Tuesday, 9 October 2018

होम स्वीट होम - आपल्या घरातली गोष्ट


होम स्वीट होम अगदी साधा तरीही प्रभावी असा सिनेमा. झी मराठीच्या एका पुरस्कार सोहळ्यात 'जोश्यांची फळबाग' पाहिल्यापासून मी ज्यांचा फॅन आहे आणि ज्यांचं कोणतंही नाटक, सिनेमा, अगदी नांदीसारखं पुस्तक किंवा लोकप्रभातले 'दुसरी बाजू' हे सदरही सोडलं नाही त्या हृषीकेश जोशी यांचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच सिनेमा. हृषीकेशसोबत मोहन जोशी, रीमा, स्पृहा जोशी, विभावरी देशपांडे यांच्या मुख्य भूमिका आणि पाहुणे कलाकार म्हणून प्रसाद ओक, सुमित राघवन, मृणाल कुलकर्णी, आणि माझ्यासारख्या क्रिकेटप्रेमींसाठी आणखी एक सुखद धक्का म्हणजे चक्क विक्रम साठ्ये अशी फौज.

हृषीकेश जोशी, वैभव जोशी, मुग्धा गोडबोले यांच्या लेखणीतून साकार झालेली सिनेमाची कथा तशी अगदी साधी, सरळ, तरीही गुंतवून ठेवणारी. खुसखुशीत संवाद पेश करत सिनेमा आपल्याला कितीतरी प्रसंगात रिलेटेबल वाटत जातो, विशेषतः: मुंबईत वर्षानुवर्षे राहणाऱ्यांना नक्कीच. एका जुन्या इमारतीत राहतायत एक रिटायरमेंट झालेले साठीला आलेले जोडपे विद्याधर महाजन - श्यामल महाजन (मोहन जोशी - रीमा) आणि त्यांच्याकडे राहणारी त्यांची एक पेइंग गेस्ट कम भाची देविका (स्पृहा जोशी). त्यांची ही राहती जागा तशी शहरातली अगदी मोक्याची, त्यामुळे घर विकायचं म्हटलं तर मार्केटमध्ये या जागेला तीन-साडेतीन कोटींचा भाव आहे, हे उत्साही इस्टेट एजंट सोपान शिंदे (हृषीकेश जोशी) याच्यामुळे त्यांना कळतं. लिफ्ट नसलेल्या इमारतीत चौथ्या मजल्यावर असणारे घर म्हणजे वयोमानानुसार गुडघेदुखी असणाऱ्या श्यामल महाजन यांच्यासाठी डोकेदुखीच. पण जोडीने हे घर घेतानाच्या आठवणी आणि तिथला शेजारपाजार यात रुळलेल्या विद्याधर यांच्यासाठी हे फक्त विकणं तितकं सहजासहजी शक्य नाही. मग त्यांनी ते विकून लिफ्ट असणाऱ्या नवीन टॉवरमध्ये रहायला जावं म्हणून आपले युक्तिवाद लढवणाऱ्या श्यामल आणि ते होऊ देण्यासाठी विद्याधर यांनी मांडलेले मुद्दे, त्यातून पुढे काय काय घडत जातं, ते राहतं घर विकून नवीन घरी रहायला जातात का याभोवती मग कथा फिरत राहते आणि ज्याप्रमाणे परफेक्ट क्षणी मध्यंतर होतो, त्याप्रमाणेच एक सुयोग्य शेवट करत सिनेमा संपतो. हा सिनेमा अगदी अलगदपणे घर, माणसं, मानवी भावभावना, जुने, नवे, सोयीसुविधा, आपुलकी जिव्हाळा अशा अनेक गोष्टींना वेळोवेळी एकमेकांसमोर उभे ठाकायला लावतो, आणि तरीही बऱ्याच गाठी अलवार सोडवत जातो हे या सिनेमाचे माझ्या मते मुख्य यश.  


खरं तर सांगलीत, पुण्यात, मुंबईत जिथे कुठे आजवर राहिलो - तिथे सगळीकडे खूप घरं बदलत राहत आलेला मी, आणि त्यामुळे एकाच घराशी भावनिकरीत्या दीर्घकाळ नाळ जुळलेला मी - तरीही या सिनेमाने मला गुंतवून ठेवलं. याच क्रेडिट मी या सिनेमाची कथा, मांडणी, दिग्दर्शन, अभिनय, संगीत या सगळ्याच घटकांना देईन.

विशेषतः अभिनयात तर सर्वानीच बाजी मारली आहे. रीमाजींना पाहून सतत आपण काय ताकदीची अभिनेत्री गमावलीये हे वाटत राहतं. (त्यांच्यासाठी निर्मिती सावंत यांनी केलेलं डबिंगदेखील त्या भूमिकेच्यागरजेप्रमाणे आणि कित्येकदा तर हा रीमाजींचाच आवाज असं वाटावं इतक्या चपखलपणे  झालेलं आहे)

आणखी एक विशेष आवडलेली गोष्ट म्हणजे वेळोवेळी येणाऱ्या वैभव जोशींच्या कविता. घर हे या सिनेमातलं एक पात्रच आहे, त्यामुळे वैभव जोशींच्या कवितांमधून घर बोलतं, घराच्या भावना बोलतात, त्या भावना जगलेली माणसं बोलतात.

अगं चार भिंती आणि दोन खिडक्या नाहीयेत फक्त या घराला, आपण सामावून घेतलंय आपल्यात अवघ्या चराचराला
चार भिंती आणि दोन खिडक्या नाहीयेत फक्त या घराला, आपण फॅमिली मेंबर करून घेतलंय काळाच्या निसटत्या पाऱ्याला

हे असलं काही सुचण्याचे हे वैभवदादा क्लासेस का घेत नाहीत?

असो, नक्की पाहावा असा (आणि मी प्रीमियरला या सिनेमाचीच स्टारकास्ट आणि इतर अनेक कलाकारांच्या उपस्थितीत पाहिलेला सिनेमा) - 'होम स्वीट होम'

- पराग पुजारी




अंधाधुन हँगओव्हर


माझे आयुष्य सरळ, सुटसुटीत, अजिबात गुंतागुंत नसलेले का आहे?

. मी क्रिकेट खूप खेळलो असलो तरी चौदाव्या वर्षी मला डोक्याला बॉल लागून माझी काही ऑप्टिक नस वगैरे डॅमेज झाली नाही, त्यामुळे माझी दृष्टी जाऊन मी आंधळा होण्याचा प्रश्नच उद्भवला नाही

. (चष्मा असला तरी) मी (वर सांगितलेल्या कारणामुळे) अंध नाही, वर मला पियानोही वाजवता येत नाही, त्यामुळे एखाद्या एनजीओकडून पुण्यात प्रभात रोडवर अंध मेहनती होतकरू कलाकाराला मदत म्हणून दरमहा पाचशे रुपयात मला राहायला घरही मिळाले नाही

. आणि मला जर मुळात पियानो वाजवताच येत नाही, तर जुन्या जमान्यातल्या कुण्या नटाने मला घरी त्याच्या वेडिंग अनिव्हर्सरीला पियानोवादनासाठी (तेही पुणे बंद असण्याच्या वेळी म्हणजे भर दुपारी एक वाजता) बोलावण्याचाही प्रश्न कधी उद्भवला नाही. त्यामुळे अशा कोणत्या नटाने कमी वयाच्या नटीशी लग्न केले असल्यासही माझा त्या प्रकरणाशी काहीच संबंध नाही. मग त्यांच्यासमोरील फ्लॅटमध्ये कुणी वृद्ध स्त्री राहत असल्यास तर मला ते माहीत असण्याचीही गरज नाही

. किडन्या काढून घेणारा कुणी डॉक्टर किंवा एखादी लॉटरीची तिकिटे विकणारी बाई किंवा गेलाबाजार ऐश्वर्या रॉयचे पोस्टर रिक्षाच्या मागे लावणारा असा कोणताही रिक्षा ड्रायव्हर माझ्या ओळखीत नाही

. माझ्या घरी कुणी आल्यावर मी त्यांच्यासाठी कॉफी करत असताना ते भुताचा भीषण भयावह वगैरे मास्क घालून किंवा हॉलिवूडच्या फेमस स्केअरी  मूव्हीचे पोस्टर क्रॉप करून ते चेहऱ्यावर लावून किचनमध्ये आगाऊपणे येऊन बसत नाहीत

. लहानपणी ससा, कासव, घोडा, हत्ती अशा प्राण्यांच्या आणि त्यांच्या चेहऱ्याच्या आकारातली भरपूर बिस्किटे मी मजेत खाल्ली आहेत, पण सशाच्या चेहऱ्याचे मॉडेल वा डिझाईन असलेली कोणतीही वस्तू - उदाहरणार्थ, आपण काठी म्हणू, माझ्याकडे अजिबातच नाही.  

#अंधाधुन_हँगओव्हर 



Monday, 8 October 2018

राजकुमार राव आणि आयुष्मान खुराना - दोन चोर

राजकुमार राव
आयुष्मान खुराना

आजकालचे दोन खूप मोठे चोर..

साला कामच असं करून ठेवतात की स्वतःचा प्रत्येक सिनेमा बघायला लावतात आणि आमचा खिसा हलका करतात. वर त्याचंही आम्हालाच कौतुक की बघा आम्ही कसे चांगले चित्रपटच थिएटरमध्ये पाहून ते यशस्वी होण्यात हातभार लावतो.

फिल्म्स निवडताना काय पण ते चॉईस दोघांचे.. तरुण आहोत तर गप मसाला पिक्चर करायचे सोडून काय लावलंय काय हे दोघांनी!

आता तो खुरानानेस.. तो जो काय विकी डोनर करत सुरू झाला, तो पुढे दम लगाके हैशा, हवाईजादा, मेरी प्यारी बिंदू, शुभ मंगल सावधान करत आता अंधाधुन आणि बधाई हो पर्यंत आलाय.

किंवा काय ती रावगिरी - शाहीद, न्यूटन, वासेपूर, काय पो चे, अलिगढ, ट्रॅप्ड, ओमेर्ता करत आता स्त्री किंवा बोस सिरीजपर्यंत.

आणि हे खुरानानेस आणि रावगिरी एकत्र आले तर बोंबलाच.. डायरेक्ट बरेली की बर्फीसारखा मास्टरपीसच. तो बघून तर कॉलेजात जाऊन कट्ट्यावर एका बाजूला चिराग आणि दुसऱ्या बाजूला बॅड अॅस बबुअा प्रीतम विद्रोहीला घेऊन गप्पा मारत बसावं वाटतं - अंधाधुनमधल्या सशाची शपथ. 


यांच्याकडे बघून तो वरुण धवन पण बिघडत चाललाय आताशा.. बदलापूर काय, ऑक्टोबर काय, आणि सुई धागा काय.. छे!!! रणबीर, रणवीर पण टक्कर आहेतच. मध्येच एखादा सिद्धार्थ मल्होत्राही एक व्हीलन किंवा इत्तेफाक, अय्यारी करून जातो, पण सध्यातरी त्याच्याकडून तुमच्या कॅलिबरच्या वेड्यांना अभिनय पातळीवर फारसा काही धोका नाही. मग या बाबतीत ते अर्जुन आणि आदित्य रॉय वगैरे पार दारिद्रयरेषेखालचे कपूर लोक तर सोडाच.


आता त्यात हा आयुष्मान आणि दिग्दर्शक श्रीराम राघवन हे डेडली कॉम्बो. मरा म्हणजे, हा राघवन तरी काय कमी आहे.. जॉनी गद्दार, एक हसीना थी केले आणि मग वरुणला बदलापूरला घेऊन गेला तो हाच, आता त्याहीपुढे जाऊन आयुष्मानसोबत  अंधाधुन फिल करतोय. पुढे रावलाही तो घेऊन आला तर झक मारत दिवसात सलग दोन शोज बघायलाच लागणार. 
छळवाद आहे नुसता..
खानावळ बंद कराल रे अशाने, सगळ्यांना वेगळ्याच दर्जेदार फिल्ममेकिंग स्कूलमध्ये घालताय तुम्ही असं करून, काही लक्षात येतंय का तुमच्या. पचनशक्ती वाढवताय तुम्ही आमची. चित्रसाक्षर का काय म्हणतात ते खरंच होत जातील लोक हळूहळू - तुमच्यासारख्या हट्टी लोकांमुळे.  

तरी नशीब समजा अजून तरी तुमचे पिक्चर आम्ही भारतीय लोक २००-३०० कोटी मिळवून देत ब्लॉकबस्टर हिट करत नाही. नाहीतर लाटच घेऊन याल असल्या हटके सिनेमांची. अजून स्लीपर हिटच देताय तुम्ही हे विसरू नका.

अंधाधुन म्हणे.. इतका भारी प्लॉट घेऊन कुणी सिनेमा करतं का? 

अंधाधुन आहेत हे लोक खरंच. रिव्ह्यू वगैरे लिहावासाच वाटत नाहीये राव (म्हणजे बोलीभाषेतला राव हां.. तो स्त्री, न्यूटनवाला नव्हे.) पण अंधाधुन म्हणजे काय ती गोळीबंद पटकथा, काय तो अभिनय - मग तो आयुष्मान असो, तब्बू असो, किंवा नेटफ्लिक्समधून चार दिवस रजा घेऊन यात दर्शन दिलेली राधिका आपटे असो. आणि अर्थात एडिटिंग, बॅकग्राउंड म्युझिक, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे डिरेक्शन असं सगळंच.

स्त्री आणि अंधाधुन संपवलाय पण अशा ठिकाणी की सिक्वेल यावा असं वाटत राहतं. आणि जर आलाच ना, मिस्टर राव आणि मिस्टर खुराना, तर उभे ठाका एकमेकांसमोर बरेलीसारखे या दोन्हीत आणि लावून घ्या एकमेकांचा कस. (अर्थात हे झालं स्वप्नरंजन मी कास्टिंग डिरेक्टर असण्याचं)


शेवटी हे राव आणि हे खुराना हो, तुम्ही आमचे व्यसन आहात तर तुमच्यासाठी तुमच्याच बरेली की बर्फीमधला क्लायमॅक्सचा डायलॉग - जो खऱ्या आयुष्यात मारता यावा असा जोडीदार मिळावा असं आमच्या पिढीच्या प्रत्येकाला वाटत असतं - तोच मनापासून तुम्हाला उद्देशून मारतो -
"आसान नहीं है तुमसे प्यार करना, लेकीन ना करना उससे भी मुश्किल है" 

- पराग पुजारी

#Andhadhun #SriramRaghvan #Tabu #Thriller #RajkummarRao #AayushmanKhurana #Rabbit #Piano #Stree