Thursday, 25 August 2016

एक धक्का

एक धक्का.. इंजिनियरिंगला इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंजिनियरिंग हा विषय पहिल्या झटक्यात सुटल्यावर बसलेला

एक धक्का.. रणवीर सिंगला बाजीरावांच्या भूमिकेत पाहून आणि मल्हारीवर टपोरी नाचताना बघून गिळलेला

एक धक्का.. मी माउंट एव्हरेस्टवर गेल्यावर काय देशील असं विचारल्यावर एकाकडून उत्तरात मिळाल्यावर पचवलेला

एक धक्का.. मांजरेकरांच्या हिंदी दे धक्का आवृत्तीत संजय दत्तला बघावं लागणार असल्याच्या जाणिवेने आगाऊ मुदतीत पचवावा लागलेला

एक धक्का.. स्वत:च्या पायावर धोंडा मारून घेणाऱ्या याहूची विक्री इतक्या स्वस्तात झाल्याची पाहून बसलेला

एक धक्का.. दीपा कर्माकर टेस्ट इव्हेन्टमधून फायनलला गेल्यावर 'तिने गोल्ड जिंकले' अशी बातमी पसरताना क्रीडाअज्ञानाचा जाणवलेला

एक धक्का.. केजरीवाल, शोभा डे, बरखा, सागरिका, राजदीप, वागळे वगैरेंची फडतूस ट्विटाट्विटी पाहून रोजच्या रोज बसत असलेला

एक धक्का.. तिची फ्रेंड रिक्वेस्ट स्वत:हून आल्यावर त्याला बसलेला

एक धक्का.. ती फ्रेंड रिक्वेस्ट माजोर्डेपणाने डिलीट करून त्याने तिला दिलेला

एक धक्का.. फेसबुकवर काहीजणांची नको तिथे अनावश्यक लुडबुड पाहून बसलेला

एक धक्का.. लिहायला अजून काही सुचत नाही म्हणून आठवणारा मुंबईतला भाऊचा

एक धक्का.. हे असलं काहीतरी वाचून तुम्हाला बसू घातलेला 

साधा वारकरी ते बालशिवाजी: एक प्रवास 

ही फजिती नाहीये तर एक्च्युअली ध्यानीमनी नसताना मिळालेल्या प्रमोशनबद्दल बोलू काही असं आहे. म्हणजे त्याच झालं असं की वन्स अपॉन अ टाइम मी चौथीत होतो. बापट बाल शाळा या सांगलीतील प्रसिद्ध प्राथमिक शाळेत फायनल इयरला म्हणजे चौथीत होतो. पाचवीपासूनच्या माध्यमिक शिक्षणासाठी सांगलीतील दोन आघाडीच्या फेमस शाळा म्हणजे सिटी हायस्कुल आणि कन्या पुरोहित प्रशाला.. पैकी पुरोहित शाळा मुलींची असल्याने तिथे मी मुलगा असल्याने मला प्रवेश मिळणार नव्हताच (तिथले काही सुंदर चेहरे पुढे इंजिनियरिंगला वालचंदला भेटलेच). आणि तसही आम्हाला सिटी हायस्कुलच पाहिजे होतं. आम्हा गावभागवाल्याना सिटी हायस्कुल अगदीच जवळ. अर्थात तिथे मेरीटवरच प्रवेश मिळायचा.

आताशा वयोमानानुसार नेमके निमित्त स्मरत नाही, पण शिवजयंती किंवा असाच तत्सम प्रसंग असावा. बापट बाल, म के आठवले या प्राथमिक आणि सिटी हायस्कुल, मालू हायस्कुल, पटवर्धन शाळा, कन्या पुरोहित प्रशाला या माध्यमिक अशा सर्व शाळा या सांगली शिक्षण संस्थेच्या छत्राखाली असलेल्या. तर आम्ही चौथीत असताना कसलीशी दिंडी की मिरवणूक प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांतर्फे निघणार असे काहीसे होते. हे कशासाठी वगैरे आधी काही माहीत नव्हते. पण लेझीम जमते त्यांनी हॉलमध्ये जमा अशी काहीशी दवंडी पिटवण्यात आली होती. आम्ही काहीजण गेलो. तिथे कळले की बरेच वारकरी, काही मोजके मावळे आणि एक किंवा दोन बालशिवाजी यासाठी निवडले जाणार आहेत.

आमची हॉलमध्ये प्रॅक्टिस सुरू झाली. सुरुवातीला सगळेच वारकरी होते. मस्त रिदम पकडून ते ग्यानबा तुकाराम करायला मजा येत होती, म्हणून आम्हीही काही मित्र  वारकरी झालो. मग वारकऱ्यांमधूनच ५-६ मावळे आणि १-२ बालशिवाजी निवडले जाणार होते. तसे ते निवडलेही गेलेत असं २-३ दिवसांनी समजलं. मग त्या मावळ्यांना आणि शिवाजींना वेगळ्या काही सूचना दिल्या जायच्या, आता ते आमच्यात नाचायला नसायचे. कारण मावळे आणि शिवाजी एका मोठ्या ट्रेकटरमध्ये किंवा ओपन टेम्पोत आणि त्या पुढे काही आणि मागे काही वारकरी असं त्या दिंडीच स्वरूप होतं.

पण मग आणखी मावळे लागणार आहेत असं काहीतरी ठरलं त्यांचं (बहुतेक ट्रेकटर किंवा टेम्पोत जिथे उभं राहायचं होत ती जागा बऱ्यापैकी मोठी आहे हे कळलं असाव त्यांना एव्हाना), मग पुन्हा वारकऱ्यांमधून काही मावळे निवडले जाणं आलंच, यात नेमका माझा नम्बर लागला. खरतर मला वारकरी म्हणून रस्ताभर ग्यानबा तुकाराम करत हातात लेझीम नाचवत फिरायला मिळणार म्हणून आनंद झाला होता. आता मात्र नुसत एका जागी उभं राहावं लागणार होतं. पण घरी आईबाबा म्हणाले, "अरे चांगलंय की. नुसतच खूप वारकऱ्याच्या गर्दीत हरवून जाणाऱ्या वारकऱ्यापेक्षा मावळा, तोही महाराजांचा मावळा करतायत तुला, तर नाराज कशाला होतोस".. मग मीही असूदे म्हटलं.

पुन्हा सराव सुरू झाला, पण आम्ही नेमकं काय करणार आहोत हे कळलं नव्हतं, फक्त कुठलीशी एक मूर्ती सांगली शिक्षण संस्थेत येणार होती, ती सिटी हायस्कुलमध्ये या ट्रॅक्टरमधून न्यायचीय आणि त्यासोबत हा सगळा लवाजमा असणार असं कळलं होत. आता आम्हा मावळ्यांना कस उभं राहायचं, ट्रॅक्टर सुरू असताना बाहेर न बघता शिवाजीकडे बघत राहायचं आणि हातात भाला घेऊन शांत उभं राहायचं, अधूनमधून घोषणा द्यायच्या, जयजयकार करायचा वगैरे धडे दिले जात होते. तर शिवाजी झालेल्या दोघांना मूर्तीसमोर नतमस्तक होऊन खाली बसून करंगळीवर तलवार धरून गुडघ्यावर कस बसायचं, हे सांगितलं जात होत, पण त्या दोन बालशिवाजींपैकी एक जण त्यांच्या मते शिवाजी म्हणून तितकासा शोभत नव्हता, पण तरी तो रिहर्सल्समध्ये तेव्हापुरता तरी शिवाजी होता.

सराव करत करत एक दिवस ड्रेपरीवाल्याकडे जाण्याचा दिवस उजाडला. आम्हाला सगळ्यांना घेऊन सर त्या दुकानात गेले. तिथला माहोल बघून आम्ही पोरं तर हरकूनच गेलो आणि मला खरच भारी वाटू लागलं की बर झालं आपण मावळा झालो ते. वारकरी म्हणून नुसतं धोतर सदऱ्यात जावं लागलं असत, आता मात्र आपल्याला हा मस्त मावळ्याचा पोशाख घालायला मिळणार, मावळे घालतात तसा छातीवरून एका बाजूला ओढलेला पूर्ण पांढरा सदरा, डोक्यावर मावळ्याची लाल आडवी पगडी, हातात भाला आणि छान मजबूत जोडे. आम्हा मावळ्यांना तयार केलं गेलं तेव्हा तिथेच दोन्ही शिवाजींनाही त्यांचा ड्रेस घालून तयार केलं जात होतं. शिवाजीचा ड्रेस तर एकदमच भारी होता. तो जो डाउटफूल बाल शिवाजी होता तो तर आता त्या ड्रेसमध्ये अजिबातच शिवाजी म्हणून शोभून दिसत नव्हता.

बरच फिरत फिरत गावातले बरेच भाग कव्हर करत शेवटी सिटी हायस्कुलमध्ये जावं लागणार होतं, किमान एक दीड तास तरी चालणार होती दिंडी..  त्यामुळे एक शिवाजी असून चालणार नव्हतं.. आळीपाळीने दोन्ही शिवाजींनी खाली गुडघ्यावर बसायचं, दुसरा गुडघा न वाकवता.. इकडे तिकडे न बघता.. करंगळीवर ती दिलेली छोटी तलवार धरून, मग एकावरच भार पडू नये, त्याचे बसून बसून हात, पाय आणि मान दुखू नयेत म्हणून ही खबरदारी की दोनजण असावेत. आता ऐनवेळी दुसरा शिवाजी कुठून आणायचा, अर्थातच तिथे तयार दिसणाऱ्या मावळ्यांकडे नजर फिरवली गेली, आणि अचानक अस्मादिकांना बोलावले गेले. "पराग, तू तो मावळ्याचा ड्रेस काढ आणि हा घालून दाखव" असा हुकूम सोडला गेला.

शिवाजीचा ड्रेस तर अर्थात मावळ्यापेक्षा भारी होता. भारी भरजरी अंगरखा, कानातले मोठे डूल, कपाळावर टिळा, दोन्ही मनगटावर आणि बाहूंवर छोटे बिल्ल्यासाखे काहीतरी, डोक्यावर जबरी जिरेटोप, पुढची बाजू मिशीसारखा पीळ मारून वरती वाकलेली असे पायातले वेगळेच कसलेसे जोडे, कमरेला तलवार आणि म्यान, बोटांमध्ये १-२ अंगठ्या आणि गळ्यात ३-४ मोत्यांच्या माळा असा मस्त ड्रीम पेहराव. तो पोशाख परिधान केल्यावर मला न्याहाळलं गेलं, त्यांचे चेहरे एकदम प्रफुल्लित झाले, बेस्ट, छानच शोभतोय की हा, यालाच का नाही केलंत आधी शिवाजी वगैरे ते एकमेकांत बोलत होते.
"हां झालं, आता तू शिवाजी"

मला खूप म्हणजे खूप म्हणजे खूपच भारी वाटलं. परवापर्यंत मी गर्दीतला एक वारकरी होतो, आणि आता थेट एकदम शिवाजी. आईबाबाही प्रचंड खुश झाले. पण तलवार कशी धरायची, कस बसायचं वगैरे पुन्हा मला नव्याने त्यांना शिकवाव लागलं. दिंडीचा दिवस आला. ट्रॅक्टरमधून त्या मूर्तीसोबत दोन बालशिवाजी (सोमनाथ गाडगीळ, पराग पुजारी) आणि काही मावळे (समीर कुलकर्णी, अनिश शहा, निखिल देशपांडे, चेतन ढोबळे वगैरे) निघाले. आधी सोमनाथ तलवार घेऊन खाली ऐटीत बसला, मग थोड्या वेळाने त्याला विश्रांती आणि मी खाली बसलो.. हे असं आळीपाळीने सुरू राहिलं ५-६ वेळा तरी. उजवा गुडघा खाली टेकवून डावा गुडघा काटकोनात आणि उजव्या हातात तलवार धरून डाव्या करंगळीवर ती ठेवायची अशी आमची पोझिशन. आम्ही त्या भवानी तलवारीने करंगळी कापून रक्त सांडून त्या मूर्तीसमोर स्वराज्याची शपथ घेत आहोत असा तो सीन. आणि मावळे घोषणा देताहेत शिवाजी महाराज की जय, जय जिजाऊ जय शिवबा, जय शिवाजी जय
भवानी वगैरे...

ज्या ज्या रस्त्यावरून गेलो त्या प्रत्येक ठिकाणी, चौकात बरीच गर्दी दिसली. सगळे लोक थांबून थांबून त्या ओपन  ट्रॅक्टरमध्ये कौतुकाने पाहत होते की कोण झालाय शिवाजी, मूर्ती कशी आहे, मावळे किती आहेत.. बराच वेळ फिरत फिरत शेवटी आम्ही सिटी हायस्कुलमध्ये पोचलो. संध्याकाळ झाली होती, मूर्ती सन्मानपूर्वक बाहेर आणून ठेवली गेली. आम्हाला एका वर्गात बसवून श्रमपरिहार म्हणून कांदेपोहे दिले गेले.

आता ही मूर्ती कोणती, तर मित्र हो, सांगायला अत्यंत अभिमान वाटतो की सिटी हायस्कुलमध्ये प्रवेश करताच दर्शनी भागातील स्टेजच्या वरती उंचावर जी जिजाऊ आणि बालशिवाजी यांची तेजस्वी पांढरीशुभ्र मूर्ती दिसते, तीच ही मूर्ती होती. ती शाळेत आणण्यात आमचाही असा महत्त्वाचा वाटा होता. पुढच्या वर्षी याच शाळेत प्रवेश घेतल्यावर सहा वर्षे सतत अभिमानाने ती मूर्ती पाहत राहिलो. तेव्हा दहावीला निकालाची गुणवत्ता यादी म्हणजेच बोर्ड सिस्टीम होती, बोर्डात झळकणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार असायचा तेव्हा त्यांना प्रमुख पाहुणे, अध्यक्ष आणि एखाद्या सरांसोबत तिथे वरती नेले जायचे आणि त्या मूर्तीला त्यांच्या हस्ते हार घातला जायचा, सोबत मैदानात बसलेल्या शेकडो मुलांचा टाळ्यांचा कडकडाट अशी प्रथा होती. मूर्ती घेऊन येत असताना आमचे बरेच फोटोही काढले गेले होते, पण इथे मूर्तीचा फोटो देतोय.



मूर्ती स्थापन केल्या दिवसापासून बाहेरून रस्त्यावरून जाणारे अनेक लोक जाता येता त्या मूर्तीला नमस्कार करून जातात... अगदी आजही. आणि आता तर आमचे घरच सिटी हायस्कुलसमोर आहे.   भारी वाटत, ती प्रेरणादायी मूर्ती सतत डोळ्यासमोर.

--पराग पुजारी
कॅरेबियन बेटांवर...

ही सध्याची वेस्ट इंडिजची टीम म्हणजे भयानकच साधी आहे.. एकदम धन्यवादच. असंच खेळायचा त्यांचा हेका पाहून खरंतर भारत- वेस्ट इंडिज कसोटी मालिकेत त्यांचा व्हाईट वॉश होणं अटळ वाटत होतं. त्यात शाण्यांनी आपल्या कॅरेबियन बेटांवर फॉर्मातल्या टीम इंडियाशी चार टेस्ट्स खेळायचा प्लान आखला होता. कायपण चंग बांधतात एकेक लोक्स..पण त्यांच्या सुदैवाने आणि कॅरेबियन देवाच्या कृपेने पाऊस आणि एका टेस्टमध्ये संघर्ष करत त्यांनी ही नामुष्की टाळली. वा! सध्या आपला कोहली तर काय ऐकत नाही कुणाला, हा गडी फॉर्मात असताना हे काय डोहाळे लागले वेस्ट इंडीजला. वनडे आणि टीट्वेंटीत तर त्यानं त्याचं खमकं डेंजरत्व सिद्ध केलं आहेच. पण आता कसोटीतही समोर येईल त्याला असेल त्या पिचवर असेल त्या देशात झोडपतोय. बारापैकी नऊ शतकं ओव्हरसीज आहेत त्याची.. आता बोला. आधी ऑस्ट्रेलियात तीन शतकं हाणून आला, आता कॅरेबियन बेटावर पहिलीच इनिंग दोनशेची. अरे परवा परवा तर आयपीएलला ९७० रन्स करून आला की.. तेच इकडे कंटिन्यू.. सातत्य का चेष्टा राव.. २०११ ला वेस्ट इंडीजमध्येच टेस्ट डेब्यू केलेलं याने, पण तेव्हा ती अख्खी सिरीज फेल गेला.. आणि आता त्याचा राग निघतोय होल्डर, ब्रेथवेट, बिशू, गॅब्रिएलवर.. भोगतायत बिचारे.

'रुकावट के लिये खेद है' म्हणत पावसाने दोन कसोटयांमद्ये व्यत्यय आणून त्या भिजवून भिजवून खाऊन टाकल्या, त्यातली एक तर पूर्णच, आणि दुसरी एक टेस्ट वेस्ट इंडिजने जबर इच्छाशक्तीने लढून ड्रॉ केली.. ही सिरीज खरंतर अश्विनने गाजवली, दोन शतके ठोकली.. आधीही विंडीजविरुद्धच दोन शतके केली होती त्याने.. मग अर्थातच या मलिकेत रीतसर सामनावीर, मालिकावीर होत गेला. कारकिर्दीत सहावेळा मालिकावीर आत्ताच झालाय तो.. सचिन, द्रविड, सेहवाग, गावसकर याना मागे टाकलंय त्याने या बाबतीत.  

कोहली काय तसाही आता जागतिक दुखणं होऊन बसलाय, सगळेच बोलर्स आळीपाळीने रडतायत. किती नडले किती फोडले.. पण वेस्ट इंडीजचं खरं दुखणं वेगळंच.. म्हणजे टीट्वेंटीत धडकी भरवणारी ही टीम कसोटीत गळपटतेय कारण त्यांचे खरे राक्षस टेस्ट खेळायला इंटरेस्टेड नसतात. गेल, पोलार्ड, ड्वेन ब्राव्हो, ड्वेन स्मिथ, सॅमी, रसेल सगळे आपापल्या घरी टीव्हीवर मॅच बघत बसलेत. नरीन, बद्री, बेन हे स्पिनर्सपण या ना त्या कारणाने बाहेर.. जेरोम टेलरला पण आत्ताच निवृत्ती घ्यायची होती.. हे सगळंच खरंतर टेस्ट दर्जासाठी त्यांना मारक ठरतंय. तो रसेल तर बसला फक्त टेस्टमधून निवृत्ती घेऊन.. का तर म्हणे वनडे आणि टीट्वेंटीवरच लक्ष केंद्रित करायचंय. इयान बिशपनी जाहीर फाडला होता त्याला (हां राईट, बिशप म्हणजे तेच ते ‘तोतली अंदर कंत्रोल’ कॉमेंटरीवाले) ‘हे आजकालचे विंडीजचे प्लेयर्स टेस्ट खेळण्यात रसच दाखवत नाहीत हा फटका बसतोय आमच्या क्रिकेटला’ हे त्यांचं अचूक निरीक्षण आणि रास्त खंत. (हां असं मराठीत बोलले नव्हते हां ते..ऑफकोर्स) मुळात रसेल काय किंवा तो डोक्यावर काथ्या घेऊन फिरतो तो लंकेचा मलिंगा काय.. यांनी 'मला पांढरा टीशर्ट नको' हा एक प्रकार सुरु केलाय तो बरोबर नाहीये खरंतर.    

मान्य आहे की वेस्ट इंडीजची टीम आता पूर्वीसारखी राहिली नाही.. आता पहिलीच टेस्ट घ्या...त्यांची बॉलिंग वीक आहे असं आपली बॅटिंग बघताना वाटलं होतंच, पण त्यांच्या बोलर्सबद्दल आपल्याला असं वाटलेलं त्यांच्या बॅट्समनना सहन झालं नसावं.. म्हणून ते त्याहून गचाळ कामगिरी करतायत. ओपनर ब्रेथवेटने इतका मनापासून किल्ला लढवला, व्हँल्यूएबल ७४ करून आउट झाला, कौतुक करावं म्हटलं तर सेकंड इनिंगला हा कंटाळून पहिल्याच ओव्हरमध्ये बुलबुलडब्ल्यू.. अरे आव्वाज कुणाचा  इशांतदादाचा. आणि मग तो दुसरा ब्रेथवेट? फिरंगी बेन स्टोक्सला सलग चार कानाखाली मारल्यागत चार सिक्स मारून वर्ल्डकप जिंकून देणारा माणूस.. ‘कार्लोस ब्रेथवेट.. रिमेम्बर द नेम’ हे स्वत:चं जाहीर कौतुक कमेंटेटरकडून झालेला खेळाडू पहिल्याच बॉलवर उमेश यादवकडून बोल्ड होतो.. उमेश यादवकडून?

एकेकाळी मार्शल, होल्डिंग, गार्नर, रॉबर्ट्स आणि नंतरही वॉल्श, अँम्ब्रोसपर्यंत तोफखाना होता त्यांचा. वॉल्श, अँम्ब्रोसला सतत खेळूनच सचिन, द्रविडचे पूल आणि हुक इतके भारी झाले असावेत. शेवटी ते त्यांच्या उंचीप्रमाणेच बॉल टाकणार ना.. अगदी नंतरही नाही म्हणायला गेला बाजार तो डिल्लन. पण त्याला तर त्याच्या बेंबीला लागणाऱ्या पार्थिव पटेलनेही पुल करत सिक्स मारला होता, सो त्याचं एक जाऊद्या.

आताचे यांचे बोलर्स नुसतेच उंच आहेत, पण त्या पाकिस्तानच्या सात फूट चार इंच मोहम्मदची बॉलिंग खेळता येण्यासाठी नेट प्रॅक्टिस करताना समोरच्याला स्टुलावर उभं राहून बॉल टाकायला लावत त्या परफेक्ट ट्रॅजेक्टरीवर सराव करणारा कोहली आपल्याकडे.. कोहलीने त्या वर्ल्डकप मॅचला पाकिस्तानला बदडत शंभर ठोकलं होतंच सवयीप्रमाणे.. तर त्याला हे बॉलिंगमध्ये शून्य जान असलेले साडेसहा, फुटी असले तरी काय घाबरवणार.. अरे धवनपण ८४ मारतो तुम्हाला.. साउथ आफ्रिकन बॉलिंग खेळताना परवा परवा तर चष्मा घेऊन पॅव्हेलियनमध्ये बसायचा हा (बोथ इनिंग्ज डक).. करता काय तुम्ही लेको.. ते हातात दिलंय लाल रंगाचं गोल काहीतरी, ते नीट वापरा ना जरा.

पूर्वी विंडीजची बॅटिंग तर काय होती.. अगागागा.. व्हिव रिचर्डस, लॉइड, ग्रीनीज, कन्हायसारखे दयाळू बोलरला खाऊ का गिळू टाइप खेळणारे लोक, सोबर्ससारखा ऑल टाईम ग्रेट अष्टपैलू.. नंतर पण लारा तर होताच.. एकदम जगात भारी चारशे मारी.. पण लारानं आपल्याला फार छळलं नाही खरंतर.. आपल्याला ते चंदरपॉल, हूपर, सरवान वगैरे रडवायचे.

आताच्या विंडीजचं काय.. हरले तरी त्यांच्यावर माफक टीकाच होईल.. टीम दुय्यम आहे हे कारण आहेच. टीट्वेंटीत जाता येता जिंकून कॅलिप्सो करत बेभान नाचणारे हे जिंदादिल मनमौजी लोक, टेस्टमध्ये असेच राहिले तर अवघड आहे.. अरे नुकतेच अंडर19 आणि स्त्री पुरुष 20-20 असे तीन वर्ल्डकप जिंकले यांच्या टीमने हे सांगून कुणाला खरं वाटेल का? (आय मीन, क्रिकेट फॉलो न करणाऱ्या कुणालातरी सांगावं लागेल हां हे.. ती परवाच ड्रग्जमध्ये सापडलेली रशियाची ममता कुलकर्णी... कोण ती, हां मारिया शारापोव्हा वगैरे.. नाहीतर काय, सचिन माहीत नसतो त्याना क्रिकेट माहीत नसतंच.)

आणि अबे डॅरेन ब्राव्हो, लेका नुसता स्टान्स आणि काही शॉट्स लारासारखे जमले म्हणून प्रतिलारा म्हणायला लागले लोक तुला.. पण सातत्य लागतंय गड्या. तसं टेस्ट रेकॉर्ड चांगलं आहे तुझं. तुमची टीम आशेने बघतेय तुझ्याकडे आणि सॅम्युएल्सकडे. राग मानू नको हां भावा तुझ्यापेक्षा दोन वर्षं मोठाय मी म्हणून हक्कानं सांगतोय तुझ्याच भल्यासाठी.. अरे इकडे बघ आमचा कोहली २०० मारतोय, तिकडे जो रूट २५४ मारून पाकला रडवतोय.. अर्रर्र.. शिट यार, रूट कोहलीपेक्षा भारी खेळला.. आता काय उत्तर देणार आमचा बच्चन फ्लिंटॉफनं काही ट्विट केलं तर.. कसं फेकणार रूट उखाडके आता.. असो ते आम्ही आणि बच्चन बघून घेऊ. तुम्ही खेळा परत.. फॉलोऑन बसलाय तुम्हाला..

वेस्ट इंडीज.. टेस्ट क्रिकेट इज बेस्ट क्रिकेट.. ते असं वेस्ट करू नका.. (बेस्ट से याद आया.. टिनो बेस्ट कुठे गायब झाला)

#Cricket_1

Tuesday, 19 July 2016

भातुकली.. तेव्हा आणि आता

भातुकली.. तेव्हा आणि आता


"संतोष, त्या मेहतांची ऑर्डर दिली का? फुटबॉल आणि व्हॉलीबॉल्सची"
"हो दिली.. आज सकाळीच."
"हां.. आणि ते कामत परत का येऊन गेले? त्यांना हवा होता तसाच सेट दिला होता ना आपण त्याना?"
"होय साहेब, ते तर उलट आभार मानायला आलेले.. मुलगी एकदम खुश झालीये सेट बघून म्हणत होते..ऑफिसला जाता जाता वाटेतच आपलं दुकान लागतं ना त्यांना. सांगितलं होतं ना तुम्हाला साहेब, तुमचा नंबरही घेऊन गेले तुम्हाला फोन करतो म्हणाले होते. आला होता का फोन?"

संतोषने सांगितलं तस मनोहरलाही आठवलं, अरे हो, आपल्याला फोन आला होता कामतांचा - 'मनोहरजी, थँक यू व्हेरी मच. बछडीचा नुसता धुमाकूळ सुरू आहे सध्या सोसायटीतल्या मैत्रिणींना बोलावून. इतकी खेळण्यांची दुकानं फिरलो पण हिला कोणता सेटच पसंत पडत नव्हता, शेवटी तुमच्या दुकानात खास कस्टमाइज्ड भातुकलीचे सेट मिळतात अशी ख्याती ऐकून आलो आणि एकदाची माझ्या छकुलीची इच्छा पूर्ण करू शकलो .' असं म्हणाले होते कामत.
"अं अरे हां.. विसरलोच. बोलला होतास तू. हे जरा कामाच्या व्यापात.. हो, फोन आलेला त्यांचा. बाकी आजच्या काही नवीन ऑर्डर्स?"
"हां सत्यम टॉईजमधून फोन आला होता.. त्यांची ऑर्डर आहे. १० कॅरम्स, २५ चेसबोर्ड्स, नवा व्यापारचे ३० सेट आणि.. आणि"
"आणि काय?"
"साहेब, आणि स्पेशल भातुकली सेटच्या २० ऑर्डर्स आहेत."
"संतोष.. मी तुला कितीवेळा सांगितलंय की यावर त्यांना काय सांगायचं ते"
"हो सांगितलं मी की आम्ही बाकी खेळणी विकतो, पण कस्टमाइज्ड भातुकली सेट इतर टॉईज शॉपीजना विकत नाही. 'आम्ही ते सेट जास्त रेटने घ्यायला तयार असूनही नेहमी तुम्ही अशी आमची अडवणूक करता' असं म्हणून वैतागून फोन ठेवला त्यांनी. पण बाकीची ऑर्डर तीच आहे."
"हम्म"
"साहेब, आपण निघायचं कधी?"
"हम्म..निघू जरा वेळाने"
"चालेल.. चहा थंड होतोय तुमचा"
"हां घेतो.. बरं एक काम कर तोवर, ते वरच्या मजल्यावर बॅट्स, बार्बी डॉल्स आणि बॅडमिंटन रेकेट्स, शटल्स लावून घ्यायचे बाकी आहे ना, ते लावून घे. मग निघू"

बरं म्हणून संतोष पायऱ्या चढून वर निघून गेला. आणि इकडे 'अंजली टॉईज शॉप'चे मालक मनोहर साने चहाचा कप हातात धरून बसले. कप कसला मोठा मगच. तोही प्लास्टिकचा.. त्यावरच्या टॉम अँड जेरीच्या चित्राकडे बघत बसले आणि मग हळूहळू एकेक घोट घेऊ लागले. आणि हा चाळीशीचा माणूस त्याबरोबर एकेक वर्ष मागे जाऊ लागला.
"बाबा, मला भातुकली पाहिजे.
"अं"
"अहो भातुकलीचा खेळ.. मला या रविवारी घेऊन देणार होतात नातुम्ही."
"ह्म्म... घेऊ हां.. लवकरच घेऊ. पुढच्या आठवड्यात नक्की घेऊ."
"काय हो बाबा, नेहमी असच असत तुमचं. नंतर घेऊ, नंतर घेऊ. पण घेत काही नाही"
"अग असं नाही बेटा, घेणार ना नक्की घेणार. मग आपण सगळे मिळून खेळू हां."
"बर.. मग ना, मी तुम्हाला कुकरमधून भात करून देईन, किटलीतून चहा देईन. छानपैकी तुमची आवडती भाजी करून देईन. पण हे सगळं करायला मला भातुकली पाहिजे ना. त्याशिवाय कस.."
"अग हो अंजू, घेऊ आपण लवकरच. अगदी तुला जो आवडला होता तोच सेट घेऊ. त्याच दुकानातून. पण सध्या.."
"सध्या काय बाबा.."

कुठल्या तोंडाने सांगणार होतो मी त्या चिमुरडीला की आधीच माझी मिळकत काही..  उलट मित्रांकडून, आणि बरीच अशी कुणाकुणाकडून उधारीच झालीये. पण मला त्याचं काही वाटत नाही. मी दिवसरात्र मेहनत  करून ते पैसे फेडेन, पण माझ्या मुलीचं ऑपरेशन नीट झालच पाहिजे. तिचा तरी काय दोष होता, का देव असं करतो? कोणत्या गुन्ह्याची शिक्षा म्हणून त्या निष्पाप जीवाला जन्मत:च हृदयात छिद्र असावं? तिच्यासाठी, तिच्या उपचारांसाठीच तर पै पै साठवत होतो आपण, छोटे मोठे हट्ट पुरवलेही पण तेव्हा खरंच नाही जमला आपल्याला तो तिला आवडलेला महागडा भातुकलीचा खेळ घ्यायला. हिरमुसली बिचारी, पण तरी फारसा हट्ट नव्हती करत. तिचं आवडतं टॉम अंड जेरी कार्टून बघत बसायची मग आनंदात. पण तसही मैत्रिणींकडे पाहून, त्यांच्याकडे खेळून तिलाही वाटलं की असावी आपल्याकडेही भातुकली तर काय चुकलं तिचं. हा तर मानवी स्वभावच आहे, मोठ्याना नाही दुसऱ्यांची घरं, गाड्या पाहून असं वाटत की हे आपल्याकडे का नाही? तिचा तर चिमणीचा जीव.

आणि चिमणीचाच ठरलाही. अल्पजीवी. तिच्या सहाव्या वाढदिवसाच्या आधीच काही दिवस... खरंतर डॉक्टरांनी सांगितलं होतच तस की हिच्या जन्मावेळीच हिची आई गेल्यामुळे आणि एकूणच त्या कॉम्प्लिकेटेड पण न टाळता येणाऱ्या डिलिव्हरीमुळे ही तशी अशक्तच राहणार. आणि मग लवकरच हा हार्ट प्रोब्लेमही कळला. दारोदार फिरणारा सेल्समन म्हणून आपली तरी काय अशी मिळकत असणार होती.. आणि तसही नंतर घरी हिच्यासाठी मीच बाबा आणि मीच आई असल्यामुळं बाहेर जाणंही जास्त व्हायचं नाही. घरातूनच करण्यासारखी छोटीमोठी कामं करायला लागलो आपण. मग मिळकतीवर परिणाम.
अंजूला सांभाळण्यासारखंही नव्हतं तेव्हा दुसरं कुणी. केले केले खूप प्रयत्न  केले, पण शेवटी गेलीच तिच्या लाडक्या आईला भेटायला, खरतर जाब विचारायला कदाचित की 'काय ग, माझा चेहराही न बघता,आणि तुझा चेहराही मला न दाखवता का मला तेव्हाच सोडून गेलीस'... पण आता चांगली गट्टी जमली असेल दोघींची, एकत्रच आहेत की अकरा वर्ष आता.. दोघी मस्त खेळत असतील मला इकडे एकट्याला सोडून जाऊन.

काय खेळत असतील - भातुकली. ती आईला चहा करून देत असेल?आईसाठी कुकर लावत असेल? काय करत असेल अंजू आत्ता?
एवढ्यात फोन वाजला, मनोहरने उचलला. कुठल्याशा बालसाहित्य प्रकाशन करणाऱ्या पब्लिकेशनमधून.. मनोहरची मुलाखत पाहिजे होती. तुम्ही लहान मुलांमुलींशी हसतखेळत बोलून त्यांच्या मनातले खेळ बरोब्बर समजून घेऊन, त्याना अगदी हवे तस्से खेळ कसे बनवून देता,भातुकली हीच तुमची स्पेशालिटी कशी काय वगैरे दोन-तीन प्रश्न धाडकन विचारले गेलेच तरी तेवढ्यात.. मनोहरने मग मुलाखतीसाठी त्याच्या या मोठ्या टॉईज शॉपीत त्यांना यायची वेळ दिली आणि फोन ठेवला.

पुन्हा तो विचार करू लागला काय सांगणार मी त्यांना.. अंजू शेवटी अगदीच मलूल पडली होती, तेव्हा एकदा आपण तिच्या मैत्रिणीच्या घरी जाऊन तिचा भातुकलीचा सेट घेऊन गेलो होतो हॉस्पिटलमध्ये हेही त्याला आत्ता अचानक आठवलं. तो खेळ पाहून तात्पुरती का होईना अंजूची कळी खुललीही होती. ती शेवटचीच खुलली. थोड्याच वेळात ती...

चंगच बांधला आपण. त्यातून बाहेर तर यायचं.. कशात  तरी मन रमवलंच पाहिजे. मग अंजूच्याच आवडीच्या गोष्टीत का रमवू नये, त्या निमित्त्ताने माझी अंजू सतत माझ्याबरोबर तरी राहिली असती. सेल्समन म्हणून उद्बत्तीपासून पुस्तकांपर्यंत आणि पावडरच्या डब्यांपासून कॅलेंडर्सपर्यंत सगळंच विकलं होतं आपण, मग खेळणी का जमू नयेत. प्रत्येक खेळणं,विशेषतः भातुकली विकली गेली की प्रत्येकवेळी मला माझी अंजू माझ्याकडे बघून गोड हसताना दिसायची. मग आपोआपच आणखी कष्ट करत गेलो, हळूहळू जम बसला, मिळणाऱ्या कमिशनमधून पैसे साठत गेले. आणि एकदा धाडस करून कर्ज काढून छोटस  खेळण्याचं दुकानच सुरू केलं. मग ते खोकेवजा दुकान आणखी मोठं झालं. प्लास्टिकच्या, रबराच्या, स्टीलच्या व्यवसायातले लोक, लाकडी खेळणी बनवणारे अशा बऱ्याच जणांशी आपण एव्हाना ओळख वाढवत नेलेली. मग भातुकलीच काय बाकीही बरीच खेळणी आपण मुलांना हवी तशी त्यांच्याकडून बनवून घेऊन देऊ लागलो. अशा कस्टमाइज्ड खेळण्यांसाठीच आपलं नाव होत गेलं. बघता बघता दुकान मोठं  झालं.. तेही ही स्पेशालिटी जपत जपतच.

आपलं 'अंजली टॉईज शॉप' हे फेमस होत गेल. आपलं कसलं..अंजूचंच हे खरतर. तिच्या नावाने असलेली गोष्ट माझी कशी असेल, मी आपला फक्त हे दुकान चालवतो, सांभाळतो झालं. 'मी स्वतःही खूप खेळणी घेऊन खेळणार आणि माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींनाही भरपूर खेळणी खेळायला देणार' असच तर म्हणायची ती सतत. भातुकली तिचा सर्वात आवडता खेळ. 'बाबा मला कुकर अजून मोठा हवाय,आणि किटली अशा नक्षीची हवी, फ्रिजपण हवाय मस्त' वगैरे किती काय काय बोलायची आणि आपण म्हणायचो  'हो ग राणी, अगदी तुला पाहिजे तसाच देईन हां. तसा मिळाला नाही तर बनवून देईन वाटल्यास, पण देणार नक्की'.. पण पुढे ते नक्की प्रत्यक्षात काही आलं नाही.. तिच्याबाबतीत तरी.

आणि आज शेकडो भातुकलीचे सेट्स विकतो आपण.. नाव झालय आपलं यातला स्पेशालिस्ट म्हणून. पण त्यात अंजू आहे का? तशी आहेपण आणि नाहीपण.. प्रत्येक लहानग्या चेहऱ्यात तर दिसतेच की ती आपल्याला..

अकरा वर्षांपूर्वी आपण न देऊ शकलेली भातुकली आणि आज रोज इतक्या देतोय त्याही भातुकलीच..

हीच ती भातुकली.. तेव्हा आणि आता
पण  दोन्हीत किती फरक.. संदर्भाने, अर्थाने आणि भावनेनंही..

"साहेब, लावून झाले रॅक्स सगळे. निघायचं का?"

संतोषच्या या अचानक प्रश्नाने मनोहरची तंद्री भांग पावली. अंजू तशी त्याच्या मनातच आहे, पण अकरा वर्षे झाली, आजच्या दिवशी त्याला नेहमीच अंजूची जास्त प्रकर्षाने आठवण येते. आज २३ एप्रिल.. अंजूचा वाढदिवस. दरवर्षीच्या त्याच्या ठरलेल्या नेमाप्रमाणे आजही तो चालला होता शहरातल्या वेगवेगळी पाळणाघरं, अनाथाश्रम, शाळा अशा एकूण सहा ठिकाणी तिथल्या लहान मुलांना खेळणी भेट म्हणून द्यायला. त्याचा खास आवडता भातुकलीचा सेट - 'अंजली सेट' तर तो स्वतःच्या हातानी देतो. अंजूचा न झालेला सहावा वाढदिवस तो दरवर्षी असाच साजरा करतो.

"हम्म.. चल संतोष. बॉक्सेस घे.. गाडीत ठेव नीट. निघूया"

-- पराग

Monday, 4 July 2016

बाबांवर मी बोलतो काही (लष्करी जीवन – भाग १०) 

आर्मी मेडिकल ऑफिसरची सही घेऊन त्यांना ते लो मेडिकल कॅटेगरीसाठी एप्रूव्ह करणारे सर्टिफिकेट घेऊन बाबा इकडे युनिटमध्ये आले.. आणि झालं, आता इकडे युनिट खवळलं. आता युनिटने बाबांना रिलीज करायला नकार दिला, त्यासाठी त्यांना काही गूळ लावण्याचा प्रकारही झाला. आता हे काय?

“व्हाय आर यू मेडिकली डाउन?” वगैरे प्रश्नांची सिनियर्सकडून सरबत्ती सुरु झाली. खरंतर ‘इंडेक्स फिंगर सिव्हीयरली इंज्युर्ड, ही इज अनेबल टू फायर, नॉट इव्हन मेडिकली फिट फॉर अदर डेली कॉमन एक्सरसाईझेस अँड ड्यूटीज लाइक लोडिंग अँड अनलोडिंग.. हेन्स एप्रूव्हड एज मेडिकली डाउन अँड धस पुट इन लो मेडिकल कॅटेगरी’ हा ऑथेंटिक ऑफिशियल आर्मी मेडिकल रिपोर्ट वाचूनही ते असं विचारत होते. त्यांचं म्हणणं असं की उद्या गरज पडलीच तर तुम्ही फ्रंटवर जाऊ नका तोफा आणि रायफल्स घेऊन, हाताळू नका त्या गोष्टी. पण सर्व्हेयर म्हणून रहा, इथेच फक्त ऑफिसवर्क करा वगैरे.

पण आता १८ वर्षे सर्व्हिस झाल्यावर आणि शेवटी शेवटी रेजिमेंटही बदलली गेल्यावर तसंही प्रमोशन इतक्यात नव्हतं, फक्त ऑफिसवर्क ही ऑफर गूळ लावण्यापुरती असते हे आधीच्या काहीजणांच्या उदाहरणांवरून तिथे बाबांनी पाहिलं असावं. पण अगदी बेसिक पण महत्त्वाचं म्हणजे १९६५ आणि १९७१ या दोन मोठ्या युद्धांत आणि लेह, लदाख, सियाचीन, पूंछसारख्या अनेक ठिकाणी काही लहानमोठ्या चकमकीत सहभागी झाल्यावर आता फ्रंटवर न जाणं, तोफा नि रायफल्स पहिल्यासारख्या सक्षमतेने हाताळू न शकणं यासारखे अस्सल सैनिकाला दुसरे दु:ख नाही. मग तिथे त्या वातावरणात राहणं नको वाटतं, की डोळ्यांसमोर दिसतायत बाकीचे सगळे या सगळ्या ड्यूटीज करताना आणि आपण मात्र...

तुटक्या बोटाकडे बघत त्यांना हा कठोर निर्णय घेणं भागच होतं. शिवाय बाबांचं लग्न होऊनही आता चार वर्षे झाली होती. पहिली झालेली मुलगी जन्मानंतर अवघ्या चार दिवसांत गेल्यावर आता नुकतेच त्या चालू वर्षी १९८३ ला एका मुलाचे ते बाबाही झालेले होते (हा माझा मोठा भाऊ प्रवीण.. आमची जी ताई असली असती तिचा १९८१ साली जन्म झाला तोच चार दिवसांचं आयुष्य जगण्यासाठीच जणू, मग अशावेळी इकडे आईची मन:स्थिती काय असेल), त्यामुळं एकूणच हाही सगळा विचार करून घरच्या या जबाबदारीमुळे घरची ओढही आता पहिल्यापेक्षा जास्त होती.


शेवटी अठरा वर्षे सर्व्हिस करून मग १२७८५०१ या बॅज नंबरने निवृत्ती घेतली. पेन्शनसाठीचे ट्रेजरी ऑफिसर सर्टिफिकेट, डिस्चार्ज बुक, पीपीओ (परमनंट पेन्शन ऑर्डर) वगैरे सोपस्कार पार पडले. तेव्हा पेन्शन सुरु झाली ती साधारण २९१ रुपये. खरंतर लो मेडिकल कॅटेगरी असल्याने ती संबंधित मेडिकल सर्टिफिकेट्स सादर करून पेन्शन बेसिकच्या जास्तीत जास्त २०% पर्यंत अधिक मिळू शकते. अर्थात तुमच्या फिजिकल डिसएबिलिटीच्या तीव्रतेनुसारच. पण त्यासाठी तहहयात दर दोन वर्षांनी संबंधित ऑफिसात स्वत: हजर राहून दाखवणं की ‘बाबांनो रे, मी जिवंत आहे अजून आणि हे पहा माझे फिजिकल डिसएबिलिटीवाले बोट’... हा एकतर शुद्ध वेळखाऊ वैताग, कारण अशा ऑफिसेसमध्ये अगदी अंदाधुंद कारभार असतो, कामे वेळेवर होत नाहीत. (म्हणजे तेव्हा १९८३ची तरी ख्याती अशीच होती, आत्ता कुठे आपण जरा पेपरलेस वर्क वगैरे करायला शिकतोय, पण तेही फारच कमी.) कुठल्याही सरकारी ऑफिसची पहिली ओळख अजूनही दुर्दैवाने फायलींचा ढिगारा हीच आहे. आणि तरीही यांचे डॉक्युमेंटेशन नीट नसते, हवी असलेली डॉक्युमेंट्स वेळेवर मिळतील तर शपथ.

पुढे इकडे सांगलीत येऊन बाबांनी निर्लेप या किचन एक्सेसरीजच्या बिझनेसमध्ये स्वत:ला गुंतवून घेतले होते, मग ही धावपळ करणे शक्य नव्हते. म्हणून मग ‘ही सवलत आणि वाढीव पैसे मला नकोत’ हे सांगणारे हे ‘अनविलिंग सर्टिफिकेट’ सही करून सोल्जर बोर्डाला द्यावे लागते ते त्यांनी लिहून दिले, अन्यथा आज पेन्शनसोबत ते मिलिटरी मेडिकल बोर्डाचेही साधारण (सुधारित पेन्शनप्रमाणे) किमान दोन-तीन हजार तरी एक्स्ट्रा मिळत असते. अर्थात अजूनही ते कसलेसे एक सर्टिफिकेट घेऊन स्वत: सांगलीतल्या जिल्हा सैनिक बोर्डात जाऊन वर्षातून एकदा वगैरे हजेरी लावावी लागतेच की ‘मी अजून जिवंत आहे आणि माझी पेन्शन मी स्वत:च घेतो आहे.’ पण एक्स-सर्व्हिसमेनसाठी हे तसे कॉमनच आहे, अनेकांना माहीतही असेल.
                                                                               ***

घरातल्या बाबांच्या त्या दोन ट्रंक्स हा आम्हा दोघा भावंडांसाठी नेहमीच कौतुकाचा आणि कुतूहलाचा विषय राहिलाय. ट्रंकवर त्यांचे नाव, १२७८५०१ हा नंबर आणि ट्रंकमध्ये त्यांचे मिलिटरीचे ड्रेस, वेगवेगळ्या प्रकारचे बूट (अगदी शोलेमधल्या ठाकूरसारखे सोलला खाली खिळे असलेलेही), त्यांचा बॅज, कॅप, बेल्ट, आणि सर्वात कौतुकास्पद म्हणजे ती पाच मेडल्स. एक अमूल्य ठेवा!! 

बाबांची मेडल्स 

१९९५ साल.. एक गुरुवार.. दादाला हाक मारताना अचानक बाबांना घरीच पॅरॅलिसीसचा जोरदार अटॅक आला आणि ते कोसळलेच. पण मग त्यातूनही ते जिद्द आणि विलपॉवरच्या जोरावर बाहेर आले. हे डॉक्टरांचंच मत. आम्ही तेव्हा तसे लहानच होतो, पदर खोचून आईने प्रचंड प्रचंड धावपळ केली. त्यावेळी कदाचित बाबांच्या उजव्या पायाला उजव्या हाताचे अप्रूप वाटत होते, की ‘ह्याचे हे एक बोट वाकत का नाही, स्पेशल दिसतंय हे बोट’, आपण असे का नाही असं त्याला वाटत असावं.. सांगण्याचा मुद्दा.. जोराचा अटॅक आणि अलीकडेच सुरु झालेले डायबेटीस यामुळे तेव्हा संपूर्ण पायालाच धोका होता. एरवीही डायबेटीस पेशंट्सना पाय फार जपावा लागतो, आणि अशावेळी तर जास्तच.. नाहीतर गँगरीन होऊन अख्खा पायच कापून काढावा लागतो. उशीर केला असता तर तीच वेळ येऊ शकेल असं डॉक्टरांचं म्हणणं पडलं, म्हणून मग ते टाळण्यासाठी त्यांची उजव्या पायाची करंगळी तेव्हा कापण्यात आली. पायावर किंचितसे काळसर डाग मात्र राहिले. पण त्यावेळी तो निर्णय योग्यच होता. तेव्हा ‘बोटावर निभावणं’ म्हणजे अक्षरश: काय असतं हे आम्ही पाहिलं आणि बाबांनी अनुभवलं. 

त्यांच्या त्या मोठ्या आजारात पैसा पाण्यासारखा खर्च झाला. पैसा उभा करण्यात कष्टाने उभा केलेला स्वत:चा बिझनेस, म्हणजे निर्लेप, मिल्टन, सहेली, टेबलटॉप, अशोक स्टोव्ह इत्यादी किचन एक्सेसरीजच्या अनेक एजन्सीज हातात असलेली प्रवीण इंडस्ट्रीज ही फॉर्मातली कंपनी आणि घर, गाडी वगैरे सगळंच पणाला लागलं होतं, ते सगळंच गेलं. नंतरही म्हणजे हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळून घरी आल्यावरही पायात ताकद येण्यासाठी त्यांना कबुतराच्या रक्ताचं मालिश करायला एकजण येत होता. लवकर रिकव्हरी होण्यासाठी हा उपाय बरेचदा डॉक्टरांकडून सुचवला जातो.

तशा अडचणी बऱ्याच होत्या, पण आमचं शिक्षण पूर्ण करणं हेच आईबाबांचं पहिलं ध्येय होतं. वाट्टेल ते कष्ट करून आईबाबांनी आम्हाला शिकवलं, मोठं केलं. दादा (मोठा भाऊ प्रवीण) आता तसा सेटल्ड आहे, मी अजूनही धडपडतोय. पण जसा कोणत्याही मुलांना वाटतो तसाच आम्हांलाही आईबाबांचा अर्थात या सगळ्यासाठी प्रचंड अभिमान वाटतो.
तुम्ही कुणीही असा, काहीही असा, कुठेही असा, पण आईबाबांना कधी चुकूुनही दुखवावंसं वाटलंच तर त्याआधी प्लीज स्वत: आत्महत्या करा.
                                                                                ***
बाकी काय सांगू, एवढे भाग होतील असं खरंच वाटलं नव्हतं. लष्करी जीवन हा तसा रुक्ष विषय, पण एका अनाम अंत:प्रेरणेने लिहित गेलो. पण कदाचित भवताली घडणाऱ्या काही गोष्टीही म्हणजे सियाचीन ग्लेशियरमध्ये वाचलेल्या हनुमंतअप्पा यांचं नंतर झालेलं निधन, त्याचवेळी मीडियाने हाइप केलेल्या जेएनयूसारख्या काही देशविघातक गोष्टी, एकीकडे दहशतवाद्याच्या अंत्ययात्रेला होणारी गर्दी तर दुसरीकडे हुतात्मा संतोष महाडिक यांच्या पत्नीनेही सैन्यात जाण्याची दाखवलेली जिगर किंवा इस्रोच्या इकॉनॉमिकल  मोहिमेत स्वयं हा आपला उपग्रह सोडूनही मीडियाकडून दुर्लक्षित राहिलेले पुणे सीओइपी कॉलेजचे हुशार इंजीनियर्स (कारण त्यांनी देशविरोधी काही केलं नाही ना हिरो व्हायला) अशा अनेक गोष्टी आजूबाजूला घडत होत्या. काही अस्वस्थ करत होत्या, काही बळ देत होत्या. यातूनही सैनिकांचं किंचितसं का होईना पण जगणं समोर आणावंसं वाटलं असेल मला. मग मी लिहित गेलो, तुम्हीही उत्सुकतेने वाचत गेलात.. छान वाटलं.
लेखमाला लिहायची असं खरंतर ठरवलं नव्हतं एक दोन पोस्ट्समध्ये थोडक्यात सांगणार होतो, पण पहिला भाग शंभरावर लोकांनी वाचून मग अनेकांनी सविस्तर लिहिण्यास सुचवलं. नंतर बाबांकडून नीट माहिती घेऊनच वेळ घेऊन लिहिलं. माझा लेखमालेचा असा हा पहिलाच प्रयत्न.. सर्व वाचकांचे मन:पूर्वक आभार. आपला भारत देश भारीच आहे, चला सगळे मिळून देशासाठी आणखी काहीतरी चांगलं करूया, देश पुढे नेऊया.

भारतीय सेनेच्या प्रत्येक सैनिकाला मनापासून सॅल्यूट!

भारतमाता की जय!! जय हिंद !!!

(लेखमाला समाप्त.. धन्यवाद) 
  .. 
बाबांवर मी बोलतो काही (लष्करी जीवन – भाग ९)

या शेवटच्या दोन भागांमध्ये बाबांच्या निवृत्तीबद्द्ल.. आता ती किती सहज सुखासुखी आणि कितपत स्वेच्छेने मिळाली ते पाहू..

एकदा भरतपूर ते बिकानेर या प्रवासात बाबा सहकाऱ्यांसोबत होते. आर्टिलरी सामुग्री नेण्याचे रुटीन काम होते. डेस्टिनेशनला पोचल्यावर ८० किलोपर्यंतच्या गोळ्यांचे रेल्वे वॅगनच्या फळीवरून अनलोडिंग सुरु होते. असे प्रचंड मोठे हेवीवेट गोळे उतरवून घेताना सहकाऱ्याशी योग्य तो समन्वय असावा लागतो. बरेचसे गोळे उतरवून झाले होतेच. पण शेवटी शेवटी एक गोळा उतरवून घेताना त्यांचे आणि सहकारी सैनिकाचे काहीतरी कोओर्डीनेशन दुर्दैवाने चुकले. बांधकाम सुरु असलेल्या साईटवर आपण कित्येकदा पाहतो की ते मजूर एकमेकांकडे विटा, किंवा वाळूच्या, सिमेंटच्या पाट्या किती जबर कौशल्याने पास करत असतात. मग त्यांच्यात एक जरी चुकला तरी पूर्ण चेन बिघडते. पण सरावाने ते अगदी एकमेकांकडे न बघताही ते काम सहज तरी शिस्तबद्ध करत असतात. एवढच कशाला, घरी आपणही साधा चहाचा कप किंवा चिवड्याची बशी देतानाही असं होतं की समोरच्याने धरलंय असं वाटतं आणि म्हणून आपण तितक्यात सोडून देतो, पण त्याने ते धरलेलं नसतं आणि मग कप, बशी खाली पडून फुटते.

तोफगोळ्यांचे लोडिंग अनलोडिंग (फोटो प्रातिनिधिक)
आता इथे फरक एवढाच की इकडे बशी नाही तर एक प्रचंड हेवीवेट बॉम्ब होता. असंच झालं, समोरच्याने नीट पकडलाय असं समजून बाबांनी आणि त्यांच्या सहकारी सैनिकाने गोळा हातातून सोडला, पण त्या घेणाऱ्याने अजून तो नीट धरला नव्हता.. इकडे यांची ग्रीप तर ऑलमोस्ट सुटली होती, मग तितक्यात यांची पकड पूर्णच सुटली असती तर समोरच्या सहकारी सैनिकाला गंभीर इजा होण्याची शक्यता होती. म्हणून मग तो गोळा खाली पडण्याच्या आधीच बाबा एकटेच खाली हात धरून तो पकडायला गेले, पण त्यांच्या दुसऱ्या साथीदारानेही तो त्याचवेळी धरणे अपेक्षित होते, जे झाले नाही. परिणामी त्या गोळ्याखाली बाबांची बोटे चेंगरली गेली. आणि उजव्या हाताची तर्जनी जागच्या जागी मधल्या पेरातून तुटून लोंबकळायला लागली.

प्रचंड रक्तस्राव सुरु झाला, तातडीने त्यांना जवळच्याच आर्मी मेडिकल कॅम्पमध्ये नेण्यात आले. बाबा ते तुटलेले बोट तसेच दुसऱ्या हातात धरून सपोर्ट देत कसेबसे तिथे गेले. लगेचच किमान टाके तरी घालावे लागणारच होते. भूल देऊन पुरेशी गुंगी आल्यावर उपचार करायचे आणि ते बोट जोडायचे तर त्यात काही वेळ गेला असता. अशावेळी सैनिकांनाच विचारले जाते की ‘भूल न देताच उपचार करायचे का, त्रास खूप जास्त होईल पण पटकन काम होईल’. अफाट वेदना होत असल्याने बाबांनीही त्याला होकार दिला आणि मग भूल न देताच त्या बोटावर उपचार झाले. बाकी हात, पंजा आणि बोटांनाही काहीशी दुखापत झाली होती पण ती इतकी गंभीर नव्हती. तर्जनीचा तुटलेला तुकडा पुन्हा जागच्या जागी नीट जोडून बसवण्यात आला. ऑपरेशन तसं छोटंसंच होतं, पण महत्त्वाचं होतं, गरजेचं होतं. त्यावेळी त्या बोटात घातलेला तो छोटासा रॉड कायमस्वरूपी राहणार होता. तो काढला की पुढची दोन्ही पेरं पुन्हा तुटून पडली असती. अर्थात हा रॉड कायमचा त्या बोटातच असल्याने अजूनही बाबांचे त्या तर्जनीचे फक्त नखाजवळचे पेरच वाकते.. तेही अगदी जरासेच, आणि बोट मधल्या पेरातून मध्यभागी वाकू शकत नाही.

आली का लक्षात पंचाईत? हेच बोट रायफल चालवण्यासाठी असतं. आता बोटच वाकत नाही म्हटल्यावर ट्रिगर करणार कसे, इतक्या वर्षांची सवय अचानक तीही या वयात बदलणं अवघड असते, त्यामुळं फायरिंगसाठी दुसरं बोट किंवा डावा हात वापरणं मुश्कीलच होतं. ऑपरेशननंतर तिथल्या मेडिकल फॉरमॅलिटीज पार पाडल्यावर बाबांना तिकडून तातडीने दिल्लीला पाठवण्यात आलं.

सुरुवातीची बेसिक पोस्टिंग्ज झाल्यावर १९६७ ते १९८० या काळात बाबा थर्टीसिक्स मीडियम या रेजिमेंटमध्ये तर त्यानंतर थर्टीफोर मीडियम या रेजिमेंटमध्ये होते. खरंतर ही सिरीयस इंज्युरी पाहूनही त्यांचे युनिट त्यांना सोडायला तयार नव्हते, कारण बाबांकडे एकदा एखादे काम सोपवले की ते होणारच हा त्यांचा तिथे लौकिक. पण आता रेजिमेंट बदलल्यावर तसंही आधीपासून या युनिटमध्ये असणारे काही सीनियर्स होतेच, ज्यांना प्रमोशनसाठी अर्थात आधी प्रेफरन्स मिळतो. त्यामुळं बाबांना आता इतक्यात तरी प्रमोशन ड्यू नव्हतं, त्यात ही इंज्युरी झालेली. नाहीतर आता दोन रॅंक्समध्ये प्रमोशन होऊन ‘लेफ्टनंट’ पद टप्प्यात होतं.

तोफगोळे 
आता अशा परिस्थितीत किमान तसं मेडिकल सर्टिफिकेट तर मिळणं जरुरी होतं. कारण ते नसेल तर पुन्हा इतर सैनिकांसारखाच सराव लागला असता, ज्यात अर्थात फायरिंगही येतं. आणि तोफगोळ्यांचं लोडिंग अनलोडिंग तर असायचंच, शिवाय बाकीची अवजड शस्त्रे किंवा आर्टिलरीच्या एक्सेसरीज हाताळणे वगैरे भाग असतोच. या सगळ्यासाठी आता अजून भरून न आलेली भळभळणारी जखम होती, आणि अजून काही आठवडे तरी ती फार त्रास देणार होती, यामुळं किंबहुना ती कामं करणं शक्यच नव्हतं. पण मग आता पंचाईत अशी की मेडिकल सर्टिफिकेटही लगेच मिळत नव्हतं, कारण मेडिकल ऑफिसरने असं म्हणणं पुढं केलं की ‘तुम्ही तर सर्व्हेयर आहात, तुम्हाला कुठे रोज फायरिंग करायला जावं लागतं, कशाला पाहिजे मग सर्टिफिकेट?’. अर्थात हे म्हणण्यापुरतंच असतं आणि काम तर सगळंच पडतं.


मग त्या मेडिकल ऑफिसरला अचानक लक्षात आलं असावं की आपण ऑफिसर रँकवर आहोत आणि हा नायब सुभेदार रँकचा माणूस फक्त एक सर्टिफिकेट मागतोय. एक सही करणं किती अवघड आहे, पण ती फुकट का करायची. आणि हा माणूस सध्या आहे काय तर सर्व्हेयर.. मग त्यांना पुन्हा अचानक आठवलं असावं की सध्या आपण एक बंगला बांधतो आहोत त्यासाठी लेआउट, डिझाईन वगैरे सगळंच करायचं बाकी आहे.

झालं, मग त्यांनी बाबांना पुन्हा बोलावलं आणि सांगितलं की ‘माझं एक काम कराल तर तुमचं सर्टिफिकेट एप्रूव्ह करून देईन.’ कोणतं काम ते त्यांनी सांगितलं. मग काय, सर्व्हेयर हा बऱ्यापैकी आर्किटेक्ट असतोच की. झालं, त्यांच्या बंगल्याचं मार्किंग, संपूर्ण ड्राफ्टवर्क, सगळे मॅप्स, ब्ल्यू प्रिंट्स बाबांनी तयार करून दिल्या. आणि काय आश्चर्य, दुसऱ्या दिवशी सही झालेलं सर्टिफिकेट बाबांच्या हातात पडलं. त्या ऑफिसरला आर्किटेक्ट नेमून त्याला द्यावी लागणारी मोठी फी वाचली आणि असं फुकटात पण उत्तम दर्जेदार काम झालं. यथावकाश बाबांच्या त्या डिझाईनबरहुकूम त्या ऑफिसरचा बंगला बांधून झाला.

सही घेऊन त्या सर्टिफिकेटसह बाबा इकडे युनिटमध्ये आले.. आणि झालं, आता इकडे युनिट खवळलं. आता युनिटने बाबांना रिलीज करायला नकार दिला, त्यासाठी त्यांना काही गूळ लावण्याचा प्रकारही झाला. आता हे काय? उद्या शेवटच्या भागात पाहू...
(क्रमशः)   

Tuesday, 21 June 2016

बाबांवर मी बोलतो काही (लष्करी जीवन – भाग ८)

बहुसंख्य सैनिकांचं दु:ख काय? त्यांना मिळणारा तुटपुंजा पगार, की तुटपुंजा शब्द पुष्कळ वाटेल असा मिळणारा आहार? की आणखी काही वेगळीच, सहजासहजीलक्षात न येणारी गोष्ट? उलगडून बघू जरा..

जॉईन झाले त्या काळी बाबांना एकूण पगार साधारण ७४ रुपये मिळायचा. पैकी बेसिक ५० रुपये, डीए २० रुपये आणि ४ रुपये डीडक्ट व्हायचे. एक तारखेला पगार झाला की दर महिन्याला बाबा लगेच फॅमिली अलॉटमेंट पॉलिसीखाली त्यातले तब्बल ५० रुपये डायरेक्ट इकडे सांगलीला पाठवून द्यायचे, डायरेक्ट कट म्हणजे प्रत्यक्ष हातात तेव्हा २० रुपयेच पडायचे आणि ५० रुपये तुम्ही सांगितलेल्या पत्त्यावर पाठवल्याची सही-शिक्क्याची रिसीट असा प्रकार.

हे पैसे स्लो मोशनमधल्या कासवाला किंवा पोलिओ झालेल्या गोगलगायीलाही उसेन बोल्ट ठरवेल अशा पोस्ट ऑफिसच्या वेगवान कारभाराने महिना अखेरीस इकडे पोहचायचे. हे सायकल प्रत्येक महिन्यात. नेहरू सरकारने तेव्हापासूनच सरकारी खात्यांना वेळच्या वेळी कामे करायची सवय लावली असती, लोकांना जरा स्वच्छतेचे महत्त्व पटवायला काही शिस्त लावली असती तर आज नक्कीच वेगळे चित्र दिसले असते. आणि भारत म्हणजे ‘गांधी, गरिबी, रस्त्यावरच्या गायी आणि गारुड्यांचा देश’ अशी इनफेमस इमेज झाली नसती आपली जगभरात. आज मोदींच्या स्वच्छ भारत अभियानाची खिल्ली उडवली जाते ती यामुळेच की ‘अरे ६० वर्षे आम्ही रस्त्यावर थुंकत आलो, कचरा इथे तिथे मनसोक्त टाकत रस्त्याचं डेकोरेशन करत राहिलो आणि आता असं मध्येच कसं थांबू’ टाइप. असो, तो वेगळा विषय.

पाठीवर ३ भाऊ, २ बहिणी अशी धाकटी टीम, आई बाबा असे सांगलीत कुटुंब आणि तेव्हा लहान वयात परिस्थितीमुळे कमवायला लागलेले बाबा आणि मोठे काका हे दोघेच. असं त्या काळी बऱ्याच घरी चित्र असायचं की थोरले एकदोघे कमवायला बाहेर पडलेत आणि त्यांच्या खांद्यावर घरचे खर्च निभावून नेले जातायत. अर्थात इतरही भावंडे त्यांना जमतील तशी, मिळतील ती कामे शिकतानाही करून घरच्यांसाठी अर्थार्जन करत राहायचेच.तरी नानांनी बाबांना सांगितलं होतं की ‘अरे तू असे इतके पैसे एकदम पाठवत जाऊ नकोस. तशी काही गरज नाही. किंबहुना १९६६ लाच त्यांनी बाबांना स्वत:चे अकाउंट ओपन करून पैसे साठवायला सांगितले होते. पण बाबांनी ते सिरीयसली घेतले नाही, आणि अगदी १९८० पर्यंत पैसे पाठवतच राहिले.

पण तिकडे सीमेवर असताना पैसा, पॅकेज, फॅसिलिटीज वगैरे गोष्टी अर्थात टोचत नाहीत. टोचते ती वेगळीच गोष्ट. मुळातच ९० टक्के सैनिकांचं दु:ख हेच की आपण कुटुंबापासून इतके दूर आहोत, कित्येक महिने भेट नाही, संपर्क अगदी कमी.. (आज आहे हे सगळं फोन्स, इंटरनेट वगैरे.. तेव्हा फक्त पोस्टकार्ड झिंदाबाद.. क्वचित फोन तेही खूप नंतरच्या काळात) पण फक्त दूर आहोत ही खंत नसते तर आपण त्यांना प्रत्यक्ष तिथे राहून काही मदत करू शकत नाही हे शल्य जास्त.

म्हणजे अचानक कुणी आजारी पडले तर ताबडतोब पोहचणे, किंवा कुणाचे लग्न, मुंज, बारसे वगैरे काही असेल तर ते अटेंड करणे हे दुरापास्त व्हायचे. लेह, लदाख, सियाचीनसारख्या भागात पोस्टिंग असताना तर ही वेदना जास्त भीषण. (होप तार तरी खरंच तारेच्या वेगानं जात असेल तेव्हा) बाबांनाही सगळ्याच भावंडांच्या लग्नात उपस्थित राहणे जमले नाही ते यामुळेच. अर्थात गंमत म्हणजे जे २० रुपये उरायचे त्यातही खर्च निवांत भागायचा. कारण खर्च म्हणजे काय तर फक्त तेल, साबण, ब्रश, टूथपेस्ट, दाढीसामान, चार कपडे वगैरे एवढाच. (शीख सैनिक सोडून शक्यतो कुणालाही परवानगी नसते दाढी ठेवायला, मग इतरांसाठी रोज दाढी करणं आलंच)

इंडियन आर्मी रँक्स 

एक गंभीर आणि खरंतर चुकीची गोष्ट म्हणजे जेवणाच्या बाबतीत घडायची. सैनिकांना जेवण अगदी मर्यादित मिळायचं. दर्जाबद्दल न बोललेलंच बरं. फिजिकल एक्सरसाइज झाल्यावर प्रत्येक सैनिक मग ६-८ केळी हादडायचा. जेवण ऑफिसर्सना चांगल्या प्रतीचं आणि पोटभर, पण इतर रँक्सच्या सैनिकांना मात्र अगदीच साधं, कधीकधी बेचव, निकृष्टच.

कमाल आहे, ज्यांना प्रत्यक्ष फ्रंटवर जाऊन शत्रूशी दोन हात करावे लागतात, त्यासाठी मजबूत व्यायाम करून तब्येत कमवावी लागते, बोजड रायफल्स हाताळत त्या सतत पाठीवर वागवत राहाव्या लागतात, अवजड तोफगोळे वगैरे वाहून न्यावे लागतात, रोज कसरतीत इतका घाम गाळावा लागतो त्यांना सैन्यात ही ट्रीटमेंट. पण कुणी काही बोलू नाही शकायचं, कारण सिपॉय रँकवर जॉईन झालेल्यांपैकी कित्येक तर कमी शिकलेले, अनपढही असत. अशांना आपल्यावर अन्याय होतोय हेही कळत नसतं. किंवा ‘इथे हे असंच असतं’ अशी त्यांनी समजूत करून घेतलेली असते. म्हणजे अपेक्षा काय तर इथल्या कामाला, फ्रंटवर लढायला पाहिजे वाघ आणि आहार मात्र शेळीचा.. असं कसं चालेल?

म्हणजे असं बघा, भाग मिल्खा भाग मध्ये ‘..और मेरी फटिग ड्युटी भी माफ है जी’ असं मिल्खासिंग झालेला फरहान म्हणतो तेव्हा आपण तो ‘कुणाचं काय तर कुणाचं काय’ टाइप कॅटेगरीतला विनोद समजून हसतो, पण त्यामागे ‘मी फटिग ड्युटी मारली तर मला आणखी भूक लागेल, प्लस मला धावायची प्रॅक्टिस तर करायची आहेच, आणि हे सगळं इतक्याशा तुटपुंज्या आहारात कसं होणार उस्ताद.. रनिंग किंवा फटिग ड्युटी एकच काहीतरी जमेल ना’ हा एक मनात म्हणलेला डायलॉगही असतो. पण ही पार्श्वभूमी लक्षात घ्यायला वेळ नसतो आपल्याला. उस्तादकडूनही त्याला विचारले जाते, "तुला दिवसा सराव करायला वेळ मिळत नाही ना?" शिवाय क्रॉस कंट्री दौडमध्ये टॉप टेन सैनिकांना फटिंग माफ आणि स्पेशल डाएट म्हणजे काय तर एक ग्लास दूध आणि दोन कच्ची अंडी हे उस्ताद प्रकाशराज सांगतो तेव्हाही सैनिकांचे चेहरे फुलतात हे आपण त्यात पाहिलंच आहे.

त्यातल्या त्यात बरी गोष्ट म्हणजे १९८० नंतर तरी चित्र हळूहळू का होईना पण बदलत गेलं असं बाबा म्हणतात. ८० हा असा टप्पा होता ज्याआधी नऊ वर्षं मेजर युद्ध करावं लागलं नव्हतं आणि त्याधीच्या नऊ वर्षांत तीन मोठी युद्धं लढावी लागली होती. १९७५ च्या आणीबाणीतून पुढे सरकारनेही आतापर्यंत थोडाफार धडा घेतला होता. ८० च्या दशकापासून राजकीय स्थिती बदलू लागली तसेच इकडे भरती होणारे सैनिकही बऱ्यापैकी शिकलेले असायचे. आणि आताशा तर किमान बारावी झालेलेच असतात बहुसंख्य. त्यामुळे त्यांनाही आपल्या हक्काची जाणीव असते.

आताआणखी समाधानाची बाब म्हणजे मनोहर पर्रीकर संरक्षणमंत्री झाल्यापासून लष्कराप्रति अनास्था मावळून सरकारी धोरणही सुधारलंय. कोणताही देश सर्वात जास्त खर्च करतो किंवा बजेट राखून ठेवतो ते त्याच्या लष्करासाठी ते का, कशासाठी हे भारताला नऊ वर्षांत तीनयुद्धं झेलल्यावर आणि त्यात अपरिमित झीज सोसल्यावर उशिरा का होईना उमगलं असावं.
पुढच्या भागात बाबांच्या निवृत्तीबद्द्ल..
(क्रमश:)