प्रारंभीच्या अप्रतिम काव्यपंक्ती पाहू...
मेक वे फॉर द बॉस...
ओह मदर फादर लिसन अप.. वोह
है गली गली में शोर, है बॉस में इतना जोर
इक बार भडक जाये, तो धरती देगा तोड

वा वा वा, म्हणजे सुरुवातीलाच असे म्हटले आहे की बॉस, सॉरी द बॉस यांचे थोड्याच वेळात या ठिकाणी आगमन होत आहे. तर ऐका हो ऐका, महत्त्वाची गोष्टेय, सर्व मातापिता वर्ग, नीट कान देऊन ऐका, लक्ष देऊन ऐका. चला हवा येऊ द्या, म्हणजे जरा वाट करून द्या. गल्लीगल्लीत ज्याच्या नावाचा डंका (आणि दणकाही) आहे तो बॉस येत आहे होsss, त्याच्यात इतकी मस्ती, सॉरी रग आहे, जोर आहे की तो भडकला तर या अख्ख्या धरतीचेच तुकडे तुकडे करून टाकेल. तो येत आहे होsss 

मिनिस्टर जैसे तेवर, हर कोई लेता फेवर
अपनी अप्रोच उंची, हम तो है दुनिया के बॉस
ह्याबिट अपनी है देसी, ट्रको में फुल है एसी
म्युझिक सुनते है हाय, हम तो है दुनिया के बॉस
बॉसचे वर्णन करताना पुढे असे मांडले आहे की या बॉसचे नखरे, म्हणजेच जीवनशैली, राहणीमान इत्यादी गोष्टी एखाद्या नेत्यासारख्या आहेत. याला म्हणतात उच्च राहणी आणि उच्चच्यापण वरची विचारसरणी.. मग कुणीही त्यांच्याकडे मदतीची अपेक्षा करत याचना करू लागला तर त्यात नवल ते काय? बॉसची ओळख वरपर्यंत आहे, म्हणूनच ते जणू अवघ्या विश्वाचे बॉस आहेत. (अतिशयोक्ती अलंकार) त्यांची सवय मात्र देसी आहे, उदाहरणार्थ: वातानुकुलित ट्रकमधून प्रवास करताना मोठ्या आवाजात संगीत ऐकणे. वा वा, आपल्या मातीशी मुळं घट्ट असावीत ती अशी. चला पटकन टेका डोके, बॉसच्या चरणी लीन व्हा. कारण,

बॉस... है हुकुम का इक्का, बॉस...है लाखो का सिक्का
बॉस...हर जगह पे लिख्खा, बॉस...बॉस...बॉस...बॉस...
बॉस...सिक्स पॅक का शहेनशाह, बॉस...बस ब्रांड पहनता
बॉस... अटीट्यूडसे बनता, बॉस...बॉस...बॉस...बॉस...
बॉस हाच खरा हुकमाचा एक्का आहे, तोच लाखात एक असा अस्सल सिक्का आहे. जळी स्थळी काष्ठी पाषाणी असे यत्र तत्र सर्वत्र केवळ एकच शब्द लिहिला आहे - 'बॉस', नव्हे जणू शिलालेखावर कोरतात तसा कोरूनच ठेवला आहे. बॉसची बॉडी पण लय भारी आहे राव, सिक्स पॅकचा शहेनशहा या भूतलावर कुणी असेल तर तो एकमेवाद्वितीय असा बॉसच. तो केवळ ब्रांडेड कपडेच परिधान करतो (सांगितले ना तो उच्च राहणीवाला आहे म्हणून). असा बॉस बनणे म्हणजे कोणा सोम्यागोम्याचे काम नव्हे, ऐऱ्यागैऱ्याचेही नव्हे, येरागबाळ्याचे तर त्याहून नव्हे. (थोडक्यात आपल्यासारख्यांचे नव्हे.) जबरनाक खतरदस्त अटीट्यूडच्या सहाय्यानेच बॉस बनणे शक्य आहे. यातून कवी हलकेच जीवनात यशस्वी होण्यासाठी सुयोग्य दृष्टीकोन असणे किती महत्त्वाचे आहे हे अलवार सांगून जातो.  


   
अब अपनी के तारीफ करू, उपरवालेसे में डरू
जे कोई बने घन लेंडलॉर्ड, उने मार घुसांड मैं धरू
हम हरयाणा के इकलोते किंग, बहुत है अपनी फ्यान फोलोइंग
पर अपने को कोई फर्क नि पडता, वोई है सबका कर्ता धर्ता
यापुढे यो यो हनीसिंगांचा करिष्मा सुरु होतो. बॉसला शरण जाऊन त्याला सबस्क्राइब होऊन त्याची महती डिस्क्राइब करताना हनीभाऊ त्यांच्या अनोख्या शैलीत पण बॉसच्या वतीने म्हणतात, आता मी माझेच काय कौतुक करू? असामान्यत्वाला पोहोचूनही नम्र बॉस त्या परमेश्वराच्या चरणी मात्र नतमस्तक आहे आणि म्हणूनच आत्मप्रौढीचा धोका तो पत्करू इच्छित नाही. परंतु म्हणून कुणी बॉसच्या क्षमतेविषयी शंका घेण्याची हिम्मतही करू नये.
उदाहरणच द्यायचे झाले तर बॉसच्या इलाख्यात कुणी अन्यायी जुलमी जमीनदार असलाच तर गाठ बॉसशी आहे, त्यामुळे नीट जगायचे असेल तर गप (आपापल्या) चड्डीत राहावे. काही झाले तरी आपण हरियाणा प्रांताचे एकमेव राजे आहोत, आपले भक्त असंख्य आहेत.. पण ही जाणीव असूनही नम्र बॉसचे म्हणणे असे आहे की ह्या नश्वर इहलोकातल्या अशा भौतिक गोष्टीनी त्याला फरक पडत नाही, ही धुंदी त्याच्या डोक्यात जात नाही, कारण शेवटी कर्ता करविता तो परमेश्वर आहे हे तो मनोमन जाणून आहे. वा वा, अंगी नम्रता असावी ती अशी. नाहीतर आजकाल अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणारे काय कमी आहेत? सतत स्लेजिंग करणारे माजोर्डे ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू यातून काही शिकतील काय?      

दिल का हू थोडा रंगीन, पर भैंस के आगे न बजाता बीन
मुझको तो तू आगी पसंद, कमॉन बेबी डोन्ट बी मीन
आज तेणे सैर करादू, गुची लुइस तने दिलवा दू
अक्षय कुमार तो भाई है अपना, तू बोल तो सही फोटो करादू  
हा बॉस काही फक्त राकट, धटिंगण, रफ एन टफच नाही तर इनफ संवेदनशीलही आहे. म्हणूनच पुढे बॉसची हळुवार बाजूही मांडली आहे. तो रसिक मनाचा आहे, थोडासा रंगेलच म्हणा ना. पण म्हणून काही तो दिसली मुलगी, पड प्रेमात या कॅटेगरीतलाही नाही. अर्थात एखादी आवडल्यास तो तिला प्रेमाने जवळ बोलावतो, तुला फिरवून आणेन म्हणतो, इतकेच काय तर तुझे जे काय स्त्रीसुलभ हट्ट असतील तेही पुरवेन म्हणतो. असे लाडबिड पुरवणारा साथीदार मिळाल्यास स्त्रीची भीड आपसूकच चेपते नि मग फॉर फ़र्दर वाटचाल, ती शक्यतो कुणाची भीड बाळगत नाही.
'अगं तुला म्हणून सांगतो, अक्षय कुमार स्टार असेल जगासाठी, अपुन को तो भावासारखाच आहे, तुला हवा तर त्याच्यासोबत तुझा फोटोही करून देतो, बोल गं तू बोल फक्त, पायजेल तर बोलच. तेवढी वट आहे आपली.. टेन्शन नै बग.' वा वा, यातून बॉसमधला बंधूभाव हा अंगभूत गुण तर दिसतोच, शिवाय समोरच्याची आवडनिवड लक्षात घेऊन त्यानुसार त्या व्यक्तीला मदत करण्याची, त्याद्वारे आनंदी करण्याची वृत्तीही प्रकर्षाने दिसते. सांगा किती आहेत आज असे निर्मळ मनाचे लोक, मोजायलाच गेलात तर एका हाताची बोटेही जास्त होतील कदाचित. असो..

बादशाह सबके, बडे बडे रहते दबके
शाही नेचर, लार्ज हार्टेड बंदे रब के
असा हा बहुत जनांसी आधारू असणारा बॉस अर्थातच अगदी निर्विवादली सर्वांचा बादशाह ठरतो. भले भले त्याला वचकून राहतात ते म्हणूनच. मनाची श्रीमंती अपरंपार असल्याने ज्याचे मन मोठे आहे (डबल एक्सएल साईज तर सहज) आणि ज्याचा थाट राजेशाही आहे (डबल बहुव्रीही समास, आणि सांगितलं ना दोनदा ऑलरेडी की उच्च राहणी म्हणून) असा हा बॉस, याला काही तोडच नाही. 

ऑल वर्ल्ड में अपना डंका, फुंके ये दुश्मन की लंका
चॉपर बनाले सर का पंखा, दे दे रुकी ट्रेन को धक्का 
अशा या बॉसचा जगभर डंका पिटला जातोय आणि हे तो कम्प्लीटली डिझर्व्हच करतो. शत्रूच्या लंकेची तर हा अश्शी अश्शी वाट लावू शकतो. हेलीकॉप्टर तर बॉस डोक्यावर पंखा म्हणून वापरतो, आणि एवढेच नव्हे तर थांबलेल्या ट्रेनलाही तो एक हलकासा धक्का देऊन सुरु करू शकतो. वॉव, मुंबईचे लोकल ट्रेन व्यवस्थापन याकडे लक्ष देईल काय? स्पेशली सेन्ट्रल आणि हार्बर लाइन, उगाच किती रविवारी मेगा ब्लॉक घेत बसणार राव आणि पेंटाग्राफ तुटले म्हणून लोकलसेवा विस्कळीत झाल्यावर प्रवाशांच्या, चाकरमान्यांच्या शिव्या तरी किती दिवस खाणार? त्यांचे होणारे हाल तरी कमी होतील, दुवा मिळतील तुम्हाला... घ्या जरा मनावर. आमचा बॉस उदार मनाचा आहे, नाही म्हणायचा नाही.
   
हे यो लिसन एव्हरीबडी, द बॉस इज एव्हररेडी
टू ब्रेक अँड शेक इट डाऊन
बॉस खिलाडी है, सेक्सी बॉडी है
हरयाणा में खुद की पहाडी है, बॉस तो होते थोडे नॉटी है
बडी कूल उसकी बहन की लोरी है
हे यो, (अध्यात्मात, ध्यानधारणेत श्री आणि ओम यांना जे महत्त्व आहे तेच अशा आधुनिक गाण्यात हे आणि यो यांना आहे. ते म्हटलेच पाहिजे, दखल घेतलीच पाहिजे.) प्रत्येकाने ऐका, बॉस २४*७ तय्यारच असतो - कद्दीपन केव्वापन कुट्टेेपन. तोच खरा खिलाडी आहे, त्याची बॉडी तर तोबा तोबा प्रमाणात सेक्सी आहे. अरे टिचभर टू/थ्री बीएचकेचा रुबाब करणाऱ्यानो, हरियाणात बॉसचा स्वत:चा अख्खा एक डोंगर आहे डोंगर, आहात कुठे? या खोडकर बॉसची भगिनी अंगाई गाते तीही किती प्रसन्न वाटते. थोडक्यात त्याचे खानदानच कलासक्त आहे.

है बडे धुरंधर, दुनिया है अपने अंडर
अपने ऑर्डरसे, बदले हर साल कॅलेण्डर
ऑलराईट है अपने फंडे, माइंड गरम पर दिल के थंडे
टेस्ट को खेले समझके वनडे
करदे हर दिल को पक्का
हे ये सुनलो सारे, ये बॉस हमारे है तगडे चट्टाने फाडे
श्रीयुत बॉस हे सॉल्लिडपैकी रणधुरंधर आहेत. त्यांच्या रीतसर परवानगीशिवाय पानही हलत नाही. अहो साधे वर्षदेखील संपून नवे वर्ष सुरु होताना बॉसची परवानगी काळालाही घ्यावीच लागते. म्हणजेच काळही थिजवून ठेवणाऱ्या या बॉसच्या टाचेखाली जणू ही अवघी दुनियाच आहे. (बापरे, वामनावतार रिटर्न्स की काय!)
ते काही असो, पण बॉसला क्लिष्टता आवडत नाही. त्याचे सारे फंडे, त्याची तत्त्वे मात्र अगदी सरळ नि स्पष्ट आहेत. भडक डोक्याचा असला तरी तो सहृदय नि हळवा, कोमल मनाचा आहे. कसोटीही तो वनडेप्रमाणे खेळतो (सेहवागच्या डेट्स न मिळाल्याने अक्षयला सिनेमात घेतले असावे).. कमकुवत मनाच्या लोकांना मजबूत मन कसे आत्मसात करावे हेही तो शिकवू शकतो. उद्या बॉस मोटिव्हेशनल स्पीकर बनला किंवा त्याने काउन्सेलर म्हणून ऑफिस टाकले तर आश्चर्य वाटायला नको. अरे बॉस इतका तगडा आहे की मोठमोठे खडक वा शिळाही तो अस्से अस्से तोडू फोडू शकतो. (अशीच एखादी शिळा फुटून त्यातून आणखी एखादी अहिल्या बाहेर येईल काय?) ताकद का चेष्टा राव! तर असे हे बॉस द ग्रेट!       
             
तर हे होते या आजचे दमदार गाणे. लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच नव्या अतिदर्जेदार गाण्यासह. तोपर्यंत सर्वशक्तिमान बॉसला शरण जा आणि वेळच्या वेळी त्याने दिलेलं ऑफिसमधलं काम पूर्ण करत जा. समस्त नोकरदारो के हित में जारी.  तुमच्या दुनियेचा तोच बॉस आहे. आणि नवरे लोक्स, सात फेरे घेऊन तुम्हीच घरात हौसेने वाजतगाजत आणलेल्या बॉसला शरण जा. त्यातच तुमचे (दोनवेळच्या  जेवणासकट) भले आणि लाइफ़टाइम सौख्य सामावले आहे.
(प)रागदारी 4

जॉनी जॉनी 

राग: आटोकाट काठोकाठ सारवासारव आटोक्यात

अतिदर्जेदार नवीन हिंदी गीताभ्यासात आज आपण रसग्रहणासाठी निवडलेले गाणे आहे ते म्हणजे मयुर पुरी नामक गीतकाराने 'इट्स एन्टरटेनमेंट' या चित्रपटासाठी लिहिलेले 'आटोकाट काठोकाठ सारवासारव आटोक्यात' या रागातील गीत - जॉनी जॉनी'. संगीत आहे जिगर-सचिन यांचे, तर गायले आहे जिगर, माधव, प्रिया यांनी.

जॉनी जॉनी - हां जी
तूने पी है - ना जी
मुंह तो खोलो - हौ जी
झूठ बोलेया - ना जी
वा वा वा, पहा पहा, कविमहाराज काय म्हणतात,  कीआजच्या काळातील मनुष्यप्राणी दारू पितो की नाही हेच आज सत्य असत्याची पडताळणी करण्याचे परिमाण बनले आहे.किती सुंदर विचार! उगाच कशाला त्या महागड्या नार्को टेस्ट, लाय डिटेक्टरसारख्या टेक्नोलॉजीच्या डोंबलावर पैसे घालवायचे? ‘हे जॉनी, तू प्यायला आहेस का, तोंड उघड बघू,तू काही खोटे तर बोलत नाहीयेस ना बाळा...’ पहा,किती सौम्य भाषा. थोडक्यात कवीला असेसुचवायचे आहे की एखादा खोटे बोलतोय असा संशयआपल्याला येत असेल तर त्याच्यावर थेट तसा आरोप न करता,  त्याच्या कलाने  घेत हळूहळू एखादी गोष्ट काढून घ्यावी. होय, हीच शिकवण आपल्याला यातून मिळत नाही  काय? उगाच कशास्तव एखाद्यास लागेल असे बोलून त्याचा राग ओढवून घ्यायचा? पिणाऱ्यांना असे दुखावून अशाने आपलीच ड्राय डेला सोय झाली नाही तर आपले काय होईल अशी छुपी भीती तर यामागे नसेल ना? मोठमोठ्या कवींचे गर्भितार्थ आपल्यासारख्या पामरांना सहजासहजी लागत नाहीत हेच खरे.

नो नो नो, मैने पी नही है (गुणिले तीन)

म्हणजेच कविश्रेष्ठ पुढे (तीनदा) म्हणतात, “नाही नाही नाही, मी प्यायलेलो नाहीये”… आता हे वाक्य तीनदा म्हणायची काय गरज असा प्रश्न एखाद्या अडाण्यास पडूही शकतो. पण आजचा डेली सोपचा जमाना लक्षात घेत कवीने ही जी हुशारी दाखवली आहे तिच्यापुढे नतमस्तक व्हावेच लागेल. आपण दुसऱ्याकडे बघतो आहोत हे समजण्यासाठीही  तीनदा मान (डोळे मोठे करून) वळवावी लागण्याच्या या सांप्रत काळी 'मी प्यायलेलो नाहीये' ही गोष्ट तीनदा सांगितली तरच ती समोरच्यापर्यंत पोहचू शकेल हे त्यास पक्के ठाऊक आहे.
“नाय नो नेव्हर, शक्यच नाही राव, उगाच ऐकून घेतोय म्हणून कायपण काय, छे छे छे, अरे हा कसला घाणेरडा गलिच्छ आरोप”  पहा, जॉनीच्या कोमल मनाला असा आरोप झाल्याने किती यातना होत आहेत. तो ओरडून सांगतोय की नाही, त्रिवार नाही. मी (स्वत:हून) पिणे शक्यच नाही. देशी असो वा विदेशी, एकच प्याला असला तरीही नाही. पण खरी गोष्ट तर पुढे आहे जी तुमच्याआमच्यासारख्यांच्या मनातदेखील येणार नाही. पुढे कविवर्य जे  स्पष्ट करतात ते अधिक हेलावून टाकणारे आहे. हे ऐकून,वाचून कोणत्याही संवेदनशील माणसाच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय, किंबहुना त्याचे लिव्हर खवळल्याशिवाय राहणार नाही.

हां जी, मैंनू पिलादी गयी है, जो भी है सही है, मजा आ रही है
म्हणजेच काय तर मला प्यायचीच नव्हती, मला जबरदस्तीने पाजण्यात आली. माझा काहीच पुढाकार वा सहभाग नव्हता. काय चुकीचं बोलला तो? असं होतंच ना की कधी  कधी वाईट संगतीमुळेआपल्याला प्यावी लागते. म्हणजे ४ जण जमले आहेत, कुणी खुर्चीवर, कुणी स्टुलावर, कुणी खांबाला टेकून. आणि प्यायला एक अख्खा खंबा उपलब्ध  आहे, पण इतर तिघे इतके हट्टी, हेकेखोर, दुराग्रही की जर्रा म्हणूनदेखील पीतच नाहीयेत. अन त्यामुळे एकावरच सर्व भार पडला आहे नि त्याला नाईलाजाने ती संपूर्ण दारू संपवावी लागतेय. दुष्ट रे दुष्ट, हायली स्वार्थी, सुपर करंटे मेगा दळभद्रे टेरा नतद्रष्टे गिगा हलकटे! कुठे फेडतील हे पाप, अशावेळी मित्राला दारूच्या  आहारी जाऊ न देणे हे आमचे मित्र म्हणून कर्तव्य होते, अशा लटक्या सबबी देऊ नयेत. इथे गरिबांना एकवेळसुद्धा धड खायला, प्यायला मिळत नाही, आणि तुम्ही अशी आयती मिळालेली खुशाल वाया घालवणार? मित्राचा भार हलका करण्यासाठी त्याला काहीच मदत करणार नाही, तो काय इंजीनियरिंगचा प्रोजेक्ट आहे काय की ग्रुपमधल्या एकानेच जीव तोडून काम करायचं आणि  बाकीच्यानी एक्जाम येऊपर्यन्त टिवल्याबावल्यात करियर करायचं? अरे थूत तुमच्या जिंदगानीवर. तो नाईलाजाने पीत असताना नुसते अक्षरश: बघ्याची भूमिका घेणारे, स्वत: मैदानात मदतीसाठी न उतरणारे हे मित्र.. छे छे, मित्र तरी कसं म्हणावं यांना.. एवढे माजलात होय रे? अशी नॉनप्रॉडकटीव्ह, नॉनकोऑपरेटिव्ह वाईट संगत  असताना जर कुणी अशा कारणाने अट्टल बेवडा बनलाच, तर यात दोष त्याचा की त्याच्यामित्रांचा? मग जे आहे ते योग्यच आहे, उलट याची मला मजाच येते आहे असे निरुपायाने त्या बळीच्या बकऱ्यास म्हणावे लागले तर त्यात आश्चर्य ते काय?



इन द बार इन द कार, इसके सियापे है हजार
पीती रहती है फिर कहती, मैने पी है पहली बार
इन द बार इन द कार, गिर गिर गिर चलता है यार
पीता रहता फिर भी कहता, कलसे छोड दूंगा यार
सुनता नाही बाप की, आदते खराब की
हर बोतल पे कहता है ये, लास्ट होगी आजकी

बार असो वा कार असो, भेदभाव करू नये. दारू तर निर्जीव असते, आपल्याला कोण कुठे बसून प्राशन करते आहे हे त्या बिचाऱ्या बापडीला कसे कळणार? अमुक ठिकाणी पिऊ नये, तमुक वेळी ढोसू नये इत्यादी मर्त्य मानवाने पाळलेले काही विधिनिषेध असोत की संस्कार वगैरे इतरहितकारी, विधायक, निरुपद्रवी, निरुपयोगी गोष्टी असोत, या सगळ्यांशी त्या निरागस मदिरेला काय देणे घेणे.
कुणीही प्यायल्यावर आणि नको त्या व्यक्तीकडून पकडला गेल्यावर असेच म्हणतो की पहिल्यांदाच घेतली... हम्म, होतेच की असे. आणि आयुष्यातील सर्वच गोष्टीना हे तत्त्वज्ञान लागू पडत नाही काय? राजकारणी घोटाळा करतो आणि समजा तो (चुकून) सिद्ध झालाच, तर तो असे सांगेल का हा माझा १८ वा घोटाळा. नाही ना, तो तर असेच म्हणेल की ‘अरेरे, हे काय बरेघडले माझ्या हातून, प्रथमच प्रमाद घडला हा, पुन्हा असे नाही होणार.’ परीक्षेत कॉपी करताना विद्यार्थी सापडला तर असे म्हणेल का की 'मी तर प्रत्येक पेपरला असे करतो मग आजच का बरे तुम्ही मला पकडलेत, तुम्हाला काही लाज?' नाही म्हणत ना तो असे, उलट तो साळसूदपणे म्हणतो की परत आयुष्यात असे करणार नाही. हे म्हणताना उद्याच्या पेपरसाठी काय नवी शक्कल लढवावी याचा विचार त्याच्या मनात सुरूही झालेला असतो. पण ह्यास दूरदृष्टी म्हणतात. देशाला महासत्ता व्हायचे असेल तर या भावी पिढीत असे हुशारी, प्रसंगावधान, हजरजबाबीपणा, संकटसमयी डगमगून न जाण्याची वृत्ती, दूरदृष्टी इत्यादी गुण विकसित होणे ही काळाची गरज नव्हे काय? भुरटा चोर असो की पाकीटमार, किंवा साधा विदाउट तिकीट प्रवासी, कुणीही असेच म्हणेल ना की अहो हे पहिल्यांदाच झाले माझे असे, उद्यापासून  नाही होणार.

काव्यात पुढे असे नमूद केले आहे की जास्त झाल्याने कितीही अडखळत, ठेचकाळत, पडत धडपडत चालणे होत असेल तर बेडरपणे उत्तर द्यावे की - 'आजचा दिवस माझा, हवं तर उद्यापासून सोडून देईन.'  'सुनता नाही बाप की' या ओळीचा अर्थ शब्दश: घेणारा तर मूर्खच म्हटला पाहिजे. खरेतर वाईट सवयीसोड बाबा आता असा वडीलकीचा सल्ला कुणीही देऊ शकतो. नाहीतर काय, एकट्याने बसून घेणे ही वाईटच सवय. घसा गरम करण्यासाठी मैफल जमवावी. जॉनी जॉनी, चुग इट चुग इट  यातून तर फुर्र फुर्र करत चवीचा पूर्ण आस्वाद घेत पी असेही जॉनीस सांगण्यात आले आहे.  त्यावरही सावध जॉनी ‘लास्ट होगी आजकी’ असे म्हणत हा प्याला शेवटचा असे बाणेदार उत्तर देतो.

जॉनी जॉनी - हां जी
दो दिखते है - हां जी
आंखे खोलो - हां जी
झूठ बोलेया - ना जी
यापुढे कवी दारूने पोटात ठाण मांडलेले असतानाही साधे गणित आणि व्यवहारज्ञान विसरू नये हे सुचवतो, यासाठीच तो जॉनीला डोळे उघडायला लावतो आणि "दो दिखते है का रे शिंच्या?" अशी प्रेमाने पृच्छा करतो. आणि हे योग्यच आहे कारण अशावेळी समोरचा नशेत आहे ह्याचा फायदा घेऊन एखादा रिक्षावाला वा ट्याक्सीवाला आर्थिक गैरफायदा घेऊ शकतो, बारमधून इप्सित स्थळी (शक्यतो घरी - स्वत:च्याच, पत्ता नीट सांगता आल्यास) सोडताना मीटरवरील आकडे काहीही असले तरी तो कितीही उकळू शकतो. म्हणूनच नशेत असले तरी भान राखले पाहिजे असा मोलाचा सल्ला हा गणितप्रेमी कवी अप्रत्यक्षरीत्या देतो.

कभी बर्थडे कभी शादी, कभी पूरी कभी आधी
यारो ने मिलके पिलादी मुझको
कभी हेप्पी कभी टेन्शन, डेली कोई नया रिझन
यारा बस चाहिये अटेन्शन तुझको
नो नो नो, मैने पी नही है मैने पी नही है मैने पी नही है
हांजी मैनू पिलादी गयी है पिलादी गयी है, ज्यादा हो गयी है
कलसे पार्टी नही है
जिंदादिल आणि सतत उत्साही असणारा माणूस उगाच काळवेळ बघत बसत नाही.  त्याचा प्रत्येक क्षण उत्सवी असतो. सेलिब्रेट करायला काही ना काही निमित्त शोधून काढतोच, हेच जिवंतपणाचे खरे लक्षण नव्हे काय? प्यायची इच्छा झाली की तोच दिवस जश्न-ए-दिन. अशावेळी कुणाचा वाढदिवस असो वा एखाद्याचे लग्न, अख्खी किंवा किमान अर्धी बाटली मित्रांच्या आग्रहाखातर संपवली तर त्यात वावगे ते काय? नाहीतर मित्राला काय बरे वाटेल? पहा, यातून आपल्यापेक्षा दुसऱ्यांचा विचार प्राधान्याने करण्याचे कौशल्य विकसित करण्यास सांगितले गेले आहे. कधी माणूस आनंदी मूडमध्ये असतो तर कधी एखाद्या काळजीने त्याचे मन पोखरले जात असते, अशावेळी आधार देते ती मदिराच. अशावेळी तू रोज रोज मुद्दाम अशी कारणे देऊन लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न करतोस असा आरोपही होऊ शकतो, पण त्यांना ठणकावून सांगावे की उद्यापासून पार्टी वगैरे काही नाहीये, ही आज पितोय हीच काय ती शेवटची. शिवाय असे प्रत्येक बाटली रिचवताना म्हणावे हीदेखील किती अभिनव कल्पना.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या चित्रपटात जॉनी नावाचे कोणते पात्रच नाही, वा वा वा, कळस रे बाबा कळस. थोडक्यात पिऊन इतके टुन्न व्हावे की स्वत:चे नाव गावही विसरून जावे. प्राचीन काळापासून संत महात्म्यांनीही हाच उपदेश केला नाही काय की नाव गाव जात धर्म प्रांत भाषा विसरून एक यावे, माणूस हा एकच आहे. माणुसकी हाच धर्म इत्यादी इत्यादी. समानतेचा हा संदेश कवी किती अलगदपणे देऊन जातो त्याला तर या त्रिखंडात काही तोडच नाही. आजकाल गावांची, विद्यापीठांची, रस्त्यांची, चौकांची नावे बदलण्याचा अट्टहास धरणारे यातून काही बोध घेतील काय?

तर असे हे एक दर्जात्मकदृष्ट्या खूपच वरच्या पातळीवर असलेले  गीत आज आपण अभ्यासले.. लवकरच असेच आणखी एखादे गीत आपण पाहू. तोपर्यंत नो नो नो...

Friday, 26 August 2016

(प)रागदारी 3

आता माझी सटकली 

राग: कायच्या काय राग

आपल्या भोवताली बऱ्याच गोष्टी घडत असतात, त्यातल्या अनेक आपल्या मनाविरुद्ध किंवा न पटणाऱ्या असतात. आपल्याला त्यांचा राग किंवा फारतर म्हणू, सात्त्विक संताप येत असतो, मनस्वी चीड येत असते. हे सर्व आत्ता आठवण्याचे कारण म्हणजे आज आपण ज्या रागातील गाणे पाहणार आहोत त्याच्या नावातच राग आहे. होय, त्याचे नाव 'कायच्या काय राग' असे आहे. आज आपण पाहूया 'सिंघम रिटर्न्स'  या सिनेमातील 'आता माझी सटकली' हे गाणे. आता माझी सटकली हा खरंतर पहिल्यांदा आलेल्या सिंघम या सिनेमातला एक फेमस डायलॉग आहे, त्यापासून प्रेरणा घेऊन त्याचेच या सर्जनशील मंडळीनी सिक्वेल सिनेमासाठी गाणे तयार केले.

हे गीत म्हणजे एक प्रकारे सबकुछ हनी सिंग, सॉरी यो यो हनी सिंग आहे. (हे यो यो महत्त्वाचे बाबा.) कारण या गीताचे शब्द, आवाज आणि संगीत अशा सर्वच गोष्टींचे उगमस्थान त्यांच्याच ठायी आहे. गाताना त्यांना साथ दिली आहे ममता शर्मा आणि नीतू चौधरी यांनी. तर त्यातील मराठी भाग लिहिला आहे सचिन पाठक यांनी. सिंघम ही व्यक्तिरेखा मराठी असल्याने मराठी येणे अपरिहार्यच नाही का? अरे कोण म्हणतो मराठी भाषा मागे पडतेय? या चराचर सृष्टीत कोणत्याही मानवास संघर्ष चुकलेला नाही, तो तर अटळच आहे. तो करण्यासाठी त्याच्या अंगी इनफ बळ यावे यासाठी या गाण्याची सुरुवातच प्रेरणा देते. कशी ते पहा --

फाईट फाईट फाईट लाइक ब्रूस ली
मेरा सोला का डोला, छियालीस की छाती
सीधी बात बोलू, बाते घुमानी नही आती
आता माझी सटकली

आधी फाईट फाईट फाईट लाइक ब्रूस ली असे सतत म्हणून संघर्षासाठी नेहमी तयार राहा असे म्हटल आहे. समस्या कधीही उभी ठाकू शकते, तिचा सामना करण्यासाठी कधी शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ या उक्तीनुसार डोके वापरावे लागते, तर कधी मसल पॉवरची गरज असते. अशावेळी ब्रूस लीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून बेडरपणे संकटाशी दोन हात करा, असा प्रोत्साहनपर संदेश सुरुवातीलाच देण्यात आला आहे. बुद्धिबळाची नुसती आवड असून उपयोग नाही. वेळप्रसंगी बुद्धी आणि बळ वापरताही आले पाहिजे. समयसूचकता नि प्रसंगावधान महत्त्वाचे. 

यानंतर सिंघम कसा बलवान आहे हे सांगणे ओघाने आलेच. म्हणून सिंघम भाऊ आवेशाने म्हणतात  की माझ्या दंडातल्या बेटकुळ्या पहिल्यात का राव, अरे एकेक बेटकुळी सोळाची आहे, आणि माझी छाती तर ४६ इंच फुलते. फुलते रे छाती माझी फुलते रे असे म्हणत ह्याचे क्षण फुलत असतील का? पोलीस भरती असते तेव्हा बाहेर केळीवाले हमखास दिसतात अन त्यांचा बिझनेसही तुफ्फान होतो त्या दिवशी. छाती इन्स्टन्टली फुलवण्यासाठी ती केळी देवासारखी धावून येतात ना म्हणून. परंतु या ताकदवान सिंघमला मात्र त्यांही गरज नाही, त्याची इनबिल्ट छातीच भव्यदिव्य अवाढव्य अजस्र वगैरे आहे. ‘मी उगाच गोल गोल भूलभुलैय्या टाइप बोलत नाही, नव्हे ते मला जमतच नाही आणि त्याचा मला सार्थ अभिमानही आहे. मनात जे काय असेल ते थेट स्पष्ट बोलतो - तोंडावर. उगाच ओठात एक पोटात एक असली कपटी स्कीम नाही आपल्याकडे. पण माझी एकदा सटकली की कुणाचे काही खरे नाही’, असेही तो पुढे स्पष्टपणे स्पष्ट करतो.

जिगरा है टायगर, दिमाग से हायपर
आता माझी सटकली
तो गोली मारे जैसे स्नायपर  
आता माझी सटकली

सदर सिंघमला वाघासारखे मजबूत काळीज लाभले आहे. पण तो डोक्याने मात्र भडक आहे. त्याला राग आला तर तो स्नायपर शॉटप्रमाणे अचूक नेम धरून एखाद्याला गोळी मारू शकतो. चित्रपटात तो डॉक्टर नसून पोलिस अधिकारी दाखवला असल्याने ही गोळी म्हणजे बंदूकवाली गोळी असावी, औषधवाली खचितच नव्हे. 

गोली मारे जैसे स्नायपर... येस
मेरा बलमा है टायगर... ट्रू
अरे व्हेरी व्हेरी हायपर
आता माझी सटकली
मला राग येतोय
 
चित्रपटात पोलिस आणि त्याचा संघर्ष दाखवला असला तरी हिंदी सिनेमाच्या परंपरेला अनुसरून नायकाला नायिका ही हवीच. तर त्याच्या नायिकेला त्याच्या ह्या गोष्टीचेही कोण कौतुक. तू वेगवान आणि अचूक लक्ष्यभेद करू शकतोस, सही. भारीच रे. कसला सॉलिड आहेस तू भावा, आपलं राया किंवा यारा. मग खुश होऊन ती म्हणते, माझा सजणा कुणी लेचापेचा नाही तर साक्षात वाघ आहे वाघ. तोही सकारात्मक दृष्टीकोन असणारा आणि नेहमी आशावादी विचार करणारा असल्याने ह्यास होकार देतो. (चांगला जतन केला पाहिजे मग त्याला, आधीच कमी होत चाललेत वाघ देशातले..) पण तो गरम खोपडीचा आहे हे मात्र तिलाही मान्य आहे आणि त्यास तिची काही हरकतही  नाही. उलट त्याचेही कौतुकच वाटते तिला. (न वाटून सांगते कुणाला, गाण्यात राहायचंय ना.) 

या गीताचे पिक्चरायझेशन तुम्ही पाहिलेय का? नाही.. अरे मग काय पाहिले आयुष्यात? जरूर पहा, अन्यथा एका मोठ्या आनंदाला मुकाल. ते तर इतके बहारदार आहे की त्यात नायक नायिका अन इतर नृत्य कलाकारांसोबतच एक लहान मुलगा आहे. किंबहुना अशी बरीच लहान मुले आहेत - तीही पोलीस वेषातली. त्यातील एकजण विशेष लक्ष वेधून घेतो जो सारखा 'मला राग येतोय' असे बेंबीच्या देठापासून ओरडत असतो. आयुष्यात जरा कुठे वेळ मिळाला की सिंघमची सतत सटकत असणे आणि या मुलाला राग येत असणे यातून हा चिमुरडाच ज्युनियर सिंघम असल्याचे दिग्दर्शकाला सूचित करावयाचे असेल काय? सिंघमसारखाच बनियन तोही घालतो (अर्थात लहान मापाचा, उगाच त्यात मापं नका काढू आता त्याची). पण  खरंच, कोण जाणे ‘सिंघम अकराव्यांदा रिटर्न्स’ या सिनेमात हा मुलगाच हिरो अर्थात दस्तुरखुद्द सिंघम असेल. या सिनेमावाल्यांचे डोके आणि त्यात अनलिमिटेड प्रमाणात भरलेल्या क्रिएटिव्हिटीला मर्यादा नसतातच!      




माझा मर्दानी राया रे
याची वाघाची काया रे
भीत नाही कोणाला रे
अस्सा मराठी छावा रे
आता माझी सटकली 

ती नायिका तर बघा की खम्प्लीट येडीपिशीच झाली आहे त्याच्यासाठी, नाहीतर काय फुल हरकलीच हाये बाई जणू. म्हणते कशी की माझा राया अस्सल मर्द आहे. त्याच्या मर्दानगीचा नाद नाय करायचा. थोडक्यात तो चहाला कधी नाही म्हणत नाही असे गीतकाराला यातून सुचवायचे असेल. कारण सुवासिनींनी कुकवाला अन मर्दानी च्याला नगं म्हणू नये असे मगदूम चहावाल्यांनी पूर्वीच जगाला (दररोज रेडीओवरून सकाळी ९ वाजता) सांगून ठेवले आहे. ती पुढे म्हणते, माझा निडर सिंघम कुणालाही भीत नाही आणि त्याची काया अगदी वाघासारखी आहे. (जपून ठेव बाई मग, वाघाच्या कातडीला इंटरनेशनल मार्केटात खूप मोठी किंमत मिळते, तेव्हा तुझ्या या सिंघमची आणि त्याच्या त्वचेचीही विशेष काळजी घे.) 

अंग्री यंग मॅन
मी आहे माझ्याशी लफडा...नाय नाय
तोडून टाकेन हातपाय
व्हेन आता माझी सटकली
बोलो मुझे बाय बाय

स्वत:चे पुरेसे कौतुक (?) नायिकेकडून झाल्यानंतर यापुढे सिंघम स्वत:बद्दल थोडी माहिती स्वत:हून देऊ लागतो. तो  आगरी यंग man आहे.. आपलं अंग्री यंग man आहे. असा तामसी स्वभावाचा (नॉनव्हेज खात असेल फार, दुसरं काय) म्यान कधीच आपली शस्त्रे म्यान करत नाही, उलट संकट आले रे आले की तोच त्याच्यावर धावून जातो आणि त्याची वाट लावतो. म्हणून मी असा रागीट मनुष्य असल्याने  माझ्याशी पंगा घेऊ नका असे तो इतरांच्याच भल्यासाठी सुचवतो. ‘गप सरळ वागायचं आपल्याशी, नाहीतर डोक्यात टण्णुच बग’, अशी साधारणपणे प्रेमळ धमकीच तो देतो असे म्हणायला हरकत नाही.  माझं एकदा का टाळकं फिरलं की कोण आडवा येईल त्याचे हात पायच तोडून टाकेन असेही तो पुढे म्हणतो. शब्दाने शब्द वाढतो म्हणून शक्यतो मारामारी करुनच प्रकरण मिटवावे या वृत्तीचा तो असावा. स्वत:ला माझ्यापासून वाचवायचं असेल तर चालते व्हा आणि माझा निरोप घेत मला बाय म्हणा असे तो इतरांच्याच सेफ्टीसाठी सुचवतो. वा वा, दुसऱ्यांच्या सुरक्षिततेची काळजी असावी ती अशी.  त्याच्या इंटर्नल सिस्टीमच्या बेसिकमध्येच जहाल विचारसरणी कुठून कुठून गोळा करून कुटून कुटून भरलेली असल्याने हे सर्व त्याच्या स्वभावाला अगदी धरूनच आणि साजेसेच, किंबहुना त्याची शोभा आणखी वाढवणारे नव्हे काय?

आता माझी सटकली
मला राग येतोय

यानंतर आता माझी सटकली, मला राग येतोय हे सिंघम आणि तो (अजिबातच डोक्यात न जाणारा) लहान मुलगा मग (कंटाळा येऊपर्यंत) वारंवार म्हणत राहतात. कुणाचा जप आधी होतो अशी स्पर्धाच लागली असावी दोघांच्यात असे वाटते. शेवटी शेवटी मला राग येतोय असं अखंड म्हणताना शीण येऊन, मानसिक थकवा येऊन तो मुलगाच जरा लो महसूस करत असावा, सतत तेच तेच म्हणून त्याची एनर्जी कमी होत गेली असावी आणि म्हणून (पहा 'म्हणून' शब्दावर कसा नकळत श्लेष अलंकार साधला गेला ते..) त्याचा आवाज क्षीण होत जातो, संथ होत जातो.. पण विरत मात्र नाही. असा हा लढवय्या ज्युनियर सिंघम नुसत्या एका गाण्यातून तयार करण्याचे श्रेयदेखील सिंघमरावांनाच दिले पाहिजे. नाही का?

पुन्हा अभ्यासू असेच एखादे गीत. तोपर्यंत शांत स्वभाव, समजूतदारपणा, संयम, सदसद्विवेकबुद्धी वगैरे फडतूस निरुपयोगी दुर्गुण तुमच्या अंगी असतीलच तर त्यांचा रागाने त्याग करा. आय टेल यू, त्याग करायला खूप धैर्य लागते. द्या त्यांना सोडचिठ्ठी. हे दुर्गुण ठायी बाळगल्याने तुम्ही जणू जगण्यासच नालायक ठरता गड्या हो. सिंघमभाऊंचा (आणि त्या पोराचाही) आदर्श डोळ्यांसमोर ठेवा आणि त्यांना म्हणा - 'आता माझी सटकली, मला राग येतोय...'

Thursday, 25 August 2016

(प)रागदारी 2 

चार बाटल्या व्होडका

(राग: मद्यच माझे गद्य नि पद्य)

आज (प)रागदारी या सदरात आपण अभ्यासणार आहोत एक अतिशय गाजलेले गाणे तेही एका अशा महाशयांचे जे  आजकाल खूपच लोकप्रियआहेत, प्रसिद्धीच्या लाटेवर असे काही स्वार झाले आहेत की बड्या बड्या कलाकारांना, निर्मात्या दिग्दर्शकांनाही ह्यांचे एकतरी गीत आपल्या चित्रपटात असावेच असे मनापासूनवाटते. भले चित्रपटास काही कथा असो नसो (तिच्याशी कोणत्या गाढवास देणे घेणे असते नाहीतरी), पणह्यांचे एक गाणे असलेच पाहिजे अशा धारणेतून ह्यांना कामहीबरेच मिळते आहे.

मध्यंतरी व्हॉटसअपवर यांच्या थोरल्या भावाचे नाव काय तर ज्येष्ठमध असा एक विनोदही वेगाने फिरत होता. तुमच्यासारख्या चाणाक्ष सुज्ञ सुजाण संगीतप्रेमी रसिकांना एव्हाना समजलेचअसेल की आम्ही कोणाबाबत बोलत आहोत ते... होय होय होय, कलियुगीन संगीतातील एक अद्भुत चमत्कार, एक अलौकिक प्रतिभा,आजच्या तरुण पिढीचे श्रद्धास्थान आणि प्रखर प्रेरणा, असंख्य डिस्कोथेक, क्लब्ज, पब्ज आणि बार संचालकांचे पोशिंदे,वन अंड ओन्ली स्वयंभू rapmaster, अर्थात यो यो हनी सिंग. (काही गुरूंच्या नावाआधी जसे श्री श्री असते, तसे हे यो यो असावे असा आमचा कयास आहे.) आणि त्यांचा आवाज व संगीत लाभून पावन झालेले हे गाणे आहे रागिणी एमएमएस द्वितीय या चित्रपटातले. गाण्यातील गद्य व पद्य दोन्हीही मद्यावर आधारित असल्याने 'मद्यच माझे गद्य नि पद्य' या रागात गुंफलेल्या या 'चार बोतल व्होडका' गाण्याचे शब्द लिहिले आहेत उस्ताद भगदार अली खान साहब यांनी.    



चार बोतल व्होडका
काम मेरा रोज का
ना मुझको कोई रोके
ना किसीने रोका

वा वा वा, हनीजी आपल्या नावाप्रमाणेच मधाळ असलेल्या आवाजात गातात की चार बाटल्या व्होडका प्राशन करणे हेच माझे रोजचे काम,  हेच माझे जीवितकार्य आणि हे साध्य रोजच्या रोज साध्य करण्यापासून मला कुणीही रोखू शकत नाही. नव्हे, हे पवित्र कार्य उम्रभर करण्यासाठी मी स्वत:ला वाहून घेतलेले असताना आजवरच्या वाटचालीत मला कोणी रोखलेलेही नाही. कुणाची एवढी बिशाद?


मैं रहुं सारी रात इन द बार
दारू पिऊ लगातार
एक आधी सब पी लेते है
मैं तो पिऊ बोतल चार
आय वाना हंगओव्हर टूनाईट

यापुढे हनीसिंग यांच्यामधील विलक्षण सर्जनशील असा अफलातून rapmaster जागृत होतो आणि आवेशाने पण तितक्याच संयतपणे गाऊ लागतो की अरे मी अख्खी रात्र बारमध्ये राहीन आणि एकापाठोपाठ एक मद्याचे प्याले रिचवेन. अर्धी किंवा एखादी बाटली तर कुणीही पीत असेल, परंतु मी मात्र एक नव्हे, दोन नव्हे तर पूर्ण चार बाटल्या सहज संपवतो. कारण मला रात्री असाच कैफ हवा आहे.

समजा पिणारा स्वत: रोज डायरी लिहित असेल तर रोज काही वेगळे लिहावे लागणार नाही. एक जानेवारीला जे लिहिले तेच पुढे वर्षभर होणार असल्याने पुढील सर्व पानांवर केवळ सेम एज एक जानेवारी असे लिहिले तरी काम भागू शकते. किवा पहिल्याच पानावर 'हेच नि असेच पुढे' असे नमूद करून पुढील सर्व पाने एखाद्या गरजू गरीब विद्यार्थ्याला अभ्यासासाठी देताही येतील असा विचारही यामागे असू शकतो. सहीच ना! आम्हाला तर वाटते की स्वत:च्या प्रकृतीची, लिव्हरची तिळमात्र काळजी न बाळगता रोज चार बाटल्या घशात घालण्याचे जीवनविषयक तत्त्वदेखील याच वैचारिक मंथनातून आले असावे. जेणेकरून भंगारवाल्याला दर महिन्याला तब्बल १२० बाटल्या देऊन त्याला बरे आर्थिक दिवस तरी आणता येतील. तुम्हीच सांगा आजकाल कोण करतो दुसऱ्याचा इतका विचार?  

सारी रात दारू, सुबह निंबूपानी
पार्टी करनेवालो की है याही कहानी
पेट भरके जितनी भी पीलो
किसी की बंदी को भी हेल्लो
हेल्लो बेबी हाऊ डू यु डू?
एक मिनट तो खद जा तू
पता नि मुझे ये समझ नि आता
मेरे साथ कभी कोई क्लब नही आता
अपने पल्ले से कोई नि पिलाता
मैं पी लू ज्यादा फिर कोई मुंह नही लगाता  
क्यू की, क्यू की, क्यू की, क्यू की   

नंतर ह्या संगीतरत्नाने एक वैश्विक सत्य अगदीच अलगदपणे आणि सहजतेने कथन केले आहे. तो म्हणतो की रात्रभर मनसोक्त मनमुराद मद्यपान केल्यानंतर दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे (दुपारी १२ च्या सुमारास) उठून निर्मळ मनाने लिंबूपाणी घेणे हीच पार्टी करणाऱ्यांची आज कहाणी आहे. हीच त्यांची कथा आणि व्यथा बनली आहे. पोटभर प्या, कितीही प्या आणि मग कुणाच्याही प्रेयसीला वा पत्नीला मनोभावे नमस्कार करा, आपणच तिचा प्रियकर वा नवरा आहोत असे समजून त्याच्याच प्रेमाने आणि नशेतून आपसूक निर्माण होणाऱ्या जवळीकीतून हाय हेलो म्हणा. आपण कशा आहात अशी आपुलकीने चौकशी करा. आपल्यासोबत क्लबसारख्या मानवनिर्मित शांत, प्रसन्न, रम्य ठिकाणी कधीच कुणी येत का नाही या विचाराने आपण कधी त्रस्त होऊ शकतो. त्यामागील कारणे कितीही विश्लेषण करून कधीकधी आपल्या लक्षा येत नाहीत. पण मग अशा लादल्या गेलेल्या सक्तीच्या एकटेपणातून उद्भवणारे दु:ख विसरण्यासाठीही जर कुणी आपल्या पैशाने पाजत नसेल, तर आपणच आपली आपली प्यावी, मग कुणाची बिशाद आपल्या नादी लागण्याची किंवा त्या बाटलीला तोंड लावण्याची. दुसरे समजून घेत नसताना किंवा मदत करत नसताना स्वत:ची वाट स्वत: चोखाळावी, आपला स्वाभिमान मजबूत ठेवावा, आत्मसन्मानाशी हरगीज तडजोड करू नये अशी महान शिकवण कविवर्य यातून आपणांस ऑफर करतात. आणि ह्याचेही कारण म्हणजे रोजच्या चार बाटल्या व्होडका हेच होय असेही पुढे आत्मविश्वासाने नमूद करून ठेवतात.       

सूजी सूजी आंखे मेरी ये फिर भी देखो
लडकियो को कैसे ये निहारे निहारे
अगले दिन उठू मैं हंगओव्हर में फिर भी देखो
लिव्हर मेरा व्होडका पुकारे
क्यूंकी चार बोतल व्होडका...  

कोणत्याही परिस्थितीत आपल्या ध्येयापासून आपली (तारवटलेली लालसर) नजर हटता कामा नये असे गीतात पुढे म्हटले आहे. म्हणजेच काय तर अति मद्य प्राशन झाल्याने डोळे जरी सुजले, लाल झाले, डोळ्यांची कितीही आग आग होत असली तरीही मुलींवर लाइन मारण्याच्या लाइफ़टाइम कर्तव्यातून तिने माघार घेता कामा नये. सौदर्याची उपासना करावीच, ती केलीच पाहिजे म्हणजे पाहिजेच कारण ते ताज्या तरुण टवटवीत प्रफुल्लीत सदाबहार वगैरे वगैरे मनाचे लक्षण आहे.  यातून कवी आपल्या मनावर प्रकृतीपेक्षा वा होऊ शकणाऱ्या संभाव्य धुलाईपेक्षाही कर्तव्यभावना आणि स्वत:ला घालून घेतलेले नियम नि शिस्त यांना वरचे स्थान देतो आणि या गुणांपासून ढळू नये असे सुचवतो. इतके सुरापान केल्यावर दिसणारी प्रत्येक मुलगी नखशिखान्त न्याहाळली नाही तर हाय कम्बख्त, तुझे कुछ चढीच नाही की मर्दा, असा गर्भितार्थसुद्धा यात असू शकतो.

इतकेच नव्हे तर दुसऱ्या दिवशी उठल्यावर (अर्थात १२ वाजता, त्या बेअक्कल सूर्याला कधी उगवावे हे समजत नसेल तर त्याला आपण काय करणार, लेकाचा सहासात तास आधीच येऊन बसतो. तोंडावर आला उजेड, कर दुर्लक्ष) आधीच्या रात्रीचा कैफ तसाच असल्यामुळे आणि हंगओव्हर कायम असल्याने यकृतोबा व्होडका व्होडका असे आर्तपणे पुकारत असतो, तेव्हा त्याकडे मात्र दुर्लक्ष करू नये आणि पुन्हा त्याला खतपाणी घालावे. असे केल्यानेच 'काम मेरा रोज का' ह्या उक्तीचा खरा अर्थ आपल्याला उमगू शकेल अशी शिकवण कवीने दिली आहे. थोडक्यात पिण्यातले समर्थ हनीमहाराज काय म्हणतात - प्यायल्याने होत आहे रे, आधी प्यायलेचि पाहिजे, पाहिजे म्हणजे पाहिजेच, तेही व्होडका पेयाच्या चार बाटल्या.  शेवटी तो पुन्हा पुन्हा चार बाटल्या व्होडका अशा किंकाळ्या मारतो.

त्याने फोडलेला हा हंबरडा पाहून कुणाचेही हृदय आणि यकृतोबा पिळवटून निघेलच.  तसे एखाद्याच्या बाबतीत न झाल्यास त्या पामराला 'हाय तूने पीही नही तो क्या समझोगे' असे म्हणून त्याला कस्पटासमान लेखावे, पूर्णत: दुर्लक्ष करावे. पण व्होडकादेवतेचा अपमान सहन करू नये हीच भावना हा कस्पटासमान गायक, (ओह सॉरी सॉरी, हे काय बरे अनवधानाने लिहिले गेले मजकडून.. हन्त हन्त) तर हा असामान्य गायक आपल्या हृदयस्पर्शी आवाजातून व्यक्त करतो  हे स्पष्ट जाणवते. 

किती उदात्त विचार! मराठीत हे महाशय गाणी कंपोझ करत नाहीत. अरेरे, मराठी भाषेचे आणि रसिकांचे हे केवढे नुकसान. तरी समजा, पुढेमागे जर या गानपानसम्राटास मराठीत rap करायचे झालेच तर ते करताना त्यांनी आमच्या या पुढील रचनेचा जरूर विचार करावा. कदाचित त्यांच्याइतके भारी दर्जेदार जमले नसेल, पण न पिताही तोडकेमोडके सुचले हे काय कमी आहे...

प्या बिंदास अन व्हा मदहोश
व्हा बेहोष नि करा जल्लोष,
भीती नाही कुणाच्या बापाची
आम्ही पितो आमच्या पैशाची,
फिरूदे बार आणि तोलही जाऊदे
अवघा रंग एकचि होऊदे,
स्कॉच असो व्हिस्की, रम असो शाम्पन
मित्रांनो माझ्या तुमच्यासाठी कायपण, 
ढोसा खुश्शाल रे सोडा लाज
सगळ्या रोगांवर रामबाण इलाज,
रिचवा दारू उधळूदे वारू
अरे विसरा पारू, या एकेक पेग मारू,
कारण चार बाटल्या व्होडका हेचि काम माझं रोजचं..
.
छे, नाही हो, नाहीच. ती नशिली मजा आणि तो यथेच्छ माज यात दुरान्वयेही  नाही. खूपच थिटे पडतो आपण ह्यांच्या काव्यप्रतिभेसमोर हे मोठ्या मनाने (म्हणजे थर्टी नव्हे, तर नाइनटीच्या मापाने) मान्य केलेच पाहिजे. 'कुछ जम्या नही गड्या' हा तुमचा प्रांजळ नि रोखठोक अभिप्रायही पोचला आणि तुम्ही मुरडलेली नाकेही दिसली. असो, रोज साबण घासघासून अंघोळ केली म्हणून कावळा राजहंस थोडाच होतो. असो, तर हे होते आजचे अप्रतिम एकमेवाद्वितीय गीत. पुन्हा पाहू असेच आणखी एखादे  गीत. तोपर्यंत ‘चार बाटल्या व्होडका, हेचि काम माझं रोजचं...’

ता. क.:  मध्यंतरी टीव्हीवरील चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात ख्यातनाम शास्त्रीय गायक राहुल देशपांडे आले होते. तेव्हा त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता की सध्याच्या या हनी सिंग इरा आणि या अशा चार बोतल गाण्यांविषयी तुमचे मत काय, तर ते प्रांजळपणे वदले की ‘काय वाटायचं त्यात, असेल ते त्याचे रोजचे काम’... वा वा, पहा सिंगसाब द ग्रेट यांची दिनचर्या किती लोकप्रिय आहे. अक्चुअली याचा (त्यांच्या गाण्यांचा सिनेमाच्या कथेशी चुकूनही नसतो तसाच) इथे काहीही संबंध नाही, पण सहज आठवले म्हणून सांगितले.

अर्थात समजा अशी चार बोतल गाणी चार दिवस टिकणारीच असतात असे जर कुणी म्हणाले तर मात्र तो कितीही खरे बोलत असला तरी आजची तरुणाई त्याचे ऐकून घेणार नाही हे मात्र त्याहून खरे.

(प)रागदारी 1

बेशरमी की हाईट

(राग: स्वैराचार हाच शिष्टाचार)

नमस्कार, हिंदी चित्रपटसृष्टीची आजवरची वाटचाल जर नीट अभ्यासली तर असे दिसून येते की इंडस्ट्रीच्या यशाचा मोठा भाग चित्रपटांमधील गाण्यांनीही व्यापला आहे. सिनेमाच्या प्रमोशनमध्ये म्युझिक लॉन्चला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे ते यामुळेच. '(प)रागदारी’ या सदर सदरातून निरनिराळ्या अनोख्या रागांमधील गाणी नव्याने समजून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. याद्वारे आजच्या काळातील नवनवीन प्रचंड दर्जेदार, कायच्या काय असामान्य आणि अतिक्रिएटिव्ह अशा गीतांचे आपण रसग्रहण करणार आहोत. आम्हाला खात्री आहे की या गाण्यांमधून तुम्हालाही या शब्दांची न कळलेली ‘दुसरी बाजू’, किंबहुना न कळलेली महतीच आम्ही समजावून देऊ शकू. संगीत क्षेत्रात कार्यरत असणारे आजचेही कलावंत किती प्रतिभावान आहेत याचाही तुम्हास भस्सकन प्रत्यय येईल.

आज आपण आजूबाजूस पाहतो की जग किती झपाट्याने बदलत चालले आहे. मग सध्या 'आमच्या काळी असं नव्हतं हो' हा डायलॉग अधिकाधिक वेळा, ठिकाणी, प्रसंगी आणि वेगवेगळ्या वयोगटातील व्यक्तींकडून ऐकू येत असल्यास त्यात नवल ते काय! आजकालच्या तरुण पिढीचेच घ्या ना - या पिढीवर घरातून नव्हे तर बाहेरून संस्कार होतात. प्रसारमाध्यमे, भोवतालचे जग, प्रगत तंत्रज्ञान यांनी केलेले संस्कार आणि त्यातून शिकायला मिळणाऱ्या कलाच ते पटकन अवगत करतात. म्हणजे काय हेच आज आपण थोडक्यात सविस्तरली पाहणार आहोत. 

तर आज आपण रसग्रहणासाठी निवडलेले पहिले गाणे आहे - 'मैं तेरा हिरो' या सिनेमातील आणि 'स्वैराचार हाच शिष्टाचार' या रागातील 'बेशरमी की हाईट'. साजिद वाजिद यांनी संगीतबद्ध केलेले हे गीत गायलेआहे बेन्नी दयाल आणि शाल्मली खोलगडे यांनी. तर लिहिले आहे कुमार यांनी.



इमानदारी की बीमारी
छोड दे आजा, दौड के आजा
ओ करे दिल तुझको इन्व्हाईट
हो सारी नाईट बेशरमीकी हाईट

वा वा वा, कविवर्य म्हणतात की इमानदारी की बीमारीम्हणजेच प्रामाणिकपणा हा एक प्रकारचा आजारचआहे. खरेच आहे की, पटत नसेल तर प्रेमात पडूनआणि घरी खरे बोलून प्रेयसी वा प्रियकराला भेटायलाबाहेर जाऊ पाहणाऱ्यांना विचारा. म्हणूनच या काव्यात असा सल्ला देण्यात आला आहे की प्रियकराला भेटायला जाताना प्रेयसीने हे उगाच असले ओनेस्टीचे चोचले पुरवू नयेत. हे असले नसते भलतेसलते संस्कार आणि मूल्ये फॉलो करत बसली वेडी, तर भेट नाही झाली की किती सलते ते कळेल मग तिला. खरेच हेभलते अवघड असते.

उलट या जालीम बेरहम दुनियेची जराही चिंता न करताधावत धावत अपुल्या साजणाला (कितवा ते डझन्टम्याटर, पण शक्यतो पहिलाच) भेटायला जावे. कारण साजणाचे दिल साजणीला आर्त साद घालते आहे. तरतिनेही त्यास अनिवार्य प्रतिसाद देऊन पुढचा मागचा विचार न करता त्याच्या अनिवार ओढीने त्याचे दर्शनघेण्यास जावे. शक्यतो रात्री जावे, त्यातच जीवनातीलखरे थ्रिल सामावले आहे. आणि मग काय सारी रात्रभर मनसोक्त धिंगाणा घालावा. कोण माई का लाल त्याविषयी अधिक काही माहितीच्या अधिकाराखाली विचारणार आहे नाहीतरी? म्हणून आला क्षण एन्जॉय करावा आणि लाजलज्जा वगैरे अश्मयुगीन काळातील आउटडेटेड स्वभाव अलंकार सोडून प्रियकरासोबत रममाण व्हावे, अद्वैत साधावे. जगापासून लपूनछपून असे तादात्म्य पावण्यातील आनंद काही वेगळाच. तो या नश्वर भूतलावर सर्वांनाच घेता येत नाही.

मग पुढे जे होईल त्यास निसर्ग जबाबदार. बेशरम व्हा,निर्लज्ज व्हा आणि जीवनाचा पुरेपूर आनंद लुटा. हेआयुष्य तुमचे आहे, यावर फक्त तुमचा हक्क आहे, त्यातकाय घडावे काय नाही हे ठरवण्याचा अधिकार फक्ततुमचा आहे, कुणाला कधी कुठे भेटावे हेही तुम्हीचठरवले पाहिजे, कुणाचाही मुलाहिजा बाळगू नका, अरे कोण आई कोण बाप, होत असतील डोक्याला ताप तरव्हा बेशरम निघा सुसाट, व्हा सैराट असा खोल संदेश देणारे हे गीत अप्रतिमच. आईवडिलांनी मुलांवर केलेले व्यर्थ संस्कार मुळातच भंगार असतात, तसल्या घाणेरड्या जोखडातअडकू नये. नम्र, आज्ञाधारक असणे ही शरमेची बाबआहे. निर्लज्जम सदा सुखी ही उक्ती लोकांना केवळ माहीत असते पण तीवर दे दणादण अंमलदेखील करावा असे यातून सुचविण्यात आले आहे.       

इक तू.. इक मैं.. और हो डीम डीम ये लाईट
हो सारी नाईट बेशरमीकी हाईट

लाईट्स डीम डीम होऊदेत म्हणजेच मंद व्हावेत अशी अपेक्षाही पुढे व्यक्त करण्यात आली आहे. काळबदलला तरी प्रेम चिरंतन असते, आधुनिक काळातही ते फक्त माध्यम बदलते, भावना नाही हे यातून कवीला सुचवायचे आहे. नाहीतर तुम्हीच सांगा - "सखी मंदझाल्या तारका, आता तरी येशील का"  आणि "दौड केआजा, हो डीम डीम ये लाईट" यात तत्त्वत: काय फरक आहे? काळाबरोबर पावले टाकत अभिव्यक्तीचे माध्यम भले बदलले असेल जरूर, तरी त्यामागील प्रेमाचीभावना तर तीच आहे ना, हे महत्त्वाचे. आशय शेम टूशेमच ना! करेक्ट, ही शेम अर्थात लाज तेवढी सोडली पाहिजे, बाकी काही नाही. त्याशिवाय बेशरमी की हाईट प्रत्यक्षात कशी बरे येणार, सुफळ संपूर्ण कशी बरेहोणार? आंग्लाळलेल्या तरुणाईस जोरदार प्रोत्साहन द्यायचे असल्याने कवीकडून शब्द हुशारीने गुंफण्यात आले आहेत (कर्मणि प्रयोग).

"लूक प्राणेश्वरी, तू तशीही दिवेलागणीची वेळ उलटून गेल्यावरच येणार आहेस, तर मग जाऊदेत ना सारे दिवे विझून. त्यांची कशाला अडचण. लोडशेडींगची इतकी भयानक समस्या आज सामान्य जनतेला भेडसावत असताना आपण आणखी दिवे जाळणे योग्य वाटत नाहीप्रिये. शेवटी काही झाले तरी आपण या समाजाचे काही देणे लागतो यार, होता होईल तितकी मदत केली पाहिजे मेरे प्यार", अशा उदात्त भावनेतून देण्यात आलेला संदेश केवळ विलक्षणच.    

अरे बिगडा हू मैं यू
थोडा तू भी बिगड जा
अरे आगे बढू मैं
थोडा तू भी आगे बढ जा

यापुढे नायक नायिकेस म्हणितो की ‘हे प्राणसखे, मी तरबिघडलोच आहे. माझ्यासोबत तूही बिघड’. माणसाची जडणघडण होणे किती महत्त्वाचे आहे हे यातून मनावर ठसवले गेले आहे. 'आम्ही घडलो एकदाचे, तुम्ही बीघडा' ह्या अर्थाने हे असावे. म्हणजेच तुम्हीसुद्धा घडा,स्वत:ला घडवा. तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार हाचअर्थ यातून निघत नाही काय? 'मी आवश्यक ते कष्ट घेतआहे, त्यासाठी इनफ पुढाकार घेत आहे, तर तूही चार पावले पुढे टाक आणि माझी साथ दे.' वा वा वा, ह्यालाम्हणावे आपल्यासोबत जोडीदाराच्याही प्रगतीचा, करियरचा विचार करणे, त्यालाही प्रोत्साहित करण्यातला आनंद मिळवावा तो असा.

आज नियत थोडी होने दे खराबसी
दिखने लगी है इन हवाओ मैं शराबसी

नायिकेच्या मते, हे उद्दिष्ट सत्कारणी लागण्यासाठी आज नियत थोडीफार खराब झाली तरी हरकत नाही, होऊदे खर्च लफडं आहे घरचं. शेवटी कामगिरी फत्ते होणे महत्त्वाचे. ही अवघी हवाच तिला आता जादुई भासू लागली आहे, मद्याचा अंमल जाणवू लागला आहे. या बेहोशीत आपणही सामील होऊ असे ती प्रियकरास विनवत आहे. .

सारी की सारी है जो खुमारी
आ दोनो पी ले लम्हे नशीले
करे हमको ये बडा एक्साईट
हो सारी नाईट बेशरमी की हाईट

हा माहोल सारखा सारखा मिळत नाही. ही नशा, ही मजा पुरेपूर अनुभवली पाहिजे. हे धुंद वातावरणआपणास आता आणखीनच बेधुंद करू लागले आहे. ही सारी रात्र  निर्लज्जपणा साजरी करण्यासाठी आपणचआपल्याला अलॉट केली आहे, तर तिचा पूर्ण आस्वाद घेऊ, सॉल्लीड सैराट होऊ नि फुल झिंगाट होउन धुडगुस घालू, हे म्हणणेही सिच्युएशनला धरून रास्तच.
दिल ये गायब होगया है अपनी जगह से
जो भी हुआ है वो हुआ है तेरी वजह से

हे हृदय आपल्या जागेवरून कुठेतरी गायब झाले आहे.आपली एखादी गोष्ट हरवली असेल, सापडत नसेल वा नजरचुकीने मिसप्लेस झाली असेल तर आपण किती भांबावून जातो. 'स्व'ची यथायोग्य जाणीव असल्यास स्वत:च्या हलगर्जीपणाला आणि दैववादी असल्यास नशिबाला दूषणे देऊ लागतो, पण येथे असे सुचविण्यात आले आहे की आपल्या हृदयाची केस मात्र जर वेगळीअसते. इतर गोष्टींच्या बाबतीत आपण हवालदिल होतो,पण हृदय अर्थात दिल या बाबतीत आपण संबंधितव्यक्तीला दोष देऊ शकतो. हृदय चोरीस जाणे ही एकमेव चोरी अशी आहे की ह्यात चोर महान वाटू लागतो, तो आपल्या आयुष्यात आला म्हणून आपणच स्वत:ला इन वन ऑर अनादर वे भाग्यवान समजू लागतो. तेव्हा त्या व्यक्तीचा अनादर न करताही तिला हे सांगण्याचे स्किल डेव्हलप केले पाहिजे. ते ऐकून तिलाही स्वत:बद्दल भारीवाटले पाहिजे राव.

लेनी है सांसे मुझे अब तेरे साथ में
कहीं भी लेजा हाथ लेके तेरे हाथ में

पुढे तर पहा, नायिकेचा उत्स्फूर्त प्रतिसाद स्पष्टपणेदिसून येतो. ती म्हणते मला माझे उरलेले श्वासदेखीलआता तुझ्यासोबतच घ्यावयाचे आहेत माझ्या राजा. ये,आणिक माझा हात हातात घेऊन मजला कुठेही घेऊनजा. इथे मात्र काही चळवळे लोक असा आरोप करूशकतात की ही तर शुद्ध छळवणूक झाली. या पुरुषप्रधान संस्कृतीत पुरुष जाईल त्यामागे स्त्रीनेदेखील गप मान खाली घालून जायचे हे कुठवर चालणार? आज एकविसाव्या शतकातही हेच होणार का राव? काय वाटेल तृप्ती देसाईला? पण नायक नायिका पुरोगामी असल्याने अशी शंका घेऊ नये.ते सज्ञान असून त्यांचा निर्णय ते घेऊ शकतातच की, किमान तेवढे स्वातंत्र्य तरी त्यांना द्या.

है जवानी, करे शैतानी
इस उमर में, दिल के सफर में
क्या राँग है, क्या है राईट

अरे तरुण वय आहे, थोडा चावटपणा, वात्रटपणाचालणारच. आत्ता नाही तर काय म्हातारपणी उटपटांग हरकती करणार? तेव्हा तर लोक अजून बोंबा मारतील - ' शी, काय हे, शोभतं का हे असलं या वयात. जनाची नाही मनाची तरी?' त्यापेक्षा आत्ताच जरा मजामस्ती केली तर काय बिघडलं. म्हातारपणी एन्जॉय करूच की काठी हातात, कवळी तोंडात आणि पोक थकल्या पाठीत, कळ गुडघ्यातल्या वाटीत. पण आत्ता काय? हाच तो क्षण हीच ती वेळ, करू एन्जॉय घालू धिंगाणा.  काय चूक काय बरोबर हा फडतूस विचार करण्याची ही वेळ नव्हेच मुळी.

संपूर्ण काव्य नीट पहा, इन्व्हाईट, एक्साईट, राईट, लाईट आणि हाईट - वाह, पहा यमकही काय अफलातून सहजगत्या जुळवले आहे. असे अजिबातच वाटत नाहीकी ते ओढून ताणून जुळवण्यात आले आहे. कवीची अलौकिक प्रतिभा!

असो, तर ह्या जवानीत आत्ता फक्त मजा मारू, उद्याकाय ते भोगू. हा जबर आत्मविश्वास, येणाऱ्यापरिस्थितीला सामोरे जायला एनीटाइम तयार असणेअशा गोष्टी शिकवणारे हे गीत अमूल्यच म्हटले पाहिजे.

तर हे होते आजचे क्वालिटी सॉंग. लवकरच असेच आणखी एखादे क्वालिटी सॉंग पाहू आणि जगण्याचा आनंद द्विगुणीत करू. तोपर्यंत गाठा उंची निर्लज्जतेची, त्यासाठी जी तोड मेहनत करा, झटका आळस गाठा कळस... अरे बघताय काय, सामील व्हा... होऊन जाऊदे बेशरमी की हाईट...

आपली परंपराच आहे ज्या खेळाडूंकडून मेडलची अपेक्षा असतेत्यांच्यापेक्षा दुसरेच कुणी ऑलिम्पिकला आपल्याला मेडल्स जिंकून देत आलेत९६ च्या अटलांटा ऑलिम्पिकला पेस नवखा होतातो ब्रॉन्झ जिंकून आलाआणि तेही एकेरीत२००० सिडनी - मल्लेश्वरी वेटलिफ्टिंगमध्ये ब्रॉन्झ मेडलच वजन पेलून आली (आणि दुर्दैवाने पुढच्या काळात आपला कुणी आदर्श ठेवू नये याचीही तजवीज तिने उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी सापडून करून ठेवली२००४ अथेन्समध्ये मिलिटरीमन आणि आत्ताचा खासदार राज्यवर्धनसिंग राठोडने सिल्व्हर जिंकलंतो डबल ट्रॅप हा नेमबाजीचा प्रकारच बघताना जाम आवडला होता.  २००८ बीजिंगला अभिनव बिंद्राने तर डायरेकट गोल्ड मेडलच जिंकलं२०१२ लंडनला विजयकुमारगगन नारंग हे पुन्हा शूटिंगमध्ये चमकले तर सुशीलकुमारयोगेश्वर दत्त कुस्तीत जिंकलेसायना आणि मेरी कोमनेही मेडल जिंकून भारताला एकूण सहा मेडल्स मिळवून देत षटकार मारला. यावेळीही हीच परंपरा राखत ज्या फारशा लाईमलाईट मध्ये नव्हत्या, त्या सिंधू सिल्व्हर मेडल आणि साक्षी मलिक ब्रॉन्झ मेडल जिंकून आल्या. 

   
 यावेळीही  नेहवालअभिनव बिंद्रा,  सानिया मिर्झा -  बोपन्ना यांच्याकडे डोळे लागून राहिले होतेपण स्पर्धा सुरु होण्यापूर्वी टेस्ट इव्हेन्टमध्ये दीपा कर्माकरने कमला करून दाखवलीती करमरकर नसून कर्माकर आहे हे आपल्या प्रिंट मीडियाला समजायच्या आत तिची  फायनल फेरीही झाली नि त्यातही शानदार प्रदर्शन करत ती चौथी आलीखरंतर तिचा परफॉर्मन्स झाला तोपर्यंत ती सिल्व्हर मेडलची दावेदार झाली होतीपण तिच्यानंतर जिम्नॅस्टिक्स खेळातील स्वित्झर्लंडची वर्ल्ड नम्बर  आणि मग अमेरिकेची नम्बर सध्याची वर्ल्ड चॅम्पियन यांनी अतिकमाल करून दाखवल्याने दीपाचे पदक हुकलेचौथा नम्बर या ऑलिम्पिकला सुटत नाही असं  काहीसं  तोपर्यंत वाटू लागलेलं होतकारण दीपाच्या आधी बीजिंग ऑलिम्पिकचा गोल्ड मेडलिस्ट अभिनव बिंद्राही त्याच्या आवडत्या हातखंडा १० मीटर एअर रायफलमध्ये उत्तेजनार्थ आलालास्ट शॉटच्या आधी त्याची रायफल तुटल्यानेही अर्थात त्याच्या कामगिरीवर परिणाम झाला असणारचपण मेडल तर हुकले ते हुकलेच नाभर म्हणून गगन नारंगही बाहेर पडलागेल्या सलग तीन ऑलिम्पिकमध्ये हक्काने मेडल मिळवून देणाऱ्या शूटिंग मध्येच भारताची ही वाताहत आणि बाकी काही खेळात तर क्वालीफाय होण्यापासून सुरुवात

ब्रॉन्झ हुकण्याच्या आपल्या हॅट्ट्रिकमधल्या दुसऱ्या बॉलवर 
आपले टेनिस आउट झाले.  मिश्र दुहेरीत अँडी मरेसारख्याच्या जोडीला हरवल्यावर पुढे ब्रॉंझ मेडलसाठी झालेल्या सामन्यात मिर्झाबोपन्ना जोडीने दोन सरळ सेट्समध्येच रॅकेट टेकलीहॉकीत ३६ वर्षांनी आपण क्वार्टर फायनलला गेलोआणि - ने लीड घेऊनही बेल्जीयमला नंतर  गोल करू दिलेस्पर्धेत तोवर २७ पैकी फक्त  पेनल्टी कॉर्नर्स गोलमध्ये कन्व्हर्ट करण्यात आलेले यश (!) त्या सामन्यातही सुरूच राहिले आणि हॉकी टीम बाहेर पडलीदीपिका कुमारीच्या आर्चरी टीमने 'इकडून वाऱ्याचा वेग होतावगैरे कारणे देत गाशा गुंडाळलाआणि त्यांना हरवणारे महिला मंडळ म्हणाले की 'आमच्या गेमची वेळ पाहता वारा असणार हे गृहीत धरूनच आम्ही सराव  केलाम्हणून जिंकलो'.

बॅडमिंटनमध्ये श्रीकांत बाहेर पडला असला तरी त्याने क्वार्टरमध्ये या खेळातला सध्याचा बापमाणूस लिन डॅनला जबरी फाईट दिली होतीपूर्वी ऑलिम्पिक मेडल जिंकलेल्या योगेश्वर दत्तची कुस्ती यावेळी अगदी शेवटच्या टप्प्यात होती, पण तोही हरला.  

खरी कमाल केली ती साक्षी मलिकनेरोहतक से रिओ तक हा तिचा प्रवास खरंच अचंबित करणारा आहेती नुसती ब्रॉन्झ मेडलच्या लढतीत टिकलीच नाही तर तिने पिछाडीवरून पुढे येत गेम जिंकलाकुस्ती संपायला केवळ तीन मिनिटं बाकी असतानाही ती - अशी मागे होतीआणि गेम संपला तेव्हा तिने स्कोरबोर्ड -  असा करत मेडल जिंकलं होतंहे खरंच कौतुकास्पदसायना नेहवाल आणि आपली पुरुष हॉकी टीम आघाडी घेऊनही शेवटी मॅच हरत असताना साक्षीने दाखवलेली जिगर इतर खेळाडूंना प्रेरणा देणारीच

अशी प्रेरणा मिळाली की काय होतंतर एक ब्रॉन्झ खिशात येऊन २४ तासही उलटत नाहीततेवढ्यात अजून एका मेडलची आपल्यासाठी निश्चिती होते.. कारण पी व्ही सिंधूने सेमीफायनलमध्ये अपोनंटला अक्षरशलोळवलेलं असतंरँक १० ची सिंधू क्वार्टर आणि सेमीजमध्ये अनुक्रमे रँक  आणि रँक  ला हरवते हे  खूपच भारीपण तिची फायनल आणखी खडतर होती.. कारण टक्कर होती वर्ल्ड नंबर  कॅरोलिना मरीनशीही स्पेनची खेळाडू स्पेनमध्ये 'लेडी नदालम्हणून ओळखली जातेकारण दोघेही डावखुरेदोघांचाही खेळ प्रचंड फास्ट आणि प्रतिस्पर्ध्याला कायच्या काय दमवणारात्यांची एनर्जी शोषून मग त्यांना नमवणारादोघांनीही नंबर वनपद भूषवलंयबाकी खेळताना मरीन खेळते जास्त की किंचाळते जास्त हा पीएचडीचा विषय!   अर्थात हिलाच हरवून आपल्या सायनाने २०१४ ला ऑस्ट्रेलियन ओपन जिंकली होतीपण मग बदला घेत या मरीनने मागच्या वर्षीची ऑल इंग्लड ओपन सायनालाच फायनलला हरवून मारली होतीयावेळी सायनाकडून फार अपेक्षा असताना नेमके दुखापतीनी तिला बेजार केले आणि तिचा खेळ अपेक्षेप्रमाणे झाला नाहीत्यात मतभेद होऊन गोपीचंदसारख्या द्रोणाचार्य कोचपासून फारकत घेण्याचाही परिणाम अलीकडे तिच्या खेळावर दिसून येतोयतेच श्रीकांत आणि सिंधू मात्र अजूनही गोपीचंदचे शिष्य असल्याने ऑलिम्पिक गाजवत राहिले.


सायना आणि मेरी कोमसारखे आपले काही खेळाडू आपापल्या खेळात वर्ल्ड नम्बर वन होतातपण नेमके ऑलिम्पिकसारख्या बिगेस्ट प्लॅटफॉर्मवर मात्र सिल्व्हर किंवा ब्रॉन्झमध्ये समाधान मानतातयावेळी सिंधूचा फॉर्म पाहता तिला गोल्ड जिंकायचा भारीच चान्स आहेगेल्या लंडन ऑलिम्पिकमध्ये आपण आजवरची सर्वात जास्त म्हणजे सहा मेडल्स जिंकली होतीयावेळी तर १२० जणांचा संघ पाठवल्यावर अपेक्षा जास्त होत्यापण स्पर्धा संपत आली तरी खाते उघडलेच जात नव्हते.. ९२ च्या बार्सिलोना ऑलिम्पिकलाही असेच  शेवटचे आपण हात हलवत शून्य कमाईने परत आलो होतोपण नंतर प्रत्येकवेळी मेडल्स जिंकत आलोयआणि यंदा तर हुकमी एक्के एकेक करून बाहेर पडताना पाहून यावेळीही तेच होतंय की काय असं वाटू लागलं होतंमेडल्सची पाटी कोरी बघून शोभा डेसारख्यांना उगाच आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या (सिंधू फायनलला जाताच या बाईने सिंधू - सिल्व्हर प्रिन्सेस असं ट्विट टाकून आणखी शोभा करून घेतलीच आहेम्हणजे गोल्ड जिंकणारच नाही हा किती विश्वास!). पण जाऊदेएक स्त्रीच जसे दुसऱ्या स्त्रीचे दुःख समजून घेऊ शकते म्हणताततसेच एक स्त्रीच दुसरीला तोंडावरही पाडू शकते हे सिंधू आणि साक्षीने मेडल आणून सिद्ध केलंच.

टीपसुलतान सिनेमात हिरो ऑलिम्पिक मेडल जिंकून ३०० कोटी कमावतोतर अशी मोठी रक्कम अशा काही कष्टाळू टँलेन्टेड खेळाडूंना शोधून घडवण्यातपैलू  पाडण्यातत्यांना  सुविधा देण्यातही खर्च व्हावी ही आता काळाची गरज आहेतरच अशा मोठ्या स्पर्धा आल्या की सोशल मीडियावर फिरणारे जोक्स आणि शोभा डेसारख्यांची वटवट थांबेल

-- पराग