Sunday, 21 May 2017

चॅम्पियन

"भलत्याच मुलीबरोबर संसार करायची पाळी आली होती ती टळली म्हणून विश्वनाथला अतोनात समाधान वाटत होतं. मुलीला रूप नाही, वर्णदेखील गोरा नाही."

अशी सुरुवात असलेली कथा विजय तेंडुलकरांनी त्यांच्या विशीत म्हणजे १९४७ च्या सुमारास लिहिली, जी तेव्हा प्रचंड गाजली होती. 'तेंडुलकरांच्या निवडक कथा' हे दर्जा पुस्तक - वर्षांपूर्वी वाचनात आलं होतं. पुस्तकाची सुरुवातच या दीर्घकथेने होते. कथेचं नाव आहे - 'आमच्यावर कोण प्रेम करणार'.

असं नाव का असावं? तेव्हाची पुरुषांची (की काहींची अजूनही) मानसिकता आणि रंगावरून मुलींना लग्नाच्या बाजारात येत असलेला न्यूनगंड याभोवती फिरणारी ही कथा आणि कथेत पुढे या मानसिकतेवरच हल्ला करत पेटून उठणारी ती कथेची नायिका - एक काळीसावळी मुलगी. आईच्या आग्रहाखातरदाखवण्याच्या’ कार्यक्रमाच्या वेळी तोंडाला पावडर फासणारी, आणि तसं तेव्हाच त्या मुलाला सांगणारी, पुढे साखरपुड्यानंतर मुलाकडच्यांनी निर्णय फिरवताच उसळून जाब विचारणारी. खास तेंडुलकर शैलीतली वैचारिक आक्रमक कथा

मग आठवतो 'विवाह' सिनेमा. सुंदर अमृता रावशी शाहिद कपूरचा विवाह ठरतो, आणि विवाहाआधी काही दिवस एका दुर्घटनेत ती भाजून तिचा चेहरा काहीसा खराब होतो, मुलीचे पालक नेहमीप्रमाणे आलोकनाथ असल्याने ते चिंतीत होतात (वडील नव्हे, पालक.. काका असतात ते सिनेमात तिचे).. पण तेव्हाही रंगावर नव्हे तर हाडामांसाच्या व्यक्तीवर प्रेम केलेला नि म्हणूनच विवाहाचा निर्णय बदलणारा शाहिद एका ‘विशिष्ट’ मानसिकतेसाठी एक छान मेसेज देऊन जातो.

झिम्बाब्वेची अर्थव्यवस्था (आणि त्यांचे क्रिकेट) सध्या कितीही बोंबललेल्या अवस्थेत असो, पण त्यांचे प्रेसिडेंट रॉबर्ट मुगाबे हे वर्णद्वेषाच्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी चर्चेत असतात अधूनमधून. त्यांचे एक भाषण फार गाजले होते. काहींनी त्यातले मुद्दे गमतीत घेतले, तर काही ठिकाणी त्यावर गंभीर  परिसंवादही झडले. (त्यांची वाक्ये दाखवणारी इमेज सोबत जोडत आहे.)

काही खेळाडू जगात सगळ्यांसाठीच लव्हेबल असतात, त्यातलाच एक आणि खऱ्या अर्थाने एन्टरटेनर असा वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होने 'चॅम्पियन' नावाचं एक गाणं केलं होतं मागच्या वर्षी, ते जरूर ऐका, त्याचे शब्द पहा. कोणत्याही क्षेत्रात चॅम्पियन असलेल्या काळ्यासावळ्या व्यक्तींना  डेडिकेट केलेले हे गाणे. लारा, गेल, ब्राव्हो, पोलार्ड, जॉर्डन, बोल्टसारखे पुरुष खेळाडू, किंवा सेरेनासारखी टेनिसस्टार, किंवा मिस युनिव्हर्स वेन्डी इतकंच काय ओबामा, मंडेला अशा नेत्यांपर्यंत अनेक कृष्णवर्णीय दिग्गजांना हे गाणं आपल्यासमोर आणतं. यंदाच्या ऑस्करमध्ये बेस्ट मूव्ही अवॉर्ड देताना गोंधळ झाला खरा पण 'मूनलाइट' ला हे बक्षीस मिळालं यावरून हॉलिवूडही आता 'ब्लॅक'ला आदर देताना दिसतंय. हा सिनेमा कृष्णवर्णीय पात्रांभोवती फिरणारा आहे. जिथे हॅले बेरीला ऑस्कर मिळालं कीचर्चा’ होते, किंवा विल स्मिथचं ऑस्कर हुकल्यावरही चर्चा’ होते ते ऑस्कर आता कृष्णवर्णीयांना आणि त्यांच्या कलाकृतींना पुरस्कार मिळताना फारशी चर्चा करता हा बदल स्वीकारत चाललंय हे पाहून बरं वाटलं.

माझ्या एका गोऱ्यापान कोब्रा मित्राला काळी (सावळी नव्हे, काळी) मुलगी आवडली होती, दोघे अफाट प्रेमातही होते, करियरही छान, दोघे इंजिनियर नि आयटीमध्ये.. पण एकतर तिची जात वेगळी, आणि मुलाच्या आईला गोरीपान मुलगीच सून म्हणून हवी होती.. 'होत असलेल्या विरोधात जातीपेक्षा रंगाचा भाग जास्त आहे, जोडी विजोड दिसेल असं आईचं मत आहे' हे मित्राकडून ऐकलं होतं. मुलीच्या घरूनही (एक अमुक लाख अमुक घराणे) जबर विरोध होता. फार विचारात टाकणारे होते ते मुद्दे. पुढे हवी तशी मुलगी त्यांना सून म्हणून मिळाली, त्यांचे लग्न झाले वगैरे. पण मुद्दा असा की मुलांच्या मनात हे बीज रोवतं कोण की 'बाबा रे, मैत्रीण असेल तर ठीक, पण सून मात्र गोरीच हवी हो'. यामागचे कारण कदाचित सुबोध भावे, गिरीजा ओक अभिनित 'अडगुलं मडगुलं' या सिनेमात सापडेल, इच्छुकांनी जरूर पहा. गोऱ्याघाऱ्या घराण्यात सावळे मूल जन्माला आलेच कसे यावरून घाणेरड्या शंकाकुशंका, सुनेला सहन करावा लागलेला त्रास यावर हा सुंदर सिनेमा भाष्य करत होता. 'नितळ' हाही असाच एक सुंदर सिनेमा - अंगावर कोड असलेल्या मुलीला सून म्हणून स्वीकारताना एका धुमसत्या सुशिक्षित घराची होणारी चिडचिड, छुपा विरोध दाखवणारा.

आपल्याकडे इंग्रज जे काय गोऱ्या चामडीचं आकर्षण ठेवून गेलेत, ते अजून तितकंसं कमी होताना दिसत नाहीये. पण मी कित्येक गोरी मुलं अशी पाहिलीत की ज्यांना सावळ्या मुलीच स्मार्ट वाटतात. (मी बऱ्यापैकी गोऱ्यात मोडतो आणि माझंही हेच मत आहे, थँक्स टू माय पहिलं प्रेम..) मग तमन्ना भाटियाकडे एकटक पाहता येईल की काजोलकडे असे प्रश्न त्यांना पडत नाहीत. प्रश्न पडतो तो हा की चित्रांगदाला, बिपाशाला ब्लॅक ब्युटी का म्हणायचं, नुसतं ब्युटी का म्हणायचं नाही? पण ऑलिम्पिकमध्ये मेडल जिंकली तरी पी व्ही सिंधूची जातच ज्या देशात आधी पाहिली जाते आणि सावळी असल्याने तिला मॉडेलिंगच्या फार संधी मिळणार नाहीत अशा चर्चा होतात तिथे इतका बदल एका रात्रीत तर होणे शक्य नाही. खरंतर विठ्ठलासारखे आपले देवही सावळे दाखवले आहेत, त्यावर कित्येक गाणीही आहेत. भक्ती करायला देव सावळा चालतो पण 'गोरी गोरी पान फुलासारखी छान, दादा मला एक वहिनी आण' सारख्या गाण्यातून घरी येणारी सून मात्र गोरी हवी हे बालपणापासूनच मुलांच्या मनात का भरवले जाते हा जबाब कुणाकडे मागायचा? मुळात हे असे शब्द असणारे, असा संस्कार करणारे हे गीत 'बालगीत' का आहे? अशा गाण्यांवर रेसिस्ट म्हणून बंदी का घालू नये? कुणी सांगितलं मग सावळ्या मुली फुलासारख्या छान नसतात?

मुलगा असो किंवा मुलगी, आजकाल प्रेझेंटेबल राहण्याचा जमाना आहे, कॉर्पोरेट जगतात वावरायचे असते, मार्केटिंग, प्रमोशन करत सतत फिरायचे असते.. मग शाहरुख मुलांच्याही फेअरनेस क्रीमची जाहिरात करतो आणि अनेक मुलंही सौंदर्यप्रसाधनं वापरतात. कित्येक मुलांना क्लीन शेव्हन किंवा प्रॉपरली ट्रिम्ड दाढी असल्यावर जास्त कॉन्फिडन्ट वाटतं, तसं कित्येक मुलींनाही त्या गोऱ्या असल्यावर (किंवा झाल्यावरच) उत्साही, कॉन्फिडन्ट वाटतं का? (कम्फर्टेबल नसाल तर उत्तर नका देऊ, पण हे मी विचारलं कारण एक सावळी मैत्रीण तिचं लग्नाचं वय आलं तशी अचानक ब्युटी पार्लरच्या वरचेवर वाऱ्या करू लागली, वेगळीच दिसू लागली, काहीशी गोरी झालीही पण तिच्या चेहऱ्यातला गोडवा, जिवंतपणा, चार्मच निघून गेला. आणि मग स्वत: स्वत:ला गोऱ्या बनवलेल्या त्या मुलीचं लग्न झालं - एका सावळ्या मुलाशी)

टेलिशॉपिंग तसेच इतरही रोजच्या जाहिरातींचे कंबरडे मोडणारी आणि ग्राहक जनजागृती करणारी रझा मुरादची एक जाहिरात लागायची मध्यंतरी - 'कोई भी क्रीम ४ दिन में आपको गोरा नही बना सकता और कोई भी तेल ७ दिन में आपके सर पर बाल नही उगा सकता'.. अशावेळी तापसी पन्नू, कंगना राणावतसारख्या लौकिकार्थाने गोऱ्या नट्या स्वत:च जेव्हा फेअरनेस क्रीमची जाहिरात आणि त्याचे ब्रॅण्डिंग करणारे कार्यक्रम नाकारतात, तेव्हा खरंच 'चलो, कोई तो है' वालं फिलिंग येतं.

बाकी बऱ्याच मुलींचा खरंतर म्हणे त्यांच्यासाठी मुलगा निवडताना ‘टीडीएच’ (टॉल डार्क हँडसम) क्रायटेरिया असतो. म्हणूनच वैभव तत्त्ववादीवर भूषण प्रधान किंवा सिद्धार्थ चांदेकरपेक्षा जास्त मुली मरतात. मिलिंद सोमण हे दोन शब्द लिहितानाही असंख्य जळणारे पुरुष दिसतात.. साला म्हातारा होतच नाही.

छान, प्रेझेंटेबल दिसणं, राहणं वेगळं आणि गोरं दिसणं, राहणं वेगळं.. यात मुलांनी, मुलींनी, त्यांच्या पालकांनी कुणीच गल्लत करू नये. हे एकत्रित झालं कीच मोठ्या आवाजात म्हणता येईल - समाज गेला उडत... 


-- पराग पुजारी
आदर्श संवाद लेखन 

ती बागेत त्याची वाट बघत बसली आहे, तो येताच ती त्याला बिलगते

ती - श्याम.. उंहू उंहू (थोड़ी आहें, सिसकियाँ इत्यादी मोहजाल) मैं कबसे तुम्हरी राह देख रही थी
तो - सॉरी नीता मुझे देर हो गयी 9 स्प्राइट - सीधी बात नो बकवास) 
ती - क्या हो गया था कल.. क्यों लेके गये थे वो तुम्हे (--> पोलीस)
तो - रोज ही लेके जाया करे तो अच्छा है तुम ऐसे लिपटके तो मिला करोगी (डोळ्यात अशक्य रोमँटिकपणा)
ती - मेरी जान पे बनी है और तुम्हे लिपटने के पड़ी है (काजळ उतू जाणारे डोळे वागवणाऱ्या चेहऱ्यावर सगळे पुरुष असलेच हा भाव )
तो - याद रखो तुम्हे भी एक दिन पुलिसवाला पकड़के ले जाएगा (पुन्हा स्प्राइटगिरी)
ती - बात क्या है.. (मग पुन्हा तोच संवाद.. अति लाडिक नखरेल लाजत)
तो - बात.. बड़े राज की बात है.. बैठो
ती - ऐसी क्या राज की बात है
तो - बतादू? (काही गोष्टी लपवतोय, मग नम्रपणे तिची परमिशनही घेतोय म्हणजे हा पुढे नक्की तिच्याशी लग्न करून तिचा नवरा होणार.. आता गौप्यस्फोट..) जिस आदमी से तुम प्यार करती हो ना वो पुलिस में सीआयडी है
ती - तुम्हारा मतलब है तुम.. तुमने मुझसे झूठ कहा था की तुम आर्ट्स के स्टुडंट हो

मग एक ऐतिहासिक डायलॉग
तो - वो सच था.. मैं तुमसे प्यार करता हूं.. प्यार करना भी तो आर्ट है
ती - झूठे कही के (अरेरे इतक्या क्रिएटिव्ह बचावाला किती कोरडा प्रतिसाद)
तो - अरे अरे लेकिन.. जो भी कुछ हूं तुम्हारा हूं.. गुस्सा छोडो, हंसके देखो ना मेरी तरफ
ती - (नाटकी) मुझे तुमसे डर लगता है
तो - डरो मत देवी (अचानक भारतीय नारी देवीसमान).. पुलिस जनता की सेवा के लिये है.. जनता को डराने के लिये नहीं.. पास आओ ना, अरे आओ ना (कोण देवी? कसली देवी?)

मग तिचा जरा लटका विरोध, पण एव्हाना तिच्या मांडीवर डोके ठेवून पहुडलेला आणि तिथे बजरंग दलवाले येणार नाहीत हा विश्वास असलेला तो खुद्द सीआयडी पोलिसवाला तिला हळूच जवळ ओढून घेतोच.. आणि मग १९७० सुरु असल्याने कॅमेरा वरती पॅन होतो, काही झाड़े, फुले वगैरे दिसतात, प्रेक्षक कल्पनाशक्ती वापरतात तोपर्यंत ती ओठ पुसत उठते. (असले बाळबोध हिंदी सिनेमा बदलून ते वयात आणावेत म्हणून पुढे ९ वर्षांनी 'अजून राहिलीये का मनुंय; संघटनेचे संस्थपक अध्यक्ष सिरीयल केसर इम्रान हाश्मी यांनी जन्म घेतला आणि नकायिकेने ओठ का पुसले असा प्रश्न उद्या कुणी RTI अंतर्गत पुसू नये म्हणून पडद्यावर पारदर्शक कारभार ठेवला..) ती उभी राहताच  एखादे गाणे होईल असे वाटते, पण आदल्याच दिवशी त्याच ठिकाणी त्याच वेळी त्याने 'गुलाबी आँखे जो तेरी देखी' हे अवीट गोडीचे गाणे रफीच्या आवाजात गात ऐतिहासिक डान्सही केलेला असतो, मग पुन्हा गाणे नको असे ठरवून दोघे कारमधून निघून जातात. शेवटी क्लायमॅक्स सीनला हा सीआयडी मग व्हिलनशी ढिशूम ढिशूम करताना आमीर खानने 'गुलाम'मध्ये केलेला अल्मोस्ट ट्रेनच्या ट्रॅकवरचा स्टंटही तब्बल २८ वर्षे आधी करतो, आणि सिनेमाचे नाव सार्थकी लावतो.    

सिनेमा - द ट्रेन (१९७०)
तो, ती - राजेश खन्ना, नंदा
संवादलेखक - राज बलदेव राज ('वो सच था.. मैं तुमसे प्यार करता हूं.. प्यार करना भी तो आर्ट है' फेम)

काही नाही, सोमवारी युट्युबवर अपलोड होणार असल्याने आज ऑफिसात मला या सिनेमाचा मेटाडेटा करायला आला होता, काही सीन्स पाहिले, हा डायलॉग जबरी वाटला, म्हणून सहज.. आता सर्वानी बिनधास्त सांगा की आम्ही आर्ट्स स्टुडंट आहोत. शुभेच्छा..

-- पराग पुजारी
Attachments area

Thursday, 18 May 2017

इन्व्हिक्टस

२००९ साली आलेला मॉर्गन फ्रीमन, मॅट डेमन यांच्या अभिनयाने नटलेला हॉलीवूडचा  हाइन्व्हिक्टस’ सिनेमा. इन्व्हिक्टस म्हणजे अपराजित. शॉशांक रिडम्प्शन, बकेट लिस्टसारख्या सिनेमातून मॉर्गन फ्रीमन यांचा लाजवाब अभिनय पाहिला होताच, पण इन्व्हिक्टसमध्ये त्यांनी उभे केलेले नेल्सन मंडेला जबरदस्त छाप पाडून जातात. नव्वदीच्या दशकातल्या दक्षिण आफ्रिकेतील बऱ्याच छोट्यामोठ्या घडामोडींवर सिनेमा अलगद भाष्य करतो. मंडेला यांच्या सुटकेची घोषणा आणि मग त्यांनी दक्षिण आफ्रिकेचे प्रेसिडेंट होत स्वीकारलेला पदभार दाखवत सिनेमा सुरु होतो.

वर्णभेदाचा फटका बसलेला असूनही कार्यभार स्वीकारताच पहिलं काम ते करायला घेतात ते म्हणजे काळ्या लोकांचा आता गोऱ्या लोकांवर असलेला राग शांत करण्याचा प्रयत्न करणं. मंडेलांच्या सिक्युरिटीसाठी आणखी कुमक लागणार असतानाचा प्रसंग - चार गोरे प्रशिक्षित अधिकारी जेव्हा त्यासाठी येतात, तेव्हा मंडेलांचा मुख्य सिक्युरिटी इनचार्ज त्यांना धुडकावून लावतो, पण मंडेला त्याला समजावतात आणि मग काळेगोरे एकत्र काम करू लागतात. महागाई, बेरोजगारी, कुपोषण, अन्नटंचाई, वाढती गुन्हेगारी अशा कठीण परिस्थितीतून जात असलेल्या दक्षिण आफ्रिकेला योग्य मार्गाने पुढे नेण्याचं अवघड काम आता मंडेलांनी आपल्या खांद्यावर घेतलेलं असतं. सकाळी चहा पिताना रोज पेपरातही अशा नकारात्मक बातम्या दिसत असताना त्यांना अचानक एक दिवस एक बातमी दिसते - 'स्प्रिंगबॉक्स या दक्षिण आफ्रिकन रग्बी टीमच्या कोचची हकालपट्टी, पण कॅप्टन फ्रँकॉईस पिनार कायम'. खालावलेल्या परफॉर्मन्समुळे ही टीम आता देशभर चेष्टेचा विषय झालेली असते. १९९५ चा रग्बी वर्ल्ड कप तोंडावर आलेला असतो आणि पिनारला घरी एक फोन येतो. देशाच्या राष्ट्राध्यक्षांनी त्याला चहासाठी बोलावलेलं असतं. आपल्याला का बोलावलं असेल या विचाराने तो गोंधळतो, पण जातो. तिथे मंडेला त्याच्यासाठी चहा बनवत विचारतात की तुझ्या मते लीडरशिप म्हणजे काय? बोलता बोलता ते सांगतात की तुरुंगात असताना एका कवितेने त्यांना प्रेरणा दिली, लढायची जिद्द दिली. पिनार भारावून जातो. टीमकडून येत्या वर्ल्डकपमध्ये असलेल्या अपेक्षांची पिनारला कल्पना येते आणि त्यांची भेट संपते. टीम सराव करू लागते तसे देशात ठिकठिकाणी कोचिंग कॅम्पस करण्याबद्दल टीमला सुचवले जाते. ही टीम बहुतांशी गोऱ्या खेळाडूंची, मग खळखळ करत पण कॅप्टनने आग्रह केल्यावर ते राजी होतात. सामान्य काळ्या आफ्रिकन्सशी गोऱ्याना जोडण्याच्या मंडेलांच्या प्रयत्नातला हा एक भाग असतो. टीम जिथे जिथे जाईल तिथे चेस्टर या टीममधल्या एकमेव काळ्या खेळाडूभोवती लोकांचा, लहान मुलांचा गराडा पडत असतो. त्याची ही लोकप्रियता इतकी वाढते की खेळाडूंना नेणाऱ्या विमानावरही चेस्टरचा मोठा चेहरा रंगवला जातो.


आपण गोऱ्याना सामावून घेऊ, तुम्ही मला तुमचा नेता म्हणून निवडलंय, आता मला नेतेपद निभावूदे असं आवाहन करूनही मंडेला यांना फारसा प्रतिसाद त्याआधी मिळालेला नसतो, पण आता ही रग्बी टीम त्यांना अप्रत्यक्षपणे देश एकत्र आणण्यासाठी मदत करणार असते. गरीब मुलांना मोफत वस्तूवाटप असते तेव्हाही एक मुलगा राष्ट्रीय रग्बी टीमची जर्सी त्याच्या वाट्याला येते ती नाकारून जातो, कारण गोऱ्या खेळाडूंच्या टीमची जर्सी घेतली तर 'आपले' लोक आपल्यावर रागावतील ही भीती त्याला असते. आता आपले राज्य आलेय तर आपण गोऱ्यांना ठेचू, हवे ते करू हा काळयांचा भावनिक उन्माद हळूहळू मोडून काढायला आणि हे देशातले गोरेही आपलेच आहेत हे त्यांच्या गळी उतरवायला मंडेला पूर्ण प्रयत्न करत असतात.

स्वत: तरुणपणी रग्बी खेळलेले मंडेला रग्बी वर्ल्डकपचे वेळापत्रक समजून घेतात, चार गटात प्रत्येकी चार टीम्स आणि दक्षिण आफ्रिकेला ऑस्ट्रेलिया, इंग्लंडसारख्या बलाढ्य टीम्सशी आधी लढावे लागणार हे त्यांना समजते. तयारी करत असलेल्या टीमला स्वत: हेलिकॉप्टरमधून जाऊन ते शुभेच्छा देतात तेव्हा टीमतर्फे त्यांना टीमची टोपी भेट देण्यात येते, ती ते अभिमानाने घेऊन परततात. पिनारला आता मंडेलांची इच्छा, त्यांचे स्वप्न बरोबर कळलेले असते. पहिल्या सामन्यात जिद्दीने खेळून ते ऑस्ट्रेलियाला हरवतात. स्पर्धेदरम्यान एकदा टीमला बोटीतून एका खास ठिकाणी नेले जाते. मंडेला यांनी १९६४ ते १९९१ अशी आयुष्यातली तब्बल २७ वर्षं ज्या तुरुंगात काढली, त्या तुरुंगाला टीम भेट देऊन येते. तिथे मंडेलाना ठेवलेली एवढीशी जागा पाहून पिनार हेलावून जातो. परतल्यावर विचारात पडलेल्या पिनारला त्याची मैत्रीण जेव्हा विचारते की 'उद्याच्या सामन्याचा विचार करतोयस का', त्यावर तो म्हणतो, 'नाही, एक माणूस सुमारे ३० वर्षे जेलमध्ये राहतो, आणि तिथून बाहेर पडताना मात्र ज्यांनी त्याला तिथं खितपत टाकलं त्यांना माफ करून बाहेर येतो, हा काय माणूस असेल'.

स्पर्धा रंगत जाते, पावसात झालेल्या सामन्यात फ्रान्सला हरवून दक्षिण आफ्रिका फायनलला पोचते. फायनलमध्ये टक्कर असते न्यूझीलंडशी. गाडीत मंडेला न्यूझीलंडने इतरांना कसं चिरडून टाकलंय हे ऐकतात, जपानला १४५-१७ ने तुडवताना एकाच सामन्यात त्यांनी १४५ हा स्कोर करत वर्ल्डरेकॉर्ड केलाय हे ऐकून ते थक्क होतात. आणि क्वार्टर फायनलला पोचली तरी खूप झालं अशी माफक अपेक्षा घेऊन आलेली आफ्रिकन टीम आता थेट फायनलला आल्यावर 'धिस कंट्री इज हंग्री फॉर ग्रेटनेस' असं म्हणून मंडेला आपली इच्छा सुचवतात. फायनल सुरु होण्याआधी ते स्प्रिंगबॉक्सची जर्सी घालून आणि टीमकडून त्यांना मिळालेली टोपी घालून मैदानावर येतात, प्रत्येकाला शेकहॅंड करत प्रोत्साहन देतात. सामना चुरशीचा होतो, न्यूझीलंडच्या लोमू या प्रमुख बलदंड स्ट्रायकरला रोखण्यात सगळ्या टीम्स अपयशी ठरलेल्या असतात. फायनलला मात्र पिनार त्याच्या सहकाऱ्यांना म्हणतो, 'मी माझा खांदा, हात, पाय, मान सगळं मोडून घेईन, पण लोमूला रोखीन'. इतर खेळाडूही त्याच्या सुरात सूर मिसळतात. सामना अटीतटीचा होतो, या रांगड्या रानटी खेळात आफ्रिकेचे खेळाडू जखमी होतात, पण जिद्द सोडत नाहीत, आणि शेवटी १५-१२ ने सामना, नव्हे वर्ल्ड कप जिंकतातइतिहास घडलेला असतो.  'तुला आज इथे स्टेडियममध्ये जमलेल्या ६३००० दक्षिण आफ्रिकन चाहत्यांचा पाठिंबा लाभला' यावर कॅप्टन पिनार म्हणतो, '६३००० नाही, आम्हाला ४३ मिलियन दक्षिण आफ्रिकन्सचा पाठिंबा मिळालाय.'

स्टेडियममधून बाहेर पडल्यावर रस्त्यावर प्रचंड गर्दी लोटलेली असते, वाट काढत जाण्यात बराच वेळ जाणार हे ओळखून मंडेलांची गाडी वेगळ्या मार्गाने नेऊ असं त्यांचा सिक्युरिटी ऑफिसर म्हणतो तेव्हा मंडेला म्हणतात, 'नको, कितीही वेळ लागूदे, काही घाई नाही.' एका खेळामुळे एक झालेला देश बघत, हे आनंदी लोक बघत हा मानवतेचा मसीहा हळूच डोळे पुसतो

सिनेमाची फ्रेम फ्रेम विचार करून पेश केलेली, म्हणूनच मनात घर करून बसलेली. फायनलची तिकिटे आपल्या कुटुंबियांना द्यायला पिनार येतो तेव्हा 'अरे आम्ही तिघे आहोत, हे चौथे तिकीट कुणासाठी' असं त्याचे वडील त्याला विचारतात त्यावेळी तो त्यांच्या घरी काम करणाऱ्या काळ्या मोलकरणीकडे पाहतो तो सीन, किंवा पिनार जेव्हा मंडेला असलेल्या तुरुंगात थोडा वेळ स्वत:ला बंद करून घेत खिडकीतून खाली पाहतो तेव्हा त्याला छिन्नी हातोड्याने दगडावर काम करत बसलेले मंडेला दिसतात तो प्रसंग, आपले मोदी जसे पंतप्रधान झाल्यावर अनेक देश फिरत होते तसेच त्याच कारणांसाठी म्हणजे देशाची इमेज आणि परराष्ट्र धोरण सुधारायला मंडेलाही तेव्हा अनेक देशांच्या दौऱ्यावर असताना 'फॉर या चेंज, मंडेला दक्षिण आफ्रिकेलाही भेट देणार आहेत' हे पिनारच्या गोऱ्या वडिलांचं खोचक वाक्य,  'सॉकर इज या जेंटलमन्स गेम प्लेड बाय हुलीगन्स अँड रग्बी इज या हुलीगन्स गेम प्लेड बाय जेंटलमन्स' असे संवाद, गोऱ्या खेळाडूंची नावे चेहऱ्यासह लक्षात ठेवण्याचा मंडेलांचा अभ्यासमहत्त्वाची मीटिंग मध्येच थांबवून टीव्ही चॅनेल चेंज करत टीमसोबत जल्लोष करणारे सामान्य लोक टीव्हीवर पाहून खुश होणारे मंडेलाउद्या इंग्लडशी सामना असताना माझा तो वेळ मोकळा ठेव असं सेक्रेटरीला सांगणारे मंडेला, प्रकृती खालावूनही टीमचे अपडेट्स घेणारे मंडेला असे अनेक प्रसंग निव्वळ अप्रतिम.

मॉर्गन फ्रीमन हे मुळातच त्यांच्या हुबेहूब चेहऱ्यामुळे नेल्सन मंडेला म्हणून परफेक्ट शोभून दिसतात. मॅट डेमनने साकारलेला कॅप्टन पिनारही खास. दोघांनाही या भूमिकांसाठी ऑस्कर नामांकन मिळालं होतंच, शिवाय चार ऑस्कर नावावर असलेल्या दिग्दर्शक क्लिंट इस्टवूड यांनाही दिग्दर्शनासाठी नामांकन होतंच. आवर्जून पाहावा असा सिनेमा.

रॉबेन आयलंड इथे तुरुंगात असताना मंडेलांना प्रेरणा देणारी विल्यम अर्नेस्ट हेन्ले यांची 'इन्व्हिक्टस' ही कविता मॉर्गन यांच्या आवाजात सिनेमाभर तुकड्या तुकड्यात ऐकू येत राहते, ती खाली देत आहे -
Out of the night that covers me,
Black as the pit from pole to pole,
I thank whatever gods may be
For my unconquerable soul

In the fell clutch of circumstance
I have not winced nor cried aloud.
Under the bludgeonings of chance
My head is bloody, but unbowed

Beyond this place of wrath and tears
Looms but the Horror of the shade,
And yet the menace of the years
Finds and shall find me unafraid

It matters not how strait the gate,
How charged with punishments the scroll,
I am the master of my fate,
I am the captain of my soul